---Advertisement---
दिल्लीत ऑनलाइन राइड बुकिंग सेवा देणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या एका ऑटोचालकावर महिला प्रवाशाने गंभीर आरोप केल्याची घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान चालक मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत होता आणि अशोभनीय वर्तन करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या तक्रारीची दखल घेत रॅपिडोने संबंधित चालकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरून कायमचे हटविले आहे.
तक्रार करणारी महिला संशोधक आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर असून, तिने सफदरजंग ते मॉडेल टाउन या मार्गासाठी रात्री रॅपिडो ऑटो बुक केला होता. सुरुवातीला प्रवास सुरळीत सुरू होता. मात्र, एका सिग्नलवर ऑटो थांबल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेने चालकाच्या वर्तनाकडे तिचे लक्ष वेधल्याचे तिने सांगितले.
त्यानंतर चालक मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडिओ पाहत असल्याचे आणि अशोभनीय कृत्य करत असल्याचा संशय आल्याने आपण असुरक्षित वाटू लागल्याचे महिलेने म्हटले आहे. प्रवास अजून काही अंतर बाकी असल्याने आणि परिसर अपरिचित असल्यामुळे तिने गर्दीच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत शांत राहणे पसंत केले.
दरम्यान, महिलेने प्रवास सुरू असतानाच रॅपिडोच्या सुरक्षा पथकाशी संपर्क साधून आपल्याला असुरक्षित वाटत असल्याची माहिती दिली. मात्र, प्रवासादरम्यान कंपनीकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही तिने केला आहे.
प्रवास संपताच महिलेने चालकाला याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी चालकाने मोबाईलवर परदेशी महिलांचे व्हिडिओ पाहत असल्याचे सांगितल्याचा दावा महिलेने केला आहे. घटना समोर आल्यानंतर रॅपिडोने निवेदन जारी करत तक्रारीची चौकशी करण्यात आली असून, संबंधित चालकाचे वर्तन व्यावसायिक निकषांना धरून नसल्याचे आढळल्याने त्याला प्लॅटफॉर्मवरून कायमचे हटविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.









