---Advertisement---
नगाव खुर्द येथे रेशन दुकानातील शासकीय धान्य खाजगी गोदामात साठवून ठेवल्याचा प्रकार चौकशीत उघडकीस आला. याप्रकरणी रेशन दुकानदार प्रमोदपुरी रामपुरी गोसावी व त्यांचे भाऊ प्रवीण गोसावी यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यासह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगाव बुद्रुक व नगाव खुर्द येथील रेशन दुकान क्रमांक १५२ व १५३ संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. त्यानुसार नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, पुरवठा निरीक्षक रुकसाना शेख, सचिन निकम व ग्राम महसूल अधिकारी सुधीर पाटील यांनी पंचांसमक्ष खाजगी गोदामाची तपासणी केली.
तपासणीत २६ गोण्या (१३.८३ क्विंटल) मका, १८ गोण्या (९.३९ क्विंटल) ज्वारी, ३ गोण्या (१.५ क्विंटल) साखर आणि ३ गोण्यांमध्ये ९१.५०० किलो गहू, असा एकूण सुमारे ₹६४ हजार ८१६ किमतीचा शासकीय धान्यसाठा आढळून आला. हा माल जप्त करून शासकीय गोदामात जमा करण्यात आला.
दरम्यान, ग्रामस्थांनी रेशन दुकानदाराने अंगठे घेऊन धान्य न दिल्याची तक्रारही केली होती. त्यांचे जबाब नोंदवून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत.









