---Advertisement---
भारतीय वायुदलात कार्यरत असल्याचे भासवून परिसरात रुबाब मिरवणाऱ्या एका तरुणाचे बिंग पुण्यात उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, त्याचा बनाव पोलिसांच्या कारवाईमुळे नव्हे, तर एका टेलरच्या सतर्कतेमुळे समोर आला. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी २६ वर्षीय शुभम अंबुर याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून शिरूर परिसरात सलूनमध्ये काम करतो. मात्र, आपल्या गावाकडे आणि परिचितांमध्ये तो आपण भारतीय वायुदलात नोकरीला असल्याचे सांगत होता. एवढेच नाही, तर एअरफोर्सचा गणवेश परिधान करून आपला वेगळा रुबाब निर्माण करण्याचा प्रयत्नही तो करत होता.
या बनावाचा पर्दाफाश करण्यासाठी लोहगावातील गुरुद्वारा कॉलनी परिसरातील एका टेलरची भूमिका महत्त्वाची ठरली. शुभम एअरफोर्सचा गणवेश शिवून घेण्यासाठी टेलरकडे पोहोचला. त्याने आपण वायुदलात असल्याचे सांगत युनिफॉर्म शिवण्याची मागणी केली. मात्र, टेलरने त्याच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली.
शुभमने दाखवलेल्या ओळखपत्राकडे पाहिल्यानंतर टेलरला संशय आला. यापूर्वी एअरफोर्सच्या जवानांचे गणवेश शिवल्याने आणि त्यांची ओळखपत्रे पाहिल्याने या कार्डमध्ये काहीतरी गडबड असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने वेळ न दवडता पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच लोहगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभमला ताब्यात घेतले. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. पोलिस आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत शुभम वायुदलात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले.
मृत जवानाच्या ओळखपत्राचा वापर
चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर आली. शुभमकडे असलेले एअरफोर्सचे ओळखपत्र एका जवानाचे असल्याचे निष्पन्न झाले. या जवानाचा २०२२ मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. मृत जवानाचे ओळखपत्र शुभमच्या हातात कसे आले, त्याने ते किती काळ वापरले आणि त्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
वर्दी आणि आयडी कुठून मिळाले?
या प्रकरणी भारतीय वायुदलाच्या तक्रारीवरून लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभमला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, शुभमने कोणकोणत्या व्यक्तींसमोर आपण एअरफोर्समध्ये असल्याचे सांगितले होते, त्याने गणवेश कुठून मिळवला आणि मृत जवानाचे ओळखपत्र त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.









