---Advertisement---
लग्न म्हणजे दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांच्या आयुष्याची नवी सुरुवात. विश्वास, प्रेम, आदर आणि परस्पर समजूतदारपणा या आधारावर संसार फुलत जातो. मात्र उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये समोर आलेल्या एका प्रकरणाने अनेकांना धक्का बसला आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पतीवर लग्नानंतर कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत, तसेच सासरच्या मंडळींनी उपचाराच्या नावाखाली पाच लाख रुपयांची मागणी करून मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिलेचे लग्न 19 नोव्हेंबर 2021 रोजी लखनऊ येथील एका युवकासोबत मोठ्या थाटामाटात झाले होते. महिलेच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी सुमारे 15 लाख रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे. लग्नानंतर नव्या आयुष्याची स्वप्ने घेऊन ती सासरी गेली. मात्र तिच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीपासूनच पती तिच्यापासून अंतर ठेवत होता. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून तो शारीरिक संबंध टाळत असल्याचा आरोप तिने केला आहे.
महिलेच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कधी तब्येत ठीक नसल्याचे, कधी औषधे सुरू असल्याचे, तर कधी इतर कारणे देत पतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे टाळले. सुरुवातीला तिने परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कालांतराने ही बाब संशयास्पद वाटू लागल्याचे तिने म्हटले आहे. तिने अनेक वेळा पतीशी याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकवेळी विषय बदलला जात असल्याचा आणि समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा दावा तिने केला आहे.
अखेरीस सत्य समजून घेण्यासाठी महिलेने पतीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी आवश्यक तपासणीसाठी नमुना (स्पर्म सॅम्पल) देण्याचा सल्ला दिला. मात्र पतीने तपासणीसाठी सहकार्य करण्यास नकार दिला, असा आरोप महिलेने केला आहे. यानंतर सासरच्या मंडळींनी उपचारासाठी मोठ्या खर्चाची गरज असल्याचे सांगत माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली, असेही तिने पोलिसांना सांगितले आहे.
महिलेच्या आरोपानुसार, तिने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर तिचा मानसिक छळ सुरू झाला. घरातील गरजेच्या वस्तूही तिला दिल्या जात नव्हत्या. वारंवार अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती. महिलेचे म्हणण्यानुसार, अखेरीस तिला धक्काबुक्की करून घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिने गोरखनाथ पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.
महिलेच्या तक्रारीच्या आधारे गोरखनाथ पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारीतील सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जात असून दोन्ही बाजूंचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे आणि इतर पुरावे तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.









