---Advertisement---
वेगाने होणारे शहरीकरण, रस्त्यांवरील वाढती वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि मद्यपान करून वाहन चालविण्याच्या प्रकारांमुळे जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्राणांतिक अपघात झाले असून, त्यात हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात वेगमर्यादेचे उल्लंघन, निष्काळजीपणे वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे चित्र आहे. अपघातामुळे केवळ संबंधित व्यक्तीचा जीव जात नाही, तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा मोठा सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतो. त्यामुळे रस्ते सुरक्षा हा केवळ वाहतूक विभागाचा नव्हे, तर प्रत्येक वाहनचालकाच्या जबाबदारीचा विषय असल्याचे या आकडेवारीतून अधोरेखित होते.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात जळगाव जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी तर देशातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अकराव्या स्थानी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, देशभरातील अपघातांची परिस्थिती लक्षात घेऊन सेव्ह लाइफ इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही विविध शहरांमधील अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणाचा आढावा घेण्यात आला आहे.
अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना सुरू आहेत. ज्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण अधिक आहे, त्या ठिकाणांची ओळख करून तेथे आवश्यक सुरक्षा उपाय करण्याची गरज व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातही ‘शून्य अपघात जिल्हा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सूचना फलक, प्रकाशव्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, स्पीड ब्रेकर तसेच वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२३ ते जून २०२६ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात दरवषी ५०० हुन अधिक प्राणांतिक अपघातांची संख्या असून गेल्या साडेतीन वर्षात जिल्ह्यात १ हजार ५८४ प्राणांतिक अपघात होऊन त्यात १ हजार ७३६ जणांनी जीव गमावला आहे. सातत्याने होणारे अपघात हा चिंतेचा विषय आहे. विशेषतः प्रत्येक वर्षी शेकडो नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होत असल्याने रस्ते सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जानेवारी ते जून २०२६ या अवघ्या सहा महिन्यांतही मोठ्या प्रमाणावर प्राणांतिक अपघातांची नोंद झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे उर्वरित वर्षात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनासह वाहनचालकांनीही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
अपघात रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांची जबाबदारीही महत्त्वाची आहे. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करणे, मद्यपान करून वाहन न चालविणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. रस्ते कितीही चांगले असले तरी वाहनचालकांनी नियमांचे पालन केले नाही, तर अपघात टाळणे कठीण आहे. त्यामुळे ‘सुरक्षित प्रवास’ ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी ठरणार आहे.









