---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात अवैध वाळू उपशाविरोधात महसूल प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून, उत्राण अहिर हद्दीतील गिरणा नदीपात्रात मोठी कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी नदीपात्रात छापा टाकत वाळू उपशासाठी वापरले जाणारे तराफे घटनास्थळीच नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी महसूल प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
तहसीलदार गोपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत मंडळ अधिकारी नदीम शेख आणि ग्राम महसूल अधिकारी रविराज पाटील यांनी संयुक्तपणे उत्राण अहिर परिसरातील ख्वाजा मियाँ दर्गा परिसरात पाहणी केली. यावेळी नदीपात्रात वाळू उपशासाठी वापरले जाणारे तराफे आढळून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ते घटनास्थळीच नष्ट केले.
महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील उत्राण गुजर, उत्राण अहिर, अंतुर्ली, हणमंतखेडा, टाकरखेडा, कढोली आणि गिरणा नदीलगतच्या इतर भागांतून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तहसीलदार गोपाल पाटील यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सुमारे 20 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, सात जणांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, तालुक्यात कोठेही अवैध वाळू साठा किंवा वाहतूक सुरू असल्यास नागरिकांनी तत्काळ तहसील कार्यालय किंवा स्थानिक तलाठ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.
याचबरोबर स्थानिक नागरिकांनी केवळ वाळूच नव्हे, तर मुरूम आणि इतर गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पद्मालय, विखरण, पिंपळकोठा, खडके आणि इतर भागांतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात मुरूमाची वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा अनेक वाहनांवर नंबर प्लेट नसतात, काही चालकांकडे वैध परवाना नसतो, तर काही ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून वाहने चालवली जात असल्याचेही दिसून येते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात असून, महसूल आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे या प्रकारांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.









