‘फाईल फिरवता म्हणूनच…’; गुलाबराव पाटलांचा चव्हाणांना टोला, सावकारेंनी केलं कौतुक , मेळाव्यात हास्यकल्लोळ

---Advertisement---

 

पोलीस पाटील मेळाव्यात मानधनवाढीच्या प्रलंबित फाईलवरून राजकीय जुगलबंदी रंगली. आमदार मंगेश चव्हाण यांनी ही फाईल घेऊन पाठपुरावा करण्याची जबाबदारी घेतली, तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी चव्हाण यांच्या शैलीवर मिश्कील टोला लगावला. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही चव्हाण यांच्या फाईल मंजूर करून घेण्याच्या कौशल्याचे कौतुक केले.

‘काम झालं नाही तर दोघे जबाबदार’

पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा मुद्दा उपस्थित करत मंगेश चव्हाण यांनी आपण फाईल घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. “मी फाईल घेऊन फिरेल; मात्र काम झालं नाही तर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोघे जबाबदार असतील,” अशी मिश्कील टिप्पणी चव्हाण यांनी केली. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील यांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले.

‘आम्ही तुमची फाईल फिरवली की तुम्ही आमची’

“पोलीस पाटलांना सगळे राजकारणी घाबरतात. त्यामुळे मंगेश चव्हाण फाईल का फिरवतात, हे आता माझ्या लक्षात आलं. आम्ही तुमची फाईल फिरवली की तुम्ही आमची फाईल फिरवता,” असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

त्यांच्या या वक्तव्यामुळे मेळाव्यात उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.

‘मंगेश चव्हाण फाईल मंजूर करण्यात एक्सपर्ट’

दरम्यान, मंत्री संजय सावकारे यांनीही मंगेश चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले. “मंगेश चव्हाण फाईल मंजूर करून घेण्यात एक्सपर्ट आहेत. आमची एखादी फाईल अडकली तर आम्ही त्यांना सांगतो आणि ते ती मंजूर करून आणतात,” असे सावकारे म्हणाले.

महाजन-पाटलांचीही मिश्कील जुगलबंदी

याच मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यातही वयावरून मिश्कील टोलेबाजी रंगली. गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख ‘ज्येष्ठ आणि वयोवृद्ध मंत्री’ असा केला. त्यावर महाजन यांनीही “गुलाबराव पाटलांनी कितीही तरुण होण्याचा प्रयत्न केला, तरी ते जमणार नाही,” असा चिमटा काढला.

एकीकडे पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा महत्त्वाचा मुद्दा, तर दुसरीकडे नेत्यांमधील मिश्कील टोलेबाजी यामुळे जळगावमधील पोलीस पाटील मेळावा चांगलाच चर्चेत आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---