उत्तुंग व्यक्तिमत्त्व, समृद्ध जीवन!

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी साजरी झाली.त्याच दिवशीचा आणखी एक विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देणारे तत्कालीन केंद्रीय वित्त मंत्री, दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरू पदासह अनेक महत्त्वाची पदे भूषविणारे चिंतामणराव (सी. डी.) देशमुख यांचा स्मृतिदिन २ ऑक्टोबर रोजीच असतो. १९८२ साली त्यांचे देहावसान झाले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला केंद्रातील नेहरू सरकार वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुखांनी बाणेदारपणा दाखवत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आचार्य अत्रे यांनी आपल्या वृत्तपत्रातून संयुक्त महाराष्ट्राची मशाल पेटती ठेवली होती. चिंतामणरावांनी पदाचा राजीनामा दिला तेव्हा अत्रेंनी ‘चिंतामणी झाला कंठमणी’ हा लेख लिहून त्यांचा गौरव केला होता.

‘दि कोर्स ऑफ माय लाईफ’ हे चिंतामणरावांचे आत्मचरित्र १९७४ साली प्रकाशित झाले. त्यांचे जीवन किती बहुपेडी होते, याची कल्पना त्यांनी कथन केलेल्या असंख्य अनुभवांतून आणि आठवणींतून येऊ शकते. रामचंद्र कृष्ण लागू आणि पुढे महामहोपाध्याय म्हणून मान्यता पावलेले आणि भारतरत्न सन्मानाने गौरविले गेलेले पां. वा. काणे यांच्यासारख्या शिक्षकांकडून चिंतामणरावांना शालेय जीवनात संस्कृत शिकता आले.कालिदास रचित रघुवंश आणि अन्य संस्कृत महाकाव्ये चिंतामणरावांनी लहानपणीच मुखोद्गत केली होती; एवढेच नाही तर स्वत: संस्कृत काव्ये रचली होती. गंमत म्हणजे त्यांनी रचलेली संस्कृत काव्ये लिहिलेल्या दोन वह्या त्यांचे शिक्षक लागू यांनी जपून ठेवल्या होत्या. पुढे चिंतामणराव रिझर्व्ह बँकेत रुजू झाले तेव्हा लागू यांनी त्या वह्या आपल्या शिष्योत्तमाला सोपविल्या! चिंतामणरावांनी रचलेल्या संस्कृत काव्यांवर आधारित ‘संस्कृत काव्य मालिका’ हे पुस्तक १९७० च्या दशकात प्रकाशित झाले तेव्हा त्यात त्या वह्यांतील काही रचनाही समाविष्ट करण्यात आल्या होत्या.

मॅट्रिक्युलेशनची परीक्षा चिंतामणराव १९१२ साली उत्तीर्ण झाले.ते जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी ठरले. त्यांच्या त्या यशाने आनंदित झालेले प्रतिभावान लेखक आणि कवी राम गणेश गडकरी यांनी त्यावर ‘आनंद वर्धापन’ नावाची कविता लिहिली. गडकरी हे काही काळानंतर चिंतामणरावांचे शिक्षक लागू यांना भेटले आणि आपल्याला चिंतामणरावांचे छायाचित्र मिळावे अशी विनंती केली. लागू यांनी त्यास नकार दिला. गडकरी आपल्या अंतिम काळात नागपूरजवळील सावनेर येथे आपल्या ‘राजसंन्यास’ नाटकाचे लेखन करीत होते. चिंतामणराव तेथून सव्वाशे मैलांवर कामासाठी नियुक्त होते. पण गडकरी यांचे १९१९ साली निधन झाले. गोविंदाग्रज (गडकरी) आणि आपली भेट राहूनच गेली, याची खंत चिंतामणरावांना कायम राहिली. आयसीएससाठी चिंतामणराव इंग्लंडला गेले. ते शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण होत असतानाच्याच काळात लोकमान्य टिळक चिरोल खटल्यासंबंधात इंग्लंडला गेले होते. तेव्हा चिंतामणरावांनी त्यांची भेट घेतली.

आपण आयसीएस होत असलो तरी आपण राजकारणात भाग घेणे हे आपले कर्तव्य ठरते का यावर लोकमान्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे, अशी त्यांची इच्छा होती.तेव्हा ‘अजिबात नाही. भारताला आज ना उद्या स्वातंत्र्य मिळेलच; तेव्हा तुमच्यासारख्या प्रशिक्षित प्रशासकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता देशाला भासेल. तुम्ही प्रशासनाचे शिक्षण घेतले आहे. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन त्यातून काही फारसे चांगले साध्य होईल असे नाही’ असा मौलिक सल्ला लोकमान्यांनी त्यांना दिला. लोकमान्यांच्या द्रष्टेपणाचा प्रत्यय देणारा तो सल्ला होताच; पण चिंतामणरावांना किती उत्तुंग व्यक्तिमत्त्वांकडून सल्ला, मार्गदर्शन मिळाले याचेही लोभस दर्शन त्यातून घडते. प्रगत संस्कृतच्या काही परीक्षा चिंतामणरावांनी कलकत्त्यात जाऊन दिल्या. त्यावेळी त्याचा परिचय रवींद्र संगीताशी झाला. पुढे चिंतामणराव बंगाली भाषा शिकले. एवढेच नाही, तर रवींद्रनाथ टागोर यांच्या काही काव्यरचनांचे भाषांतर मराठीत केले.

मुंबईत रिझर्व्ह बँकेत कार्यरत असताना चिंतामणरावांचा परिचय लेखक-संशोधक अ. का. प्रियोळकर यांच्याशी झाला. त्यांच्याच संबंधित एका कार्यक्रमात चिंतामणरावांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने स्वायत्त असे संशोधन मंडळ स्थापन करावे, अशी सूचना केली. बी. जी. खेर मुख्यमंत्री असणाऱ्या सरकारने ती स्वीकारली आणि तसे मंडळ अस्तित्वात आले. प्रियोळकर त्याचे पहिले अध्यक्ष होते. याच सुमारास चिंतामणरावांनी कालिदासाच्या ‘मेघदूत’चे मराठी भाषांतर केले. पुण्यातील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) च्या नामकरणाच्या सोहळ्यास चिंतामणराव अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तेथे त्यांनी शिक्षणाच्या मूळ प्रयोजनाविषयी केलेले प्रकट चिंतन नावाजले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाले; त्याबरोबरच फाळणी झाली. रिझर्व्ह बँक ऑफ पाकिस्तानची स्थापना १९४८ सालच्या एप्रिलमध्ये झाली. तोवर म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळपास सात महिने चिंतामणराव रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि दोन्ही देशांच्या अर्थकारण प्रणालीचे नेतृत्व करीत होते. केंद्रीय वित्तमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान मंडळाच्या (युजीसी) अध्यक्षपदी झाली. पदाचे वेतन हे मंत्र्याच्या वेतनापेक्षा अधिक असल्याने आपण त्यासाठी मंत्रिपद सोडले, असा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी अवघा एक रुपया वेतनावर ते पद स्वीकारले. लोकापवादाची एवढी चिंता आजच्या काळात दुर्मिळ ! ‘शंकर्स विकली’ या व्यंग्यचित्रांना वाहिलेल्या साप्ताहिकाचे संपादक शंकर यांनी चिंतामणरावांना असे सांगितले होते की, ज्या दोन जणांना कधीही डिवचणारी व्यंग्यचित्रे आपण काढणार नाही त्यापैकी एक आहेत नेहरू आणि दुसरे आपण!

चिंतामणरावांनी वित्तमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मात्र त्या साप्ताहिकाच्या अंकात त्यावर काहीसा बोचरा आणि चिंतामणरावांच्या वैयक्तिक लकबींची खिल्ली उडवणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला. qचतामणरावांना आश्चर्य वाटले. त्यावर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवसांनी ते दोघे समोरासमोर आले; तेव्हा त्या लेखाचा ओझरता उल्लेख चिंतामणरावांनी केला. पत्रकार म्हणून ते आपले कर्तव्य असल्याचे शंकर यांनी म्हटले. काही वर्षांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू असताना एका घटनेनंतर शंकर यांच्या कन्येच्या विरोधात शिस्तभंग कारवाई आपल्याला करावी लागली; तेव्हा शंकर यांनी आपल्याला फोन केला होता आणि ते रागावलेले दिसले, अशी आठवण चिंतामणरावांनी लिहिली आहे. आणि आपणही कर्तव्यच बजावत होतो असे भाष्य केले आहे. चिंतामणराव यांनी यशाची शिखरे पार केली; तरीही ते नि:स्पृह राहिले. ते बुद्धिमान आणि कर्तव्यनिष्ठ होते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने समृद्ध जीवन जगलेल्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे स्मरण औचित्याचे ठरेल.

९८२२८२८८१९
– राहुल गोखले