धक्कादायक घटना; अंध आई आणि चिमुकल्याला विहिरीत ढकललं, मुलाचा मृत्यू, आईच्या जबाबाने उलगडलं रहस्य, पती व सासू ताब्यात….

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे साडेतीन वर्षांच्या बालकाच्या मृत्यूच्या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. सुरुवातीला विहिरीत पडून झालेला अपघात म्हणून पाहिले जात असलेल्या या घटनेत, जखमी महिलेने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीला आणि सासूला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी सकाळी किनगाव शिवारातील शेतातील विहिरीजवळ ही घटना घडली. सरस्वती स्वप्निल पाटील, त्यांचे पती स्वप्निल पाटील आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा हे शेतात गेले होते. काही वेळातच आई आणि मुलगा विहिरीत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी कृष्णा याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तर सरस्वती पाटील यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आणि अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मात्र, घटनेतील काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पुढील चौकशी सुरू ठेवली. उपचारादरम्यान सरस्वती पाटील यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांना आणि त्यांच्या मुलाला विहिरीत ढकलण्यात आले असून या घटनेत पती स्वप्निल पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, कुटुंबामध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुलाच्या जन्मापूर्वी झालेल्या वैद्यकीय तपासणीत बाळाला दृष्टीदोष असू शकतो, अशी माहिती मिळाल्यानंतरही बाळाला जन्म देण्याच्या निर्णयावरून पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचा तपासाचा एक भाग आहे. या मुद्द्याचा आणि इतर सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1), 109(1) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून घटनेमागील नेमके कारण, उपलब्ध पुरावे आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून निष्पाप बालकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---