---Advertisement---
जळगाव येथील राधाकिसन वाडी परिसरातील श्री गायत्री माता मंदिरात राष्ट्रीय हिंदू संघटनेचा १४ वा वर्धापन दिन ३० सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने दरमहा किमान ५० हिंदू बांधवांना संघटित करण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी गोमातेला चारा वाटप करून करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जिल्हा महिला अध्यक्षा सौ. दीपा तापडिया यांच्या सुश्राव्य भजनांनी मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर शहरातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीदरम्यान “जय श्री राम”, “जय जगन्नाथ”, “जय गायत्री माता” आणि “जयतु जयतु हिंदू राष्ट्रम्” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी राजेश बन्सल, प्रमुख अतिथी भगवती प्रसाद मुंदडा, डॉ. विजय सांखला आणि भारती चौबे यांच्या हस्ते १४ दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
या सोहळ्यास जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. दीपा तापडिया, उपाध्यक्ष ओमप्रकाश जोशी, सौ. नीलकमल टाक, विजया पांडे, जिल्हा संघटन मंत्री वसंत पाटील, किशोर जाजडा तसेच सिखवाल समाजाच्या अध्यक्षा सौ. उषा सिखवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार प.पू. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजक श्रीकांत बोढरे हे सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.









