---Advertisement---
पढावद गावातील विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल नामदेव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून एसटी बससेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याला अखेर यश आले असून, आज पढावद गावात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘लाल परी’चे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी उत्साहात लाल परीचे स्वागत केले.
पढावद गावातून शिंदखेडा व इतर ठिकाणी शिक्षण, नोकरी, व्यवसाय, बाजारपेठ तसेच वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱ्या नागरिकांना बससेवा बंद असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राहुल ठाकरे यांनी संबंधित एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करून बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
या मागणीसाठी धुळे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे साहेब, विभागीय वाहतूक अधिकारी बंजारा साहेब आणि शिंदखेडा आगारप्रमुख शिवदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. प्रशासनाच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे अखेर पढावद गावात लाल परी दाखल झाली.
लाल परीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
पढावद गावात लाल परीचे आगमन होताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत बसचे उत्साहात स्वागत केले. या स्वागतप्रसंगी शिवसेनेचे नेते मंगेश पवार, सामाजिक कार्यकर्ते राहुल ठाकरे, नानासाहेब पाटील, श्यामकांत ठाकरे, अशोक पवार, नामदेव ठाकरे, रवींद्र महाले, काशिनाथ पवार, गोपाल परदेशी, ॲड. कैलास पवार, निखिल ठाकरे, आधार अण्णा यांच्यासह समस्त ग्रामस्थ व पढावदकर मंडळी उपस्थित होती.
सर्वांनी एकत्र येऊन लाल परीचे स्वागत केले. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
बससेवा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीविषयक कामांसाठी, तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर ग्रामस्थांना बाजारपेठ आणि शासकीय कामांसाठी प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
या कामासाठी निवेदन देताना राहुल नामदेव ठाकरे यांच्यासोबत बाळूभाऊ ठाकरे, गणेश ठाकरे, काशिनाथ विठ्ठल बागुल सर आणि देविदास ठाकरे यांनीही सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्यामुळे गावाच्या हिताचा हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.
दरम्यान, पढावद गावात सुरू झालेली बससेवा नियमित सुरू राहावी आणि शिंदखेडा–बेटावद–मुडावद–पढावद या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच पूर्वी सुरू असलेली धुळे मुक्कामाची बससेवाही पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गावाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास सकारात्मक बदल घडू शकतो, हे या उपक्रमातून दिसून आले. बससेवेसाठी सहकार्य करणाऱ्या एसटी महामंडळाच्या अधिकारीवर्गाचे, कर्मचाऱ्यांचे आणि पढावद येथील समस्त ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.









