---Advertisement---
पाळधी बायपासजवळील टहाकळी फाट्यावर बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून मोबाईलवर बोलत असलेल्या २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या अंगावर कंटेनर पलटी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव किरण जनार्दन सोनवणे (२०, रा. दोनगाव, ता. धरणगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण हा महाविद्यालयीन कामासाठी दुचाकीवरून जळगावकडे निघाला होता. टहाकळी फाट्याजवळ असताना त्याच्या मोबाईलवर फोन आला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली आणि तो फोनवर बोलत उभा होता.
याचवेळी वळण घेत असलेल्या कंटेनरचा चालकाचा ताबा सुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कंटेनर थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या किरणच्या दुचाकीवर पलटी झाला. या अपघातात किरण गंभीररीत्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. किरणला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
किरण हा आई-वडील आणि लहान भावासह दोनगाव येथे राहत होता. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पाळधी बायपास परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. या मार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. अपघातप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती.









