मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नायिका उर्मिला कोठारे हिच्या वाहनाला मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अपघात होऊन ती जखमी झाली होती.
मात्र, एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्मिलाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता.
परंतु, मुंबई पोलिसांच्या कारवाईवर उर्मिला नाराज आहे. याबाबत तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली.
या अपघाताचा तपास सीआयडी किंवा अन्य तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी तिने केली आहे. मुंबई पोलिस अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज देत नसल्याचा आरोपही याचिकेत केला आहे.
२८ डिसेंबर २०२४ रोजी उर्मिलाच्या कारचा मुंबईतील कांदिवली पोईसर मेट्रो स्थानकाजवळ अपघात झाला होता. उर्मिला चित्रीकरण आटोपून घरी परत जात होती.
त्यावेळी तिच्या कारने रस्त्याच्या कडेला मेट्रोचे काम करणाऱ्या दोन मजुरांना धडक दिली.
त्यात एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
या घटनेत उर्मिला व तिचा चालकही जखमी झाला होता. कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला.