आमच्या गावात आमचे सरकार!

संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभांमधील भारताच्या भूमिकेची चर्चा झाली नाही, असे कधीही होत नाही. राष्ट्र संघाच्या आमसभा अनेक भारतीय नेत्यांनी गाजविल्या. ज्या ज्या वेळी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत भारतीय नेत्यांनी भूमिका मांडल्या, त्या त्या वेळी संबंधितांना न्याय मिळालेला आहे. दहशतवादाच्या मुद्यावर भारताने सातत्याने मांडलेल्या भूमिकेमुळेच पाकिस्तानवर जगात एकाकी पडण्याची पाळी आली. चीनच्या साम्राज्यवादी धोरणावर भारताने सातत्याने ताशेरे ओढून या देशाला समतोल भूमिका घेण्यास भाग पाडले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना खलिस्तान्यांबाबतच्या भूमिकेबाबत नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले. डिजिटायझेशनमुळे जगातील अनेक देशात रुपये चलनाचा सुरू झालेला वापर डॉलरची धडधड वाढवणारा ठरत आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी काल राष्ट्र संघाच्या आमसभेत भारताला उगाच सूचना न करण्याचे ठणकावून विरोधकांना गप्प बसविले. भारताला स्वतःच्या जबाबदाऱ्या माहीत आहेत, त्या कुणीही सांगू नयेत. निवडक देशांनी अजेंडा तयार करायचे आणि त्यानुसार इतर देशांनी चालावे, अशी अपेक्षा करण्याचे दिवस आता संपले आहेत, असा घणाघातही त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत केला.

भारताच्या या भूमिकेमुळे राष्ट्र संघातील बनचुक्या देशांना निश्चितच एक कठोर संदेश गेला आहे. पूर्व-पश्चिमेतील ध्रुवीकरण तीव्र असताना आणि उत्तर-दक्षिणेतील विभाजन खोलवर गेले असताना, त्यावर मुत्सद्दीपणा आणि संवाद हाच एकमात्र प्रभावी उपाय असल्याचे दिल्लीतील जी-२० च्या शिखर परिषदेत स्पष्ट करण्यात आले होते, याचीही यानिमित्ताने आठवण करून दिली गेली. २०१४ पासून जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढत आहे. आज कोणत्याही देशाने बोलावे आणि भारताने त्यासोबत आपला आवाज मिळवावा, अशी परिस्थिती राहिलेली नाही. जगाला भेडसावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत भारताची स्वतंत्र भूमिका आहे. जगात ग्लोबल वॉर्मिंगबाबत बोलले जात आहे. इकॉलॉजीचे, पर्यावरणाचे जतन करण्याबाबत बोलले जात आहे. पण भारताने या बाबींचा कितीतरी आधी विचार केलेला आहे. आपले ऋषी-मुनी मुळात जंगलातच निवास करायचे. त्यामुळे त्यांना वृक्ष संवर्धनाचे ज्ञान पूर्वापार होते. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची त्याने प्राचीन काळापासून काळजी वाहिली आहे. प्रकृतीचे शोषण नव्हे दोहन करा, हा संदेश भारतीय ऋषी परंपरेनेच दिला आहे. त्यामुळे भारत प्रत्येक मुद्यावर बोलत आलेला आहे आणि त्या त्या मुद्यांबाबत तो विधायक सूचनाही करीत आला आहे.

आता जी-२० चेच उदाहरण घ्या. भारत सर्वांना सोबत घेऊन कसा चालतो, हे त्याने जगाला दाखवून दिले. भारताच्या अध्यक्षतेत आफ्रिकन युनियनला जी-२० च्या कार्यवाहीत सहभागी करण्यात आले तेव्हाच इतिहास रचला गेला. आता जगभरातील १०८ देश जी-२० चे सदस्य झाले आहेत. भारताला विविध भागीदारांसोबत संबंध बळकट करायचे आहेत. अलिप्ततेच्या युगानंतर आता ‘विश्वाचा मित्र- जगासाठी एक मित्र’ हे युग विकसित झाले आहे. हे वेगवेगळ्या देशांसोबत गुंतून राहण्याची आणि आवश्यक तिथे हितसंंबंध जुळवण्याची आमची क्षमता आणि इच्छा दर्शवते. यात क्वाडचा विकास दिसतो. कोविड काळात जग व्हॅक्सिनचा पुरवठा इतर देशांना करण्यासाठी टाळाटाळ करीत असताना भारताने जगाच्या कानाकोपऱ्यात लसी पुरविल्या आणि त्या लसींनी देशांच्या नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करण्यात जीवनरक्षकाची भूमिका बजावली. तत्पूर्वीचे ‘व्हॅक्सिन वॉरङ्कही भारताने अनुभवले. आधी भारताला लस निर्मिती करतानाही बरेच अडथळे पार करावे लागले. जगातील विकसित देश आणि आघाडीच्या औषध निर्मिती कंपन्या भारताला लसींचे उत्पादन करण्यापासून परावृत्त करीत राहिल्या. आपले लसीचे उत्पादन कसे दर्जेदार नाही, हेदेखील अनेकांनी सांगून झाले; पण भारताने नाद सोडला नाही आणि त्याने स्वतःची लस निर्मित करून जगात तिचे वितरणही केले. अखेर जगालाही भारतीय लसींची प्रतिबंधात्मक क्षमता सर्वाधिक असल्याचे मान्य करावे लागले.

आपल्याजवळ लसी आहेत आणि त्यांची जगाला गरज आहे, हे कळताच मोदींनी कोरोना लसी जगात पाठविण्याचे आदेश संबंधित मंत्रालयाला दिले. त्याच अनुषंगाने आता लस वर्णभेदासारखा अन्याय पुन्हा कधीही होऊ देऊ नये, अशी सूचना व्यासपीठाहून बोलताना जयशंकर यांनी केली. भारताने एकीकडे इस्रायलशी मैत्रिपूर्ण संबंध असताना दुसरीकडे पॅलेस्टाईनलाही मित्र बनविले. जगाला याचे आश्चर्य वाटले. पण भारताने २०१४ पासून आपल्या भूमिका उघड करणे सुरू केले. United Nations-India भारताने विभिन्न राष्ट्रांना भेटी दिल्या आणि मित्रत्वाचे धागे मजबूत केले. २०१४ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून नरेंद्र मोदींनी १०० हून अधिक परदेश दौरे केले आहेत. द्विपक्षीय संबंध बळकट करणे, आर्थिक सहकार्याला चालना देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि भारताचे जागतिक स्थान वाढविणे, हे त्यांच्या परदेश दौऱ्यांचे उद्दिष्ट आहे. हे सारे दौरे भारताची वाढलेली शक्ती दर्शवितात. ग्लोबल वॉर्मिंग असो, दहशतवाद असो, हिंसाचार असो, द्विपक्षीय संबंध असो, सर्वत्र भारताने आपल्या शब्दांची qकमत कशी वाढवली, यासाठीचे प्रयत्न दिसतात. जयशंकर युनोच्या अधिवेशनात बोलताना म्हणाले, दहशतवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचाराला राजकीय सोयीप्रमाणे प्रतिसाद दिला जाऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे आपल्या सोयीनुसार प्रादेशिक अखंडतेचा सन्मान आणि अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. काही देश असेही आहेत, जे एका निर्धारित अजेंड्यानुसार चालतात. मात्र, नेहमीसाठी ते अशाप्रकारे चालू शकणार नाहीत. त्याच्याविरोधात आवाज उठवणे आवश्यक झाले आहे. ज्यावेळी वास्तविकता वक्तव्यांपासून दूर जाते, त्यावेळी आपल्यात याविरोधात आवाज उठवण्याची हिंमत असली पाहिजे, असे जयशंकर यांनी सांगितले. भारताने अमृतकाळात प्रवेश केला आहे. आपली क्षमता जगाने ओळखली आहे. आमचे चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचल्याने चंद्रावर पोहोचणाèया मोजक्या देशांच्या मांदियाळीत आपण स्थान मिळविले आहे. आमचा शेजारी श्रीलंका आर्थिक संकटात होता; त्यावेळी सर्वांत पहिले आम्ही त्याची मदत केली. जगाने या मदतीचे कौतुक केले. चीन भूतानला कवेत घेण्याच्या कवायती करीत असताना आपणच भूतानच्या मदतीला धावून गेलो. आखाती देशांच्या मदतीला धावून जाणारा देश म्हणूनही भारताची ओळख तयार झाली आहे. मुस्लिम राष्ट्रांचा समूह अस्तित्वात असताना या समूहातील अनेक देश व्यक्तिशः भारतासोबतच्या व्यावसायिक, सांस्कृतिक संबंधांना महत्त्व देताना दिसत आहेत.

युक्रेन-रशिया युद्धात कुणा एका गटाची बाजू घेण्याचे अजूनही भारताने टाळले आहे. उभय देशांनी युद्धबंदी करून, एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप थांबवावे आणि जागतिक शांतीसाठी शस्त्रास्त्रांचा वापर थांबवावा, असे आवाहनही भारताने केले आहे. आपला शेजारी देश नेपाळ सांकृतिकदृष्ट्याही भारतासाठी जवळचा आहे. या देशातील हिंदू संस्कृती नामशेष करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू असताना भारताने या देशाच्या संस्कृतीची जबरदस्त पाठराखण केलेली आहे. या देशातील माओवाद संपावा, या देशातील सीमाप्रश्नांवर तोडगा निघावा, या देशातील अस्थिर राजकारणाची समाप्ती व्हावी, या दृष्टीने नेहमीच भारताने नेपाळकडे मदतीचा हात दिला आहे. निवडक देशांना अजेंडा ठरविण्याचे दिवस गेले, हे आपण कृतीतून दाखवून दिले आहे. भारतातील कितीतरी प्रकल्पांसाठी जागतिक बँकेच्या कर्जावर अवलंबून राहण्याची परिस्थिती आपण हद्दपार केली आहे. आपल्या देशातील रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी आपल्याच वित्तीय संस्थांच्या भांडवलाचा वापर आपली स्वयंपूर्णता आणि आत्मनिर्भरता वाढवत आहे. भारताच्या जागतिक उपस्थितीमुळेच आता राष्ट्र संघाच्या पूर्णवेळ सदस्यत्वासाठी भारताचे नाव जागतिक समुदायाकडून पुढे केले जाऊ लागले आहे.‘आमच्या गावात आमचे सरकार’ हा भारतासाठी विकासाचा मंत्र झाला आहे.