---Advertisement---
भुसावळ शहरातील ताजनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून विक्री करणाऱ्या रॅकेटचा भुसावळ बाजारपेठ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ४ लाख ३९ हजार ४४० रुपये आहे. या प्रकरणी सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. दोन संशयितांचा शोध सुरू आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना ताजनगर, तडवी वाडा परिसरातील एका घरात गांजा साठवून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने संशयित शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ अच्चू (वय ४१) यांच्या घरावर धाड टाकली. तपासणीदरम्यान घरातील दोन गोण्यांमध्ये पाने, फुले, काड्या व बिया असलेला अंमली पदार्थ आढळून आला. फॉरेन्सिक तपासणीत तो गांजा असल्याचे स्पष्ट झाले.
इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केल्यानंतर एकूण २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ अच्चू व त्याचा भाऊ शेख सलीम अब्दुल मजिद (वय ४५) यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत हा गांजा भोपाल व अकोला येथील संशयितांकडून आणल्याची माहिती समोर आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.









