---Advertisement---
वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीने स्वतःहून कारंजा पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची माहिती दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वेळी त्याच्यासोबत त्याची तीन लहान मुलेही होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणारा सलमान खान नेक खान हा पत्नी हसीना बानो आणि तीन मुलांसह कारने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने स्वतः कारंजा पोलीस ठाण्यात येऊन या घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनास्थळाची पाहणी आणि पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृत्यूचे नेमके कारण, घटनाक्रम आणि इतर सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
या घटनेतील सर्वात हृदयस्पर्शी बाब म्हणजे आरोपीसोबत असलेली तीन लहान मुले. आईचा मृत्यू झाला असून वडील पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर या मुलांची काळजी घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ही तिन्ही मुले थकव्यामुळे एका ब्लँकेटवर शांतपणे झोपून गेली. उपस्थित पोलिस आणि कर्मचाऱ्यांनाही हा प्रसंग भावूक करून गेला. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या पुढील संगोपनासाठी संबंधित बालकल्याण यंत्रणांशी समन्वय साधण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशीम जिल्हा पोलिसांकडून सुरू असून, न्यायवैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.









