---Advertisement---
राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार बसस्थानक परिसरात शनिवारी सकाळी आरटीओ पथकाकडून वाहनांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई अशा वाहनांवर करण्यात आली. जी केवळ नातेवाईक प्रवाशांना बसस्थानकात सोडण्यासाठी आले होते. त्यामुळे “नातेवाईकांना बसस्थानकात सोडण्यासाठी येणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्वतः नियम मोडून इतरांवर कारवाई? उपलब्ध वाहन तपशीलांनुसार, कारवाईसाठी वापरल्या गेलेल्या एम. एच १८ व्ही ३१७३ क्रमांकाच्या वाहनाची पीयूसी (प्रदूषण प्रमाणपत्र) वैधता ११ जून २०२६ पर्यंत असल्याचे दिसून येते. संबंधित कारवाई १२ जुलै २०२६ रोजी करण्यात आल्याने, कारवाईच्या वेळी त्या वाहनाची पीयूसी मुदत संपलेली होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. “स्वतःच्या वाहनाचे कागदपत्र पूर्ण नसताना नागरिकांच्या वाहनांवर चलन आकारणे कितपत योग्य आहे?” असा प्रश्न स्थानिक नागरिक, प्रवासी आणि व्यापारी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी प्रवासी महासंघ व स्थानिक नागरिकांनी केली आहे, त्यानुसार विभागीय परिवहन अधिकारी, परिवहन आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.









