---Advertisement---
फैजपूर शहरातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार उपसमिती परिसरात भरविण्यात येणाऱ्या बकरी बाजारामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करत शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाजार अन्यत्र हलविण्याच्या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास ३ जून रोजी जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रामराज्य सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधत हा बकरी बाजार कायमस्वरूपी शहराबाहेर हलविण्याची मागणी करण्यात आली होती. या बाजारामुळे राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना मानसिक, आर्थिक आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच बाजार परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भेट घेऊन बाजार स्थलांतराची मागणी मांडण्यात आली होती.
मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांनी तक्रारदारांशी अरेरावीची भाषा वापरत दमदाटी केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून यामुळे शहरवासीयांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
आमदार अनिल जावळे यांनीही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाजार शहराबाहेर हलविण्याबाबत आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतरही बुधवारी (२७ मे) पुन्हा बाजार भरविण्यात आल्याने “समस्या जैसे थे” असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
शहरवासीयांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, “या समस्येवर तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना न्याय द्यावा. अन्यथा ३ जून रोजी बाजाराच्या दिवशी मोठे जनआंदोलन उभारले जाईल.”









