---Advertisement---
आंतरजातीय विवाहामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून एका २६ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्यात समोर आली आहे . या प्रकरणात मृत तरुणाच्या मेहुण्याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , प्रशांत चौधरी यांनी काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या समाजातील तरुणीशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. कालांतराने सर्व काही सुरळीत झाल्याचे भासवत मुलीचा भाऊ अभिषेक मोरे याने प्रशांतशी संपर्क वाढवल्याचा आरोप आहे.
27 जुलै रोजी अभिषेकने प्रशांतला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर दोघे एका दुर्गम भागात गेल्याचे तपासात समोर आले आहे. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अभिषेकने मोठ्या दगडाने प्रशांतवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. गंभीर जखमी अवस्थेतील प्रशांतला आरोपीने जंगलातील खड्ड्यात टाकून घटनास्थळावरून पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रशांत घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. शोधमोहीमेदरम्यान तो जंगलात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. प्रथम त्याला जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तपासादरम्यान पोलिसांनी अभिषेक मोरे याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून मृत तरुणाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आंतरजातीय विवाहाच्या रागातून हा गुन्हा घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला, तरी हत्येमागील नेमके कारण आणि इतर पैलूंचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फत्तेपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









