---Advertisement---
शहरात ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आलेला असताना, प्रभाग क्रमांक १५ मधील अत्यंत बिकट आणि अडचणीचा मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने रविवारी (२४ मे) या भागात धडक मोहीम राबवून तब्बल ३ ट्रॅक्टर गाळ उपसला. या कामगिरीमुळे वर्षानुवर्षे पावसाळ्यात तुंबणाऱ्या नाल्याच्या त्रासातून स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
६ तास चालले ‘ऑपरेशन नालेसफाई’
प्रभाग क्रमांक १५ मधील बाबा खोली परिसरातील या नाल्याच्या दोन्ही बाजूंना अत्यंत दाट लोकवस्ती असून घरे एकमेकांना खेटून आहेत. त्यामुळे या नाल्याची साफसफाई करण्यासाठी मनपाच्या वाहनांना किंवा कर्मचाऱ्यांना आत जाण्यासाठी अजिबात जागा नव्हती. पावसाळ्यात हा नाला तुंबून घाण पाणी घरात शिरण्याची भीती असल्याने स्थानिक नागरिकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. महापौरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आरोग्य विभागाला ‘ऑन द स्पॉट’ स्वच्छतेचे आदेश दिले.
महापौरांच्या सूचनेनुसार, रविवारी सकाळी ७ वाजेपासूनच आरोग्य विभागाचा मोठा फौजफाटा या भागात दाखल झाला. अत्यंत बिकट परिस्थिती आणि जागेची प्रचंड कोंडी असतानाही, कर्मचाऱ्यांनी दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल ६ तास सलग मोहीम राबवली. सुमारे १ किलोमीटर लांबीच्या या मुख्य नाल्यामधील साचलेला संपूर्ण गाळ, प्लॅस्टिक आणि कचरा उपसण्यात आला.
अधिकारी उतरले मैदानावर!
या धडक मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, समीर बोरोले, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मंजू पवार यांच्यासह बीव्हीजी (BVG) कंपनीचे ठेकेदार आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौरांकडून कामाची ‘लाईव्ह’ पाहणी; काही दिवसांत पुन्हा होणार सफाई
स्वच्छतेचे हे काम सुरू असताना स्वतः महापौर दीपमाला काळे यांनी बाबा खोली परिसरात भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ आदेश देऊन न थांबता महापौरांनी गल्लीबोळात फिरून कामाचा आढावा घेतला आणि उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
“या मोहिमेत प्राथमिक टप्प्यात तीन ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणताही फटका बसू नये, म्हणून काही दिवसांनंतर पुन्हा एकदा या नाल्याची सखोल साफसफाई केली जाईल.”









