खरा विश्व ग्रंथ दिवस

सध्या जो विश्व ग्रंथ दिवस साजरा केला जातो तो शेक्सपियरच्या आठवणींमध्ये केला जातो. तसे पाहिले तर शेक्सपियरच्या आधी भारतामध्ये कालिदासासारखे महान नाटककार होऊन गेलेले आहेत. परंतु, ज्या इंग्रजांचे राज्य संपूर्ण पृथ्वीवर होते साहजिकच त्यांचा डंका सर्वत्र वाजत आलेला आहे. त्यांनी जगामध्ये अनेक भौतिक शोध लावले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींमध्ये असं वाटतं की, ही गोष्ट आमच्याकडे पहिल्यांदा झालेली आहे. तीच कथा या विश्व ग्रंथ दिवसाची आहे.

नुकतीच गीता जयंती सर्वत्र साजरी करण्यात आलेली आहे. भगवद्गीतेच्या जन्माला 5168 वर्षे पूर्ण झालेली आहेत. कौरव आणि पांडवांचे सैन्य एकमेकांच्या समोर उभे होते. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्ण करीत होते. अर्जुन त्यांना म्हणतो की, वासुदेव; तुम्ही कौरव आणि पांडव या दोन्ही सैन्याच्या मधोमध माझा रथ नेऊन उभा करा; जेणेकरून मला बघता येईल की, मला कोणाशी लढायचे आहे. ज्यांच्याशी लढायचे आहे त्या कौरवांच्या सैन्यावर नजर टाकल्यावर अर्जुनाला असे दिसते की, त्यामध्ये पितामह भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. त्याचे अनेक भाऊ, नातेवाईक त्यामध्ये आहेत. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार येतो की, यांना मारून जर मला पृथ्वीचे राज्य मिळणार आहे तर ते काय कामाचे आणि त्यामुळे अर्जुन किंकर्तव्यमूढ होतो, मोहग्रस्त होतो आणि तो भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की, माझे ओठ शुष्क पडत चाललेले आहेत. माझ्या हातातून गांडीव धनुष्य खाली पडू बघत आहे. माझ्या पायांमध्ये उभे राहण्याची शक्तीही उरलेली नाही. असे म्हणून तो अर्जुन जो त्या काळचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता तो रथामध्ये खाली बसतो. त्याची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णांनी त्याला जो उपदेश केलेला आहे तो म्हणजे भगवद्गीता आहे. वास्तविक पाहता भगवद्गीता ही जगातील कुठल्याही धर्माच्या लोकांनी वाचली तरीही त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या गृहस्थाश्रमी माणसाला, संन्यासाला, कर्मयोग्याला, एखाद्या ज्ञानयोग्याला, ज्यांना ज्यांना जे काही प्रश्न आहेत त्या सर्वांचे उत्तर त्यांना भगवद्गीतेमध्ये मिळू शकतात इतकी भगवद्गीता थोर आहे. उपनिषद हे जर गाय असेल तर गीता हे गोदुग्ध आहे, असे म्हटले आहे.

किंकर्तव्यमूढ होणे ही अवस्था आहे. ही अवस्था व्यक्तीच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या कोणाच्याही जीवनामध्ये उद्भवू शकते. त्यामुळे अशा अवस्थेच्या प्रत्येक माणसाला मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आज आपण ऐन परीक्षेच्या वेळी ड्रॉप घेणारे म्हणजे परीक्षा देऊ न शकणारे विद्यार्थी बघतो. ऐन मुलाखतीच्या वेळेला जे भयग्रस्त होतात व मुलाखत नीट देऊ शकत नाही, असे पण विद्यार्थी बघतो. जीवनामध्ये कुठलेही भयाचे, क्रोधाचे, मोहाचे प्रसंग निर्माण झाल्यावर जे कर्तव्यच्युत होतात, असेही लोक आपण बघतो. ज्याप्रसंगी जी कामगिरी करायला पाहिजे होती ती कामगिरी जे लोक करू शकत नाही, असेही लोक आपण बघतो. या सर्वांसाठी भगवान श्रीकृष्णांचा उपदेश अत्यंत मौलिक आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, अर्जुना तू क्षत्रिय आहेस. तुझा धर्म युद्ध करणे आहे. धर्मासाठी युद्ध करणे आहे. त्यामुळे तू कोणाशी युद्ध करतो आहे हे बघू नकोस तर तू तुझ्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित कर. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात ‘हतो वा प्राप्ससी स्वर्गम्’ म्हणजे हे अर्जुना तू युद्धात मारला गेला तर तुला स्वर्ग मिळेल. कारण हे कुरुक्षेत्र हे धर्म क्षेत्र आहे. युद्धामध्ये कामी येणार्‍या वीर योद्ध्याला स्वर्गाची प्राप्ती होते. ही आपल्याकडे चालत आलेली मान्यता आहे. जर तू जिंकला तर तुला पृथ्वीचे राज्य मिळेल. म्हणून हे अर्जुना ऊठ आणि युद्धाचा निश्चय कर. ‘युद्धाय कृतनिश्चय:’

‘अर्जुनविषादयोग’ या पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे मन तयार केलेले आहे. कारण असे म्हटलेले आहे- ‘मन के हारे हार, मन के जीते जीत किंवा हारे मनसे कोई खडा नही होता।’ हरलेल्या मनाने कुठलेही युद्ध जिंकले जाऊ शकत नाही, हे भगवान श्रीकृष्णाला माहिती होते. म्हणून त्यांनी अर्जुनाचे मन सर्वप्रथम तयार केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, जे ज्ञान मी तुला देतो आहे हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला सांगितलेले होते. त्यावर अर्जुन म्हणतो की, तुम्ही व मी आपण आता या जन्मात आहोत. सूर्य तर फार प्राचीन आहे. सूर्याला तुम्ही हे ज्ञान केव्हा सांगितले? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात की, अर्जुना आज आपण दोघे आहोत, परंतु यापूर्वीसुद्धा तुझे व माझे अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. ते तू पाहू शकत नाही. ते तुझ्या स्मरणात नाही. परंतु ते माझ्या स्मरणात आहे. त्यामुळे तात्कालिक परिस्थितीवर आधारभूत निर्णय घेण्यापेक्षा संपूर्ण परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे हे केव्हाही चांगले असते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात- ‘यदा यदाही धर्मस्य’ ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला मी अवतार घेईल आणि माझ्या अवताराचा प्रमुख उद्देश काय असेल तर साधू लोकांचे रक्षण म्हणजे सज्जनशक्तीचे रक्षण आणि जे दुर्जन आहे या दुर्जनशक्तीचा संहार. त्यामुळे सज्जनशक्तीचे रक्षण हा प्रत्यक्ष भगवंताचा संकल्प आहे. दुर्जनशक्तीचा संहार हे प्रत्यक्ष भगवंताचे वचन आहे. त्यामुळे धर्म अधर्माच्या लढाईमध्ये आपण कोणाचे पक्षधर आहोत, आपण कोणत्या बाजूने उभे आहोत, हे बघणे अतिशय आवश्यक आहे. मोहग्रस्त अर्जुनाला भगवंत म्हणतात- ‘क्षुद्रम् हृदय दौर्बल्यम्…’ छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून हृदयाची जी दुर्बलता तुझ्यामध्ये निर्माण झालेली आहे, हे अर्जुना… त्या दुर्बलतेचा तू त्याग कर व उभा राहा.

मार्गशीष शुद्ध एकादशी या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितलेली होती. त्यामुळे हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. इतका अनुपम ज्ञान देणारा ग्रंथ आपल्या देशामध्ये निर्माण झाला तो सुद्धा त्यावेळेस जेव्हा आजचे विश्वातील प्रगत देश अस्तित्वातच नव्हते. आमच्याकडे मानव कल्याणासाठी असलेले ज्ञानाचे हे भंडार आम्ही संपूर्ण भारताला आणि त्यानंतर संपूर्ण जगाला देण्याची आवश्यकता आहे. अनेक साधू-संत हे कार्य करीत असतात. परंतु, भगवद्गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे अनेक लोक त्याला वाचायला धजत नाही. परंतु, आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की, आज आमचे विद्यार्थी फाडफाड इंग्रजी बोलू शकतात. अनेक विद्यार्थी जर्मन, जपानी, फ्रेंच इत्यादी भाषांचा अभ्यास करतात. एकेकाळी जगातील विद्वान भारतामध्ये येऊन भारतातील विविध ग्रंथांचा अभ्यास करायचे. त्यासाठी त्यांना संस्कृत भाषा शिकावी लागायची. संस्कृतही आमची भाषा आहे. ही भाषा आम्ही शिकली पाहिजे. एकमेकांना शिकविली पाहिजे. भगवद्गीता हा आमचा ग्रंथ आहे. ती आम्ही शिकली पाहिजे व इतरांना शिकविली पाहिजे. जगाची एक पंचमांश लोकसंख्या आमची आहे. शंभर कोटी लोक जर भगवद्गीता शिकतील तर संपूर्ण जगच भगवद्गीता शिकेल व ‘कृणवंतो विश्वम् आर्यम’ आम्हाला संपूर्ण जगाला श्रेष्ठ बनवायचे आहे, ही आमच्या पूर्वजांची घोषणा सार्थक ठरेल. असे होण्यासाठी ‘गीता जयंती’ या दिवसाला World Book Day राष्ट्रीय ग्रंथ दिवस व जागतिक ग्रंथ दिवस म्हणून साजरा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

-9552535813
– अमोल पुसदकर