धनुर्धारी ओजस !

आई-वडिलांनी बालपणात ठेवलेले नाव ‘ओजस’ आज खरं ठरत आहे. कारण ओजसचा अर्थ होतो चमक; जे मुलाने खरे करूनच दाखविले. फक्त घराण्याचचं नव्हे, तर देशाचं नाव जागतिक पातळीवर चमकविले आहे.आम्ही नागपूरकर भौतिक विकासाच्या बाबतीत मागासलेल्या, खेळाच्या बाबतीत तीच परिस्थिती. २०१४ सालानंतर परिस्थिती बदलली. ओजसमुळे शहरातील खेळाचा वातावरणात चकाकी आली. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीला सार्थक ठरविणारे काही प्रसंग वाचकांसमोर ठेवतो.ओजस लहान असताना स्वतःच्या घरचा झाडू मारण्याच्या खराट्यासोबत दुसऱ्याच्या घरच्या खराट्यातील काड्या काढून त्याचा ‘तीर’ बनवून धनुर्धारी बनण्याचा छंद जोपासत होता. याकरिता आईकडून अनेक वेळा मारसुद्धा खाल्ला आहे, पण हाच लुटपुटीचा खेळ त्याच्या आयुष्यात ओजस अथवा चकाकी आणणार याची कल्पना फक्त व फक्त नियतीलाच होती.

प्रत्येक पालकाला वाटतं की, त्यांच्या पोटात घराण्याचं नाव लौकिक करणारा कुलदीपक जन्मास यावा; पण हा नशिबाचाच खेळ असतो.या उलट आपण जर बारकाईने बघितलं तर लक्षात येईल की, ज्या प्रकारे मोठ्या वृक्षांच्या सावलीत त्यांच्याच रोपट्याची वाढ बरोबर होत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. उदा. नामवंत व्यक्ती ज्या क्षेत्रात नामांकित झाले त्या क्षेत्रात त्यांचीच पिढी त्या प्रकारचे नाव कमवू शकलेली नाही. पण हे प्रत्येक संदर्भात खरेच ठरेल असे छातीठोकपणे आपण म्हणू शकत नाही. ‘ओजस’ला असा काही वारसा नव्हता. दोघा भावांपैकी हा अभ्यासात कमजोरच होता.आई-वडिलांपैकी आईत जिद्दी व कणखरपणा जास्त असल्याकारणाने मुलाच्या भविष्याला घेऊन अमाप चिंता ! पण मुलाचा कल अभ्यासापेक्षा या खेळात जास्त, हे लक्षात येताच पालकांनी स्वतःच्या मानसिकतेत बदल केला आणि हा बदलच मुलाच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. या करिता पालकांचं शतशः आभार मानतो.

आपला मुलगा डॉक्टर व्हायला हवा यासाठी लाखो रुपये खर्च करून कोटाला (राजस्थान) पाठवितात. त्या बापड्याची मानसिक तयारी आहे किंवा नाही, याची काळजी न घेता, प्रचंड अपेक्षा ठेवणाऱ्या अशा पालकांची मुले, स्वतःच्या आयुष्याशी खेळ खेळतात. अशा अव्यवहारी किंवा अघोरी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांसमोर बोध घेणारेच हे उदाहरण ठरेल. ओजसला सुवर्ण पदक मिळताच पंतप्रधानांसोबत बैठक असणारी चित्रे, शहरातील वर्तमानपत्रातून मिळालेली प्रसिद्धी, मान-सन्मान या सर्वांकडे बघून स्वाभाविकपणे कोणीही आकर्षितच होईल. पण हे दिवस या २१ वर्षांच्या तरुणांच्या आयुष्यात येण्याकरिता त्याला किती कष्ट सहन करावे लागले, याकडे खासकरून नवीन पिढीचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. ojas deotale-nagpur कारण आयपीएलला जेव्हापासून सुरुवात झाली, त्यात मिळणारा पैसा-प्रसिद्धी बघून अनेक माता-पिता झाशीच्या राणीच्या रूपात आपल्या पुत्राला पाठीशी बांधून क्रिकेट मैदानावर घेऊन जाताना दिसतात.

ओजस या खेळाच्या प्रशिक्षणाकरिता मोठा ताजबागसारख्या वस्तीत अगदी छोट्याशा खोलीत सहा महिने वास्तव्याला होता. कारण त्याचा प्रशिक्षक त्याच वस्तीतला होता. वयाने लहान; त्यातल्या त्यात पाठीवर खेळण्याचं सामान घेऊन दररोज शक्य नसल्याकारणाने सुखवस्तू घरात राहणारा हा मुलगा कोणत्याही गोष्टीची चिंता व नाक न मुरडता त्या वस्तीत राहिला. कोरोनाच्या महामारीत पहिल्या टाळेबंदीमध्ये गुमगाव (समृद्धी महामार्गाजवळ) येथे स्वतःच्याच शाळेत चार महिने मुक्कामी होता. शाळा जरी स्वतःची असली, तरी ग्रामीण भागातली. राहण्याची सोय नाही, वीज नाही, मच्छरांचा त्रास. शाळेतील महिला कर्मचारी छाया रक्षक स्थानिक रहिवासी असल्याने जेवणाचा डबा आणून द्यायची. हे सर्व सोसण्याचं कारण? शहरात पोलिसांच्या भीतीमुळे घराच्या बाहेर निघता येत नव्हते. प्रशिक्षणाकरिता शाळेचेच पटांगण, शहरापासून दूर असल्यामुळे कोणत्याही गोष्टीची अडचण नाही.

प्रत्येक गोष्ट ब्रॅण्डेड हवी. उदा. चड्डी-बनियान; जी कोणाच्याच नजरेस पडत नाही; तीसुद्धा ब्रँडेड हवी अशा मानसिकतेत वावरणाऱ्या तरुणांनी यापासून बोध घ्यावा.सुखवस्तू घरात जन्मास आलेल्या या मुलाकडे बघता, महाभारताच्या त्या प्रसंगाची आपणास जरूर आठवण येईल. त्या युगातील उत्कृष्ट धनुर्धारी अर्जुनाला जेव्हा प्रश्न विचारला गेला ‘तुला काय दिसतं?’ उत्तर होतं ‘पोपटाचा डोळा!’ या काळातील धनुर्धारीला कशाचीच चिंता न करता त्रास, घाणेरडी वस्ती याकडे दुर्लक्ष करून एकच ध्यास होता- सुवर्ण पदक! ऑगस्ट २३ पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या आदल्याच दिवशी खांद्याच्या मागील भागाच्या स्नायूत मोठी दुखापत होती. एक कृष्णवर्णीय फिजिओथेरपिस्ट महिला त्याच्यावर उपचार करीत होती तेव्हा असह्य वेदनेने ओजस किंचाळत होता, याचा व्हिडीओ जेव्हा त्याच्या वडिलांनी मला दाखविला, मी ताबडतोब बंद करायला लावला.

कारण, ज्या प्रकारे ओजस किंचाळत होता ते बघवले जात नव्हते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या पठ्ठ्यानं सुवर्णपदक पटकावलं. राज्यसभेत उपराष्ट्रपतींद्वारे कौतुक-अभिनंदन आणि राष्ट्रपती भवनात जेवणाचं आमंत्रण. नागपूरच्या भेटीत त्याच्या सोबत झालेल्या चर्चेत दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.आपला भारत देश क्रीडाविश्वात नावारूपाला येत आहे. त्याचे प्रमुख कारण भारत सरकारची क्रीडा क्षेत्राबाबत असणारी २०१४ नंतरची बदललेली मानसिकता. दुसरं जे माझ्या निदर्शनास आलं, ओजस तुझ्यात असणारी विनम्रता ती जपून ठेव.ओजस, ज्यांनी तुझा संघर्ष बघितला आहे. फक्त तेच तुझ्या यशाची किंमत समजू शकतात. बाकीच्यांकरिता तू नशीबवान व्यक्ती आहेस.
– प्रणय पराते