‘फॉर्ममध्ये चूक आहे’ म्हणाले अन् लाखोंचा चुना लावला; SIRच्या नावाने सायबर फसवणूक

---Advertisement---

 

महाराष्ट्रात मतदान यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाची (SIR) प्रक्रिया सुरू असतानाच सायबर गुन्हेगारांनी याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदान यादीतील अर्जात त्रुटी असल्याचे सांगत सायबर भामट्यांनी वृद्धाच्या खात्यातून 4 लाख 43 हजार रुपये लंपास केल्याची तक्रार अलंकार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

‘फॉर्म दुरुस्त करा’ सांगत पाठवली APK फाइल

पोलिसांच्या माहितीनुसार , कर्वेनगर परिसरात राहणारे संबंधित नागरिक खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. 30 जुलै रोजी त्यांना सायबर गुन्हेगारांनी फोन आणि संदेशाद्वारे संपर्क केला. मतदार यादी दुरुस्तीच्या अर्जात काही चूक असल्याचे सांगून त्यांना एका फॉर्मची लिंक पाठवण्यात आली.

हा फॉर्म भरताना केवळ पाच रुपये शुल्क द्यावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या मोबाइलवर APK फाइल पाठवून त्यामध्ये बँक खात्याशी संबंधित माहिती भरण्यास सांगितले.

माहिती भरताच मोबाइलवर ताबा मिळवल्याचा आरोप

नोकरीतून निवृत्त असलेल्या या नागरिकाने समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून मागितलेली माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या मोबाइलचा गैरवापर करून बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे समोर आले.

काही वेळातच खात्यातून 4.43 लाख रुपये दुसऱ्या खात्यावर वर्ग करण्यात आले. व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नागरिकाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू

अलंकार पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. पैसे ज्या खात्यात वळवण्यात आले, त्या खात्याची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, SIRच्या नावाने फोन, मेसेज किंवा लिंक आल्यास नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी APK फाइल डाउनलोड करू नये, बँक खात्याची माहिती किंवा OTP कोणालाही देऊ नये, तसेच मतदार यादीशी संबंधित कोणतीही माहिती अधिकृत माध्यमातूनच तपासावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---