गीता पाठ संकल्प !

– संगीता वाईकर

एखादा संकल्प मनात निर्माण होणे ही त्या परमेश्वराचीच कृपा आहे. त्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. असाच एक संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला केला गेला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संस्थांनी काही उपक्रम हाती घ्यावे, हा त्यामागचा एकमेव उद्देश ! Bhagavad Gita-Hindu या आवाहनाला धरमपेठ माता मंदिर पूजा वर्गाच्या गुरू विशाखा पाठक आणि भगिनी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ गीता पठनाचा संकल्प केला आणि अवघ्या सहा महिन्यात तो संकल्प सिद्धीस नेला. खरोखरीच हे कौतुकास्पद आहेच. या संकल्पामागची भूमिका होती ती देशसेवेची !

भगवद् गीता हा एक महान आणि पवित्र ग्रंथ आहे. पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्री कृष्णाने संभ्रमित झालेल्या अर्जुनाला कुरुक्षेत्रावर केलेला हा उपदेश आहे. वास्तविक, जीवनात आपण सारेच अर्जुनाच्या भूमिकेतच असतो. काय करावे आणि काय करू नये, याचा मनात नित्य गोंधळ सुरू असतो. अर्जुनाला पडलेले प्रश्न हे समस्त मानव जातीला पडलेले प्रश्न आहेत. Bhagavad Gita-Hindu भगवत् गीता म्हणजे महान जीवन मूल्यांच्या संरक्षणाप्रीत्यर्थ आणि प्रतिष्ठेसाठी लढणे हे क्षत्रियांचे आद्य कर्तव्य आहे. ही जीवन मूल्ये पायदळी तुडविणारे, अन्यायाने वागणारे कितीही आपले असले, तरी त्यांचे बलिदान देणे हेच क्षत्रियांचे कर्तव्य ठरते, हाच गीतेचा मुख्य संदेश ! श्रीमद्भगवद्गीतेच्या नववा अध्यायचे महत्त्व,भागवत गीतेतील आठवा अध्यायाचे महत्व

अशी ही गीता घरोघरी वाचली जावी. त्यावर मनन, चिंतन करावे आणि ती आचरणात आणावी. प्रत्येक जीव आपल्या पूर्वकर्मानुसार या जगात येतो, पण इथे आल्यावर आपल्या चांगल्या कर्माने तो पुढील जन्म प्राप्त करतो. Bhagavad Gita-Hindu मानव जन्म हाच एक असा जन्म आहे, ज्यात आपण कोणत्याही प्रकारे परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. हाच एक संस्कार मनात रुजला तर कोणीही वाईट कृत्य करणार नाही. कारण प्रत्येक वेळी मनात तो भगवंत सोबत असतो. म्हणूनच गर्भसंस्कारापासूनच गीता संस्कार होणे आवश्यक आहे आणि हेच काम या पूजा वर्गातील भगिनी करीत आहेत. वर्धेच्या श्रीकृष्ण मंदिरापासून झालेली सुरुवात नागपुरातील अनेक मंदिरात गीता पठन करून थेट मथुरा वृंदावन आणि कुरुक्षेत्र येथे समारोप केला गेला आणि आनंदाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात याची नोंद घेतली गेली. आता तर पाश्चात्त्य देशातदेखील भगवत् गीता अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे. Bhagavad Gita-Hindu मग आपल्या देशात ती असायलाच हवी. तीच आपली संस्कृती आणि तीच आपली ओळख आहे. आता तर कलियुगात या मूल्यांची फार मोठी गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत जे काही चालले आहे ते पाहता अनेक विकृतींनी जो काही धुमाकूळ घातला आहे ते बघता मन विदीर्ण होत आहे. धर्माचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणे, ही काळाची गरज झाली आहे.

कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग शिकवणारी गीता एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक हे काही अंशी का होईना नित्य आचरणात आणले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात गीता समाविष्ट केली तर कोवळ्या वयातच हे संस्कार मनात रुजतील. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल. प्रत्येक जीव सुखाच्या शोधात अहोरात्र धडपडत असतो, पण शांती, सुख आणि समाधान मात्र मिळत नाही. याचे कारण कशात आहे हेच मनाला उमगत नाही. मग जे आहे त्यात समाधान न मानता जे नाही त्याचा हव्यास धरला जातो आणि कायम असमाधान, अशांती आणि दुःखच पदरात पडते. मोक्षप्राप्ती हेच मानवाचं अंतिम ध्येय आहे. त्यासाठी प्रत्येकानेच बुद्धीने ज्ञानयोग, हाताने कर्मयोग आणि मनाने भक्तियोग करावा, हाच श्री कृष्णाचा अनमोल संदेश आहे. भगवत् गीतेतील प्रत्येक अध्याय म्हणजे एक योग आहे. श्रीकृष्ण स्वतः या योगाचे मूळ प्रवक्ते; म्हणूनच ते ‘योगेश्वर’ आहेत. मानव हा आयुष्यभर दुःखाशी एकरूप राहतो. या दुःखाचे कायमचे निर्मूलन म्हणजे हा योग आहे. गीता ही प्रत्यक्ष श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे आणि नुकत्याच झालेल्या अधिक श्रावण या निमित्ताने प्रत्येक दिवशी गीता पठन करण्याचे व्रत या पूजा वर्ग भगिनींनी केले, हे विशेष!

त्या निमित्ताने ‘घरोघरी गीता’ हा उपक्रम हाती घेतला. हे सर्व संकल्प आणि व्रत करताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सर्वांनी यात आनंदाने सहभाग घेतला. जीवनाचा मूळ उद्देश आनंद देणे आणि आनंद घेणे हाच आहे. गीता मुखस्थ, कंठस्थ आणि हृदयस्थ केली असता जीवनात आनंदाची उधळण होईल. आनंदाची प्राप्ती हेच तर जीवनाचे ध्येय आहे. आनंदाला भौतिक जगात शोधण्यापेक्षा जो आपल्या अगदी जवळ आहे, नित्य सोबत आहे, त्यालाच भेटता यायला हवं. नागपूरमधील गीता प्रबोधन प्रकल्प हाती घेतलेली एक संस्था म्हणजे ‘ज्ञानवर्धिनी.’ ही संस्था गेली ३४ वर्षे शालेय विद्यार्थ्यांसाठी गीता प्रबोधन प्रकल्प राबवित आहे. नैतिक शिक्षणासाठी एक प्रभावी माध्यम शाळांना उपलब्ध व्हावे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश ! गीता हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. त्याचा अभ्यास बालपणापासून केला जावा म्हणून निबंध स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, गीता प्रबोधन शिबिर, विविध सांस्कृतिक स्पर्धा घेऊन गीता जयंती उत्सव साजरा केला जातो. हा दिवस ‘विश्व ग्रंथ दिवस’ म्हणून संपूर्ण विश्वात संपन्न व्हावा, असा या प्रकल्पाचा प्रयत्न आहे.

गीता जयंतीच्या निमित्ताने ‘गीता साधना’ या स्मरणिकेचे प्रकाशन करून विजेत्यांचे लेख यात समाविष्ट केले जातात. गीता जयंती हा दिवस ‘विश्व ग्रंथ दिवस’ म्हणून साजरा व्हावा आणि या संस्थेचे स्वप्न साकार व्हावे हीच सदिच्छा ! गीता जयंती, जन्माष्टमी या निमित्ताने गीता पाठ, गीता पालखी, गीता ग्रंथ पूजन, गीता ग्रंथ शोभायात्रा यातून गीता प्रत्येक घराघरांत आणि मनामनांत आणि थेट हृदयात स्थानापन्न व्हायला हवी.  गीतेचा अभ्यास करावा, ती जाणून घ्यावी, यातून अनेक समस्यांचा उलगडा सहज होईल. संभ्रम नाहीसा होईल, निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल आणि मन बळकट होईल इतके सामर्थ्य या अनमोल ग्रंथात आहे. जिथे गीता आहे तिथे नैतिकता, श्री आणि विजय निश्चित आहे. वास्तविक सर्वसामान्य मनुष्याला जीवनात नैतिकतेने वागूनच ‘श्री’ म्हणजेच समृद्धी आणि यश प्राप्ती व्हावी, अशी इच्छा असते. ही मनोमन असलेली इच्छा गीताच पूर्ण करते आणि त्या योगे व्यक्तीचे सामाजिक उन्नयन साध्य होते.

९९२२५०४७९४