शहादा घरफोडी प्रकरणाचा छडा; दोन आरोपी अटकेत, ४.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त…

---Advertisement---

 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ४ लाख २१ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल यांचा समावेश आहे.

शहादा येथील रहिवासी निकेश मोहनसिंग सिसोदिया (वय ३६) यांच्या घराचे कुलूप तोडून २७ जुलै २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८९/२०२६ दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर इम्रान उर्फ इमू नईम शेख (वय २४, रा. हरियाली इस्टेट, शहादा) आणि अमन आयजोद्दीन शेख (वय ३२, रा. लोणखेडा, ता. शहादा) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून २ लाख ६१ हजार ३८५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, १ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ४ लाख २१ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय बागल, स्वप्नील गोसावी, मोहन ढमढेरे तसेच पोलीस शिपाई शोएब शेख, भरत उगले आणि सतीश घुले यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---