अदृश्य हातांची सद्दी संपली?

जवळपास सहा दशके महाराष्ट्राच्या राजकारणात ‘इकडचे तिकडे’ करण्याच्या खेळातील प्रावीण्य दाखविणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा खूप मोठा भक्त परिवार महाराष्ट्रभर आणि काही प्रमाणात महाराष्ट्राबाहेरच्या राजकीय वर्तुळातही पसरलेला आहे. या भक्तांची पवार यांच्या राजकारणावर नितांत श्रद्धा आहे. अनेकांना ती श्रद्धा वाटत असली, तरी ती केवळ अंधश्रद्धा असावी, असेही अधूनमधून अनेकांस वाटते. तसेही, महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचे पान अंधश्रद्धेविना हलत नाही. गेल्या तीन-चार दशकांपासून चमत्कार हा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील परवलीचा शब्द ठरला आहे. काहीतरी चमत्कार होतो आणि राजकारणाची प्रस्थापित गणिते बिघडून नवेच काहीतरी निर्माण होते, असा अनुभव याच काळात महाराष्ट्राने अनेकदा घेतला आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तर चमत्कारावरच प्रगाढ विश्वास होता. चमत्कार होईल आणि महापालिकेवर, मंत्रालयावर भगवा फडकेल, असे ते जवळपास प्रत्येक निवडणुकीच्या काळातील जाहीर सभांतूनही सांगत असत. काही वेळा तसेच झालेही होते.

चमत्काराचा हा मंत्र त्यांनी जनतेच्या मनावर एवढा ठसविला होता की, महाराष्ट्रात प्रस्थापित असलेल्या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचून १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले, हा चमत्कारच ठरला होता. मात्र, या चमत्कारात एकट्या बाळासाहेबांचा वाटा नव्हता. मुंडे-महाजन ही भाजपमधील तेव्हाची ताकदवान जोडी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. त्यावेळी घडलेल्या त्या चमत्कारानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय चमत्काराच्या परंपरेविषयी देशभर कुतूहल निर्माण झाले होते. महाराष्ट्र हे पुरोगामी वगैरे विचारांचे राज्य असल्याचे म्हटले जात असले आणि चमत्कार, वचन वगैरे कल्पना म्हणजे अंधश्रद्धा आहे असे सांगितले जात असले, तरी २०१९ मधील सत्तापालट हा खरोखरीच चमत्कारच होता. त्यानंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कारांची मालिकाच सुरू झालेली दिसते. युतीसोबत निवडणुका लढून ऐनवेळी सत्तास्थापनेकरिता शरद पवारांचे बोट धरून उद्धव ठाकरेंनी पटकावलेले मुख्यमंत्रिपद हा तेव्हाचा चमत्कार तर अनेकांस अचंबित करणारा ठरला होता. त्यानंतरच्या चमत्कारांचा उभा महाराष्ट्र ‘याचि डोळा’ साक्षीदारच आहे. बाळासाहेबांच्या चमत्काराच्या श्रद्धेवर त्यांच्या अनुयायांचा विश्वास होता. तसाच शरद पवार यांच्या चमत्कारांवर श्रद्धा ठेवणारा अनुयायांचा वर्गदेखील आहे.

महाराष्ट्रात शरद पवार राजकीय चमत्कार घडवून आणू शकतात, असे या अनुयायांना वाटत असे. सध्या राजकारणात भक्त हा शब्द कुत्सितपणे वापरला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रगाढ विश्वास असलेल्या देशभरातील कोट्यवधी मतदारांची खिल्ली उडविण्यासाठी काही मूठभर विरोधक त्यांना भक्त म्हणून खिजवतात, पण हेच विरोधक एखाद्या वेळी भक्तिसागरात बुडून आपल्या नेत्यांच्या आरत्या ओवाळताना दिसतात. पूर्वी राजेशाही असताना, राजे महाराजांच्या पदरी भाट बाळगले जात असत. आपल्या धन्याच्या आरत्या ओवाळाव्यात, त्यांचे पोवाडे गात त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळावीत आणि त्यापोटी मिळणाऱ्या बक्षिसीच्या अपेक्षेने लाळघोटेपणा करीत राहावा हेच त्या भाटांचे काम असे. स्वातंत्र्यानंतर संस्थाने खालसा झाली. सरंजामशाही संपली आणि या भाटांनी स्तुतिसुमने उधळण्यासाठी लोकशाहीतील आपले संस्थानिक निवडले.त्यांच्या प्रतिमानिर्मितीसाठी सतत त्यांचे गुणगान करणे हाच त्यांचा उद्योग ठरला. शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या राजकारणाची आणि कथित मुत्सद्देगिरीची प्रतिमा प्रत्यक्षाहूनही उत्कट ठरावी यासाठी असे अनेक जण त्यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण करतात. त्यामुळेच शरद पवार हे महाराष्ट्राच्या आधुनिक राजकारणातील जाणता राजा वगैरे ठरविले गेले.

आपणास जाणता राजा म्हणा असे आपण कोणास सांगितलेले नाही, असे मागे एकदा पवारांनी स्पष्ट केले होते. पण पवारभक्तांना ते मान्य नसावे. पवार यांच्या अंगी जाणतेपण आहेच आणि चमत्काराची ताकदही आहे, अशी या भक्तांची असीम श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या पुष्ट्यर्थ काही वेळा त्यांनी घडविलेल्या चमत्कारांचा दाखलाही दिला जातो. तसेही, पवार हे अनाकलनीय राजकारणी आहेत, अशीही अनेकांची भावना आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्तास्पर्धेत आपण कोठेच नाही, याची जाहीर कबुली देताना पवारांच्या आतल्या गोटातील राजकारणात काय शिजत होते त्याचा पत्ता त्यावेळी कोणासच लागला नव्हता. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालून त्यांना युतीतून फोडणे आणि महाविकास आघाडीची मोट बांधून काँग्रेसलाही सत्तेत सहभागी करून घेणे हा चमत्कार त्यांनी घडवून आणल्यावर, त्या गोटातील भक्तांच्या अंधभक्तीला महापूर आला. शरद पवार काहीही करू शकतात, असे त्यांचे भक्त छातीठोकपणे सांगू लागले. शरद पवार यांचे दोन हात दिसत असले, तरी त्यांना आणखी दोन हात आहेत व ते हात अदृश्य असले तरी त्या हातांची करामत अधूनमधून दिसू शकते, असा त्यांच्या काही भक्तांचा थेट दावा होता.

वस्तुत:, चमत्कार ही जेवढी अंधश्रद्धा आहे, तेवढीच पवार यांना अदृश्य हात असल्याची समजूत हीदेखील अंधश्रद्धाच आहे. पण पवारभक्तांनी या अंधश्रद्धेस समाजातही रुजविण्याचा चंग बांधला. शरद पवार यांचे अदृश्य हात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कोठेही काहीही चमत्कार घडवून आणू शकतात, असे या भक्तांना वाटू लागले. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा विजय ही शरद पवारांच्याच अदृश्य हातांची करामत होती, असेही त्यांच्या काही भक्तांनी छातीठोकपणे सांगितले होते. सध्या राज्यात प्रचंड चर्चेचा मुद्दा ठरलेल्या आरक्षणाच्या गुंत्यातही शरद पवारांचा अदृश्य हात असल्याचे काहींना वाटते. राज ठाकरेंच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यास विरोध करणाऱ्या भाजप खासदारास पवारांच्या अदृश्य हातांनीच रसद पुरविल्याची भावना मनसेनेही बोलून दाखविली होती. शरद पवारांच्या या कथित अदृश्य हातांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा धुमाकूळ घातला की, काहीही घडले तरी त्यामागे शरद पवारांचा अदृश्य हात असल्याची शंका व्यक्त करणारी कुजबूज गावखेड्यातील गप्पाष्टकांतूनही व्यक्त होऊ लागली होती.

पवारांच्या या अदृश्य हातांचा आणि चमत्कारशक्तीचा फुगा गेल्या काही महिन्यांत एवढा फुगला होता की, त्यास कधीतरी लहानशी टाचणी लागेल आणि तो अचानक फुटेल, असेही काहींना वाटू लागले. महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा सत्ताकाळ संपविण्याचा चमत्कार घडला आणि पवारांच्या चमत्कारशक्तीची सद्दी संपल्याची जाणीव महाराष्ट्रास होऊ लागली. तब्बल सहा दशकांच्या अनाकलनीय राजकारणाची सारी पाने उघडी झाली आणि पवार आता पहिल्यासारखे राजकीय शक्तिमान राहिले नाहीत, यावर एकमताचा सूर उमटू लागला. ज्या पवारांनी अन्य पक्षांना खिंडारे पाडून स्वबळ वाढविण्याचा प्रयत्न केला, राज्यातील काही प्रस्थापित राजकीय घराण्यांतील बिनीचे मोहरे आपल्या पक्षाच्या गळास लावून अन्य पक्ष खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच पक्ष व कुटुंबावर हा डाव नेमका उलटला आणि चमत्काराचा खेळ अंगाशी आल्याची जाणीव बहुधा पहिल्यांदाच भक्तांना झाली. अजित पवारांचे बंड ही पवारांच्या चमत्कारशक्तीला आव्हान देणारी घटना होती. त्यांनी चतुरपणाने बांधलेल्या महाविकास आघाडीचा डोलारा या खेळीने आणखीनच डळमळीत तर झालाच; पण पवारांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकून भविष्यातील राजकीय केंद्रस्थान बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा जनाधारही खालावत चालला.

पवार यांच्या अदृश्य हातांच्या कहाण्यांना आव्हाने देणारे सूर उमटू लागले. मराठा आरक्षणाचा गुंता सोडविण्यासाठी पवारांचे अदृश्य हात जाणवले नाहीत, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि आत्महत्यासत्र थांबविण्यासाठी पवारांचे अदृश्य हात का पुढे आले नाहीत, असे थेट प्रश्न विचारले जाऊ लागले आणि हे अदृश्य हात शक्तिहीन करणारा एक राजकीय मांत्रिक महाराष्ट्रास सापडल्याची चर्चा सुरू झाली. २०१९ मधील पवारकृत चमत्कारास तेव्हाच आव्हान देणाèया देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याची पवारांनी तेव्हा जोरदार खिल्ली उडविली होती. पवारकन्या सुप्रिया सुळे यांनी तर, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ म्हणून फडणवीसांच्या त्या गर्जनेस खिजविले होते. त्यामुळे दुखावलेल्या फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ या दाव्यापासून एक अथक प्रवास सुरू केला. तो प्रवास राजकीय प्रतिशोधाचाच म्हणावा लागेल. Pawar-politics ‘मै समंदर हूं, लौटकर आऊंगा’ असे भर सभागृहात जाहीर करून विरोधकांना अस्वस्थ करणाऱ्या फडणवीस यांनी त्यानंतर चमत्कारांची कला आत्मसात करून पवारांनाच धोबीपछाड दिली.

‘ठाकरे सरकार पाडण्यासाठी मी कोणत्याही पक्षात फूट पाडणार नाही; ते सरकार स्वकर्मानेच कोसळेल’ असे सांगून विधानसभेतच फडणवीस यांनी तेव्हा दिलेल्या आव्हानाचा एक प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यानच्या काळात, फडणवीस यांनी पवारांच्या दुटप्पी राजकारणाचे मुखवटे फाडण्याचेही धाडस दाखविले. नऊ वर्षांपासून स्वत: शरद पवार भाजपसोबत सत्तेची भागीदारी करण्याकरिता कसे प्रयत्नशील होते, याचा पाढादेखील फडणवीस यांनी वाचला आणि पवारांच्या अनाकलनीय समजल्या जाणाऱ्या राजकारणाचे पदर उलगडत गेले. Pawar-politics पवार यांच्याशी चर्चा करूनच अजितदादांसोबत सरकार स्थापन केले होते आणि पवारांनी घूमजाव केल्यामुळेच ते सरकार अल्पजीवी ठरून कोसळले असे सांगताना, ‘धोका देणाऱ्यांना माफी नाही, आपण तो कधीच विसरत नाही’ असा इशाराही फडणवीस यांनी जाहीरपणे दिला होता. आता ग्रामपंचायतींच्या ताज्या निवडणुकांत भाजपाला ग्रामीण महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवून देताना फडणवीस यांनी आपले शब्द खरे करून दाखविले आहेत. Pawar-politics सत्तेच्या वाटाघाटीत शरद पवारांनी केलेले घूमजाव आणि युती मोडून मुख्यमंत्रिपदावर बसलेले उद्धव ठाकरे यांनी पाठीत खुपसलेला खंजीर या दोन बाबी आपण कधीच विसरणार नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या फडणवीस यांनी आपले शब्द खरे केले आहेत.

पवार यांच्याच पक्षात पडलेली फूट, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वास आव्हान देऊन बाहेर पडलेल्या शिंदेंचे बंड ही त्यांच्या नेतृत्वास दिली गेलेली अंतर्गत आव्हाने आहेत, हे सिद्ध करून, ठाकरे सरकार स्वकर्माने पडेल, ही भविष्यवाणीदेखील फडणवीस यांनी खरी करून दाखविली. ‘मी पुन्हा येईन’ या त्यांच्या आव्हानाची खिल्ली उडविणारे आणि ‘हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा’ असे प्रतिआव्हान वारंवार देणारे विरोधक आता ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांनंतर काहीसे मूक झाले आहेत.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे राजकारण सहकार, कृषी आदी क्षेत्रांवर पकड असल्याने शरद पवार यांच्या मुठीत असल्याची समजूत ग्रामपंचायत निवडणुकांनी फोल ठरविली आहेच; पण पवार यांचे बोट सोडल्यानंतर अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याविषयी वेगवेगळी भविष्ये वर्तविणाèयांनाही या निकालांनी चोख उत्तरे दिली आहेत. अजित पवार हे शरद पवार गटापेक्षा सक्षम राजकारणी ठरले आणि महायुती हा महाराष्ट्रातील भक्कम पर्याय आहे, यावर या निवडणुकांनी शिक्कामोर्तबही घडविले. निवडणुका घेण्याची आव्हाने देणारा ठाकरे गट ग्रामपंचायत निवडणुकांत सर्वांत शेवटच्या स्थानावर ढकलला गेला आणि ग्रामपंचायत निवडणुकांना पक्षीय रंग नसतो, अशी सारवासारव सुरू झाली. वस्तुत: ग्रामीण महाराष्ट्रात कागदोपत्री नसूनही प्रत्येक निवडणुकीत राजकारणाचे रंग स्पष्ट उमटत असतात आणि त्याच्या जोरावरच निकालांचे विश्लेषण होत असते.

महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकांतील भाजपा-शिवसेना-अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने महाविकास आघाडीस कात्रजचा घाट दाखविल्याचे स्पष्ट झाल्याने आता राजकारणातील प्रतिशोधाचा अध्याय अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. पहाटेच्या त्या शपथविधीविषयी शरद पवारांना कल्पना होती, हे फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर शरद पवारांची राजकीय विश्वासार्हता पणास लागली होती. त्यावर सारवासारव करणे भागच असल्याने, ‘ती तर आपली गुगली होतीङ्क असे शरद पवार म्हणाले, तेव्हाही त्यांच्या भक्तगणांत आदराचा महापूर लोटला होता. राजकारणाच्या पटावरील डाव पवार कधीच हरत नाहीत, अशा समजुतीत असलेल्या भक्तांना आता धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या इंडिया आघाडीचे अस्तित्व अजूनही डळमळीत आहे. पवारांच्या त्या गुगलीवर फडणवीस बाद झाले असे समजणाèयांना थेट सत्तापालटाचा धक्का देऊन फडणवीस यांनी उत्तर दिले आहे आणि ज्या पद्धतीने राजकारणाच्या पटावर समोरून खेळी होईल, त्याच पद्धतीने ती चाल परतवून मात केली जाईल, या देवेंद्र फडणवीस यांच्या सूत्राने सत्तेच्या राजकारणातील अंधश्रद्धेचे खèया अर्थाने निर्मूलन केले आहे. आता चमत्काराच्या राजकारणावरील श्रद्धेचे पारडे फडणवीस यांच्या बाजूने झुकू लागले आहे. ग्रामपंचायतींच्या निकालांनी नव्या समीकरणांची मांडणी सुरू झाल्याचे दाखविले आहे. या स्पर्धेत आता शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक असलेली शिवसेना यांचा किती टिकाव लागणार, त्याचे नवे आडाखे बांधण्यासाठी भक्तांना आणि भाटांना नवे पोवाडे रचावे लागणार आहेत.
– दिनेश गुणे