चारित्र्य विकसनाचे शिक्षण हवे !

प्रत्येक क्षेत्रातील आदर्श नागरिक घडविण्यासाठी आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणारा/शोधणारे म्हणजे शिक्षक. पूर्वी अगदी तुटपुंज्या पगारातून विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अविरत झटले.मध्यंतरीच्या काळात वाचण्यात आले की, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या सातत्याच्या वापराने बौद्धिक मांद्य, नैराश्य, आळस, एकाग्रतेचा ऱ्हास, स्वभावातली चिडचिड, हिंसक वृत्तीची वाढ आदी धोक्यांमुळे जवळपास २५ टक्के देशांनी शाळांमध्ये इंटरनेटची जोडणी असलेल्या साधनांच्या वापरावर कायद्याने किंवा धोरणात्मक बंदी घातल्याचे युनेस्कोने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.आजचे शिक्षण हे पूर्ण पुस्तकी स्वरूपाचे आहे. पदव्यांना अवास्तव महत्त्व प्राप्त होऊन त्या मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू होते. दिवसेंदिवस महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या दर्जाचे काय? आजच्या शिक्षण पद्धतीतून मनुष्य सुशिक्षित होतो, पण तो सुजाण, सुसंस्कृत होतोच असे नाही. वाचनाच्या अभावामुळे, नीतिमूल्यांचे संस्कार मुलांना मिळत नाहीत.

ज्ञान, कौशल्य, व्यक्तिमत्त्व निर्माण करून प्रत्येकाच्या आयुष्यात सुधारणा करून सभ्य मानवी जीवन तयार करण्यास शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. प्रत्येकाच्या आयुष्याच्या उत्कृष्टतेसाठी शिक्षण आवश्यक आहे. माणसांना उत्कृष्टच व्हायला आवडते. देशाचा व्यापक विकास देशाच्या विद्यमान शिक्षण प्रणालीवर अवलंबून असतो, हे शाश्वत सत्य आहे. मुलांच्या आकलनशक्तीला, निरीक्षणाला वाव मिळेल असे शिक्षण तर आहे, परंतु दुर्दैवाने प्रत्यक्ष चित्र वेगळे आहे. संवेदनशीलता, सातत्य, एकता यांनी युक्त अशा जीवनाची अनुभूती आणून देणे हा या शिक्षणाचा उद्देश असतो. मन आणि आत्मा यांतील सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय.

हल्ली या सर्व गोष्टी धाब्यावर बसवून स्पर्धा, आकस, हव्यास या पलीकडे दुसरे काहीही दिसत नाही. भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार या अशा बरबटलेल्या समाजात विद्यार्थ्यांनी आपल्या समोर आदर्श तरी कोणाचा ठेवायचा? स्वत:च्या बुद्धीचा वापर करण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थ्याची खरी गुणवत्ता कळू शकत नाही.

पदव्यांना अवास्तव महत्त्व प्राप्त होऊन त्या मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू होते. शिकलेल्या माणसाकडे एकवेळ माहितीचा खजिना असेल; परंतु शहाणपण असेलच असे नाही. सततची आंदोलने, संप यातून काय साध्य होते? पूर्वी कुटुंब मोठे असल्याने गरजाही तितक्याच होत्या.आता विभक्त कुटुंब पद्धती असूनही सतत मानधनांवरून, भत्त्यांवरून असमाधानच व्यक्त केले जाते. हजारो युवक-युवती उच्चशिक्षित असूनही बेरोजगार किंवा कॉन्ट्रीब्युटरी तत्त्वावर काम करतात, त्यांनी काय म्हणावे? असे म्हणतात की, अज्ञानात सुख असते. कसंय, सुशिक्षित माणसाला मोह असतो. लोभ सुटत नाही. दुर्दैवाने अशिक्षित माणूस मागचा-पुढचा विचार न करता कर्तव्य भावनेने त्याग करतो. स्त्री-पुरुष समानता हेही एक मानवी मूल्यच आहे. तरीही अजूनही त्याचे अवलोकन तितकसं दिसत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात,

बहुपर्यायी प्रश्न हा एकच पर्याय असेल तर वर्गातील अध्ययन-अध्यापन, सराव आणि शिकवलेल्या संबोधनांचा विद्यार्थ्यांकडून होणारा विचार हे सारे एकेका वाक्यात, एकेका शब्दात घुटमळत राहते. काहींना व्यापक उत्तर उत्तम लिहिता येते, पण एक पर्याय निवडताना त्यांचा गोंधळ उडतो. म्हणून ते अपात्रही सिद्ध होत नाहीत. हल्ली पदव्या घेतलेल्या अनेकांना एखाद्या कुठल्याही विषयावर सलग पाच वाक्येदेखील स्वविचाराने लिहिता येत नाहीत. बोलणे तर दूरच! ही बाब निंदनीय आहे.शिक्षकांना एवढीच विनंती आहे की, परीक्षार्थी संकल्पना कायमची बंद व्हावी. विद्यार्थ्यांना सात्त्विक, सोशिक, प्रसंगी कणखर, सुशिक्षित, देशप्रेमी घडवा. प्रत्येक क्षेत्रातील आदर्श व्यक्ती ही शिक्षकांमुळेच समाजाला लाभते. विद्यादानाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणालाही दुखवायचा उद्देश नाही. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम विचारांची पिढी असणे अत्यावश्यक आहे.
९८६०२९१८६५
हिमगौरी देशपांडे