आनंदी जीवनासाठी वैचारिक दृष्टी !

विधायक अहम् म्हणजे अभिमान! विघातक अहम् म्हणजे अहंकार! अभिमानाचा अतिरेक झाला की गर्व निर्माण होतो. आपण कोणीतरी वेगळे आहोत, याचे जोखड मानेवर चढले की बोलण्यातले मार्दव लोपतं. अभिमान कृतज्ञतेचीही गळचेपी करतो. अभिमान दूषणांना आमंत्रण देतो. अनावश्यक टीकेला सामोरे जावं लागतं, त्यातून ती अहंपणाची मालिका कशी शिगेला पोहोचते कळतही नाही.कोणत्याही व्यक्तीला अहम् भावना ही कार्योद्युक्त करीत असते, यात शंका नाही. मुळात माणूस जन्मजात वाईट नसतोच. परिस्थिती बदलते, पर्यायाने माणूसही. लोभ हे सर्व दु:खाचं, त्रासाचं मूळ. लोभ फक्त पैशांचा नसतो, प्रसिद्धीचा व माणसांचाही असतो. कुणाला पैशाचा, कुणाला प्रसिद्धीचा, कुणाला सत्तेचा, कुणाला यशाचा लोभ या सगळ्यास कारणीभूत ठरतो. लोभ जोवर निकोप असतो, मर्यादित असतो तेव्हा तो लोभसवाणा असतो; नाहीतर त्याचं महत्त्व उरत नाही.अदम्य इच्छाशक्ती आणि प्रखर महत्त्वाकांक्षा या प्रत्येक मर्यादांवर उत्तर म्हणून काम करतात. गर्व आणि ताठरता फार काळ टिकत नाही.

गर्वाला ऐसपैस जागा न देता, साधेपणाला स्वच्छंद विहार करू द्यावा. आपुलकीने तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांच्यासाठी तुमचा दुराग्रह आणि स्वाभिमान सोडणे कौतुकास्पदच. काही चुकलं असेल तर ते मान्य करून क्षमायाचना करणे यात खरे मोठेपण दडले आहे. समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीसकट माफ करून स्वीकारलं, तर गैरसमजाला जागा उरणार नाही. प्रयत्न शब्दाला पर्याय नाही.तथापि, आनंदमय जीवन जगताना कधीतरी प्रयत्नांना यश येत नाही. आनंदात असणारे लोक अफाट प्रयत्न करताना दिसतात, काहींना मात्र नशिबावर रडण्यात धन्यता वाटते. वाटेत आलेला दगड हा अडथळा आहे की पायरी, हे समजणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. आपल्या सुख-दु:खाला आपण जबाबदार असतो. आयुष्य जगताना, आपल्या कृतीतून समोरच्या माणसाला क्षणार्धात जिंकता येऊ शकते. अशी शक्ती असते शब्दांमध्ये, शब्दांत व्यक्त करता येणाऱ्या भावनांमध्ये. सगळेच सुखाच्या, परिपूर्णतेच्या, समाधानाच्या शोधात असतात. संगीतामध्ये ‘ठेहराव’ हा एक शब्द प्रचलित आहे. ठेहराव म्हणजेच थांबणे. कधी कधी हा ‘वेलकम ब्रेक’ आपल्याला हवं असलेलं आऊटपूट लगेच मिळवून देतं.

आनंद काही मूर्त वस्तू नाही. तेव्हा जर तो गवसला तर नक्की टिकवून ठेवावा.संतापलेल्या संत शिरोमणी ज्ञानोबा माउलींनासुद्धा शांत करण्यासाठी मुक्ताबाईला ताटीचे अभंग सांगावे लागले होतेच ना! मुळात राग येणं ही स्वाभाविक कृती आहे; फक्त शांत होणं हीसुद्धा एक गरज आहे. व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी बहिर्मुखता किंवा बोलण्या-चालण्यातला मोकळेढाकळेपणा, खुल्या दिलानं संपर्क करण्याची वृत्ती मानसिक आरोग्यासाठी लाभदायक आहे. आपुलकी, स्नेह, भावना ही परस्पर प्रेमाची एक सुंदर भावनिक कोमलता आहे.जिथे सहृदयता प्रत्ययास येते आणि मानवी जीवनात सहृदयतेला खूप महत्त्व असून ती सहृदयी आपुलकी म्हणजे सात्त्विक मनःशांतीचा महासागर आहे. मानसिक सुखाचा शाश्वत आधार आहे. आजची कलियुगी वास्तवता आपण कुणीच नाकारू शकत नाही. आपुलकी, प्रेम, प्रत्येकाला अपेक्षित असते. विज्ञानाने मनुष्याला अनेक साधन आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या, परंतु त्याच बरोबर आपली मानसिकता ही दिवसेंदिवस बदलत गेली.प्रकृतीचा, चारित्र्याचा अन् मूल्यांचा èहास झाला तर तो सर्वनाश ठरेल. मूल्यांमधून संस्कृती समृद्ध होते.

कवी बोरकरांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ‘अमृत घट भरले तुझ्या घरी का वणवण फिरशी बाजारी…?’ निसर्ग हे आनंदाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. कलाकाराला आपल्या कलासाधनेतून, शिक्षकांना विद्यादानातून, क्रीडापटूंना खेळातून कमाल आनंद होतो. तात्पर्य, आनंद हा ज्ञानाप्रमाणे देण्याने वाढतो. happy-life-pleasure अहंकारामधील मूळ शब्द ‘अहम् ‘ हा आहे. मात्र, अतिरेक झाला तर त्याच ‘अहम् ‘ ने माणसाची प्रगती खुंटते. थोरामोठ्यांचा आदर, लहानग्यांबद्दल आस्था या संस्कारांच्या अधिपत्याखाली समाज होता. हल्ली ‘ऊँचे लोग, ऊँची पसंद’ म्हणत गुटख्याच्या पुड्यांचा वापर, महागड्या गाड्या, सर्वत्र शानशौकिन जपणारा वर्ग यामुळे हाती नेमकं काय लागणार? रक्षक होऊनी भक्षकांनी भूमी तीळ तीळ कुरतडली अशी बिचारी अवस्था आहे. निव्वळ नाव ठेवणे, तक्रारी करणे यापलीकडे जाऊन दुसरं काही दिसतच नाही. happy-life-pleasure वयस्कर लोकांना मदत करणे, अपघात झाल्यास त्यांच्या सहाय्यतेसाठी झटपट करणं, अनोळखी व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करणे या गोष्टी यासाठी लोप पावत चालल्या आहेत.

कारण आजकाल आपल्याला आपल्या कुटुंबातील चार लोक सोडूनसुद्धा नातेवाईक आहेत, स्नेही आहेत, शेजारी आहेत ही भावनाच कुठे नसते.मी बरं माझं काम बरं’ हा स्टॅन्ड चुकीचा नाहीये, पण अलिप्तपणा हे त्यावरचे उत्तर नाही. माणसाची श्रीमंती असेल तर त्याचा अभिमान असावा, धनाचा अहंकार कधीही नसावा. भारताची प्राचीन संस्कृती विसरून पाश्चात्त्य देशाच्या भोग-विलासी संस्कृतीला आपण हात मिळवत आहोत. संस्कार आणि संस्कृती यांचा संबंध समजून घेण्यासारखा आहे. भूक लागल्यावर खाणे ही आहे प्रकृती. भूक लागल्यावर दुसऱ्याच्या हातचे काढून खाणे ही आहे विकृती. तेव्हा स्पर्धामुक्त, तणावमुक्त, आनंदयुक्त आणि समाधानयुक्त असं आयुष्य जगण्याचा संकल्प करूया.

९८६०२९१८६५

हिमगौरी देशपांडे