---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला आता वेग आला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याची चर्चा सुरू असतानाच, पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची इच्छा स्वतः अजित पवारांची होती, असे त्यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना ठोंबरे यांनी सांगितले की, पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. त्यावेळी अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे निर्देश दिले होते, असा दावा त्यांनी केला.
“दादांनी निर्णय घेतला होता”
रुपाली ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा करत होते. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे आली आणि यापूर्वी ठरलेल्या काही निर्णयांची अंमलबजावणी थांबली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावर दोन-तीन वर्षे झाली असून, आता नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदात बदल व्हायला हवा, अशी त्यांची भूमिका आहे.
तटकरेंवर थेट नाराजी
अजित पवारांच्या कार्यकाळात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नियुक्त्यांनंतर अधिकृत पत्र देण्यास विलंब होत असल्याचा आरोपही ठोंबरे यांनी केला. अजित पवारांनी सूचना देऊनही काही नियुक्त्यांबाबत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचे त्यांनी म्हटले.
मात्र, सुनील तटकरे यांच्याशी वैयक्तिक वाद नसल्याचे स्पष्ट करत, पक्षाच्या हितासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडून नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
“तटकरे आणि पटेलांनी सुनेत्रा पवारांना साथ द्यावी”
दरम्यान, उमेश पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना ठोंबरे यांनी राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. अजित पवारांच्या काळात काही ज्येष्ठ नेते अपेक्षेप्रमाणे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली असताना, त्यांना ज्येष्ठ नेत्यांकडून अधिक ताकद मिळायला हवी होती, असे ठोंबरे म्हणाल्या. विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सुनील तटकरे यांच्याबाबत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









