---Advertisement---
जळगाव जिल्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाळधी ते तरसोद दरम्यान मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवर रेल्वे उड्डाणपुलाजवळील भराव खचल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी, इतर शासकीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते.
पाहणीदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलने संपर्क साधत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत याबाबतही नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, हा बायपास अवघ्या वर्षभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात उड्डाणपुलाजवळील भराव खचल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, महामार्गावरील दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने वाहनचालकांना केले असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.









