---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. कार, एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
.ही दुर्घटना मंगरूळ गावाजवळ सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी मार्गावरून प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावून समोरून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील पाच प्रवाशांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे.
अपघातग्रस्त कारमधील प्रवासी गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून ते एका कौटुंबिक साखरपुडा समारंभासाठी अमळनेरकडे येत होते.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. आपत्कालीन सेवा आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातात कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बसमधील एका प्रवाशालाही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनांचा वेग, रस्त्याची परिस्थिती आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे.आनंदाच्या क्षणांसाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.









