‘देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत’; मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची केली विचारपूस

---Advertisement---

 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन दिवसांच्या उपचारानंतर पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे रवाना झाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार त्यांच्यासोबत होत्या.

दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफ आणि थकवा जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू करून आवश्यक त्या तपासण्या केल्या. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हात उंचावून अभिवादन केले. सुप्रिया सुळे यांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

डॉक्टरांचा प्रवास कमी करण्याचा सल्ला

शरद पवार यांना पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच दौरे आणि प्रवास कमी करणे, आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारांनंतर त्यांचा आहार हळूहळू पूर्ववत होत असून अशक्तपणाही कमी होण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान मोदींचा फोन; आरोग्याची विचारपूस

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन केला होता. विठ्ठल मणियार यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली. मोदी यांनी पवार यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास आणि पुरेशी विश्रांती घेण्यास सांगितल्याचे मणियार यांनी नमूद केले. सुप्रिया सुळे यांच्यासोबत काम करण्याची तयारी व्यक्त करत पवार यांचे मार्गदर्शन पुढेही मिळत राहावे, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांचा दुष्काळी पाहणी दौरा आणि अन्य नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते काही दिवस मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---