धर्मनिरपेक्षतेची कावीळ !

सुविद्य आणि बुद्धिमान माणूस पक्षपाती नसतो असे काही नाही. बुद्धिमान माणसाने पक्षपाती असू नये, असा कुठे नियमही नाही आणि जर प्रत्यक्ष भगवंत पांडवांचा पक्षपाती होता, तर सामान्यजनांनी आणि त्यातही बुद्धिवंतांनी पक्षपाती असायला अजिबातच हरकत नाही. फक्त कुठे आणि कोणत्या कारणांसाठी भगवान कृष्ण पक्षपाती झाला, याची जाण ठेवलेली बरी. आजकाल कुणीही चार पुस्तकं लिहिली की, स्वतःला बुद्धिवादी, बुद्धिमंत, विचारवंत म्हणवून घेतो. यात मुंबईत राहून अग्रलेख पाडणाऱ्या आणि सतत धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडवणाऱ्या काही संपादकांचादेखील समावेश होतो. विषय सध्या चालू असलेल्या उदयनिधी स्टॅलिन नावाच्या, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असलेल्या आणि मंत्रिपदी बसलेल्या उथळ राजकारणी माणसाने सनातन हा शब्द वापरून हिंदू धर्मावर अकारण केलेल्या टिप्पणीचा आहे. जो वाद चालू होता त्यामध्ये उतरण्याची खरं तर वेळही टळून गेली होती. पण धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यासाठी बुद्धी गहाण टाकणाऱ्या संपादकांनी आगीत तेल ओतण्याचे आपले काम केले नसते तरच नवल! ‘सनातनी (धर्म) संकट’ असा मथळा देत या गहाणबुद्धी संपादकांनी अकलेचे तारे तोडत आपल्या राजकीय आणि सामाजिक निष्ठा पुन्हा एकदा जगजाहीर केल्या.

५०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि इस्लामला त्याच्या मुळ स्वरूपातच नेऊ पाहणाऱ्या वहाबी पंथावर काही एक लिहिणं यांना आयुष्यात जमणार नाही. कारण, सारा जन्म भेकड तत्त्वज्ञान सांगत, हिंदुत्वविरोधी लिहीत, स्वतःचे स्वार्थ साधण्यात काही जण धन्यता मानतात. कॅथोलिक ख्रिश्चन धर्मात असलेल्या अनेक गोष्टींवर हे चुकूनही कधी लिहीत नाहीत. यांना हिंदू धर्मात कधीच नसलेल्या, हिंदू समाजात कधी काळी अपवादानेच असलेल्या आणि इंग्रजी प्रशासनाने हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी मोठ्या केलेल्या सतिप्रथा किंवा तत्सम काही प्रथा मात्र आजही दिसतात. सतत फक्त हिंदू समाजाचा बुद्धिभेद करण्याचा वसा घेतलेले असे हे माध्यमवीर खरं म्हणजे दखल घेण्याची लायकीदेखील हरवून बसले आहेत. पण जेव्हा प्रश्न हिंदू आणि त्यातही सनातन qहदू धर्माचा येतो तेव्हा उत्तर देणे गरजेचे होते. यांना सनातन धर्म म्हणजे काय हा प्रश्न पडतो. कारण काही करून उदयनिधी स्टॅलिनवरून लोकांचे लक्ष विचलित करायचे असते. धर्माची जी सनातन व्याख्या कणाद मुनींनी केली ती, निसर्गातील संसाधनांचा वापर आणि त्याद्वारे ऐहिक दृष्टीने सुखकर जीवन तसेच माणसाची उन्नती या दृष्टिकोनातून केलेली आहे. कणाद मुनी म्हणतात, ‘यतो अभ्युदयो निश्रेयस सिद्धीही स धर्मा:।’ ही व्याख्या मानवी जीवनाच्या दोन्ही अंगांचा विचार करते.

अभ्युदय म्हणजे ऐहिक बाजू. मानवी जीवन सुखी करण्यासाठी आवश्यक अशी सर्व प्रकारांची समृद्धी असणं म्हणजे अभ्युदय. तर, निश्रेयस म्हणजे आध्यात्मिक उन्नती होय. कणाद मुनींच्या मते, ज्यामुळे माणसाचं वैयक्तिक जीवन सुखी होईल तसेच त्याची आध्यात्मिक व सामाजिक उन्नती होईल ती कृती किंवा धारणा म्हणजे धर्म होय. ही व्याख्या धर्म या गोष्टीला सामाजिक, आर्थिक आणि पारमार्थिक दृष्टीने स्पष्ट करणारी आहे आणि सनातन हिंदू धर्म म्हणजे काय हे स्पष्ट करणारी आहे. सनातन धर्म म्हणजे विविध शाश्वत कर्तव्यांचा समूह होय, या अर्थाची टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयानेही केलेली आहे. राष्ट्राप्रती, कुटुंबाप्रती, समाज आणि निसर्गाप्रती विविध कर्तव्ये जी काळसुसंगत असतात ती स्पष्ट करून सांगितलेली कर्तव्य म्हणजे सनातन धर्म होय, असा अर्थ सहजच काढता येणे शक्य आहे. पण या तथाकथित निधर्मी लोकांना योग्य त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवायच्याच नसतात.प्रत्येक हिंदू संकल्पना विकृत करून सांगण्यातच यांना रस असतो. मग सनातन हिंदू धर्म समाजाला नको आहे, या निष्कर्षाप्रत त्यांना पोहोचायचे असते. पुढे हे सनातन हिंदू धर्म नक्की कोणती तत्त्वे सांगतो वगैरे मुद्दे उपस्थित करीत जातात. वास्तविक हिंदू धर्माची तत्त्वे यांना चांगलीच माहिती असतात. ती सांगून समाजाचे, वाचकांचे संभ्रम दूर करण्याऐवजी, समाजाचे शिक्षण करण्याऐवजी ते आपल्या वाचकांना संभ्रमित करण्यात धन्यता मानतात.

आज भारतात अनेक प्रदेशात तसेच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जाती व्यवस्था संपविण्यात आम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहोत. पण स्वतःला पुरोगामी धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या याच लोकांच्या मनातून ती गेलेली नाही, असेच म्हणावे लागते. आज संपूर्ण व्यवस्था बदललेली असताना यांना सनातन धर्माचा पुरस्कार करणे म्हणजे जाती व्यवस्था, सप्तबंदी, गुरुगृही जाऊन शिक्षण घेणे वगैरे गैरलागू मुद्दे आठवतात. पुराण काळात आजच्यासारखे दुचाकी वा चारचाकी वाहने नव्हती, असले फडतूस मुद्दे फक्त हिंदुत्वाचा अभिमान वाहणा-यांचा मानभंग करण्यासाठी जेव्हा वापरले जातात तेव्हा अशा बुद्धिवंताची खरी लायकी दिसून येते. हेच कधी मेणबत्ती जाळणाऱ्या आणि दिवसाला पाच वेळा लाऊडस्पिकरचा वापर करणाèया अन्य धर्मीयांना विचारण्याची यांची हिंमत नसते. सामान्य माणसांचा माध्यमांवरील विश्वास अशा तथाकथित पुरोगामी धर्मनिरपेक्ष बुद्धिवंतांच्या पक्षपातीपणामुळे उडाला आहे. जर या देशात सनातन हिंदू धर्माची पताका वर वर जाऊ लागली तर इतके दिवस प्रयत्न करीत असलेली पाश्चिमात्य वसाहती मानसिकता आणि पेरणी केलेली वैचारिक गुलामी या समाजातून, या देशातून नष्ट होईल. ही निराश करणारी जाणीव आज चर्चप्रणीत सर्व ख्रिश्चन विचारांवर तसेच संस्थांवर पसरलेली आहे.

हिंदू समाजाला भुलवण्यासाठी त्यांनी केलेले अनेक प्रयोग अयशस्वी झालेले दिसत आहेत. christians-hindutva-attack हिंदूंना भुलवण्यासाठी येशूच्या आरत्या, येशूचे सत्यनारायण, धर्मगुरूंनी भगवे झगे पांघरणे आणि अनेक खोट्या गोष्टींची सरमिसळ अशा अनेक क्लुप्त्यांचा वापर केल्यावरही, त्यावर चार अंगुळे उरणारा सनातन हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांना आता अस्वस्थ करते आहे. विविध प्रदेशांमध्ये मंदिरात देण्यात येणाऱ्या दानांची रक्कम सरकारद्वारे काढून घेतली जाते. हिंदू धार्मिक संस्था बंदोबस्त कायद्याने फक्त हिंदू देवस्थानांवर अनेक प्रादेशिक सरकारांनी नियंत्रण प्रस्थापित केले आहे. हिंदू देवस्थानांवर विश्वस्त मंडळांवर सरकारे आपला प्रतिनिधी नियुक्त करतात. उत्पन्नाचा हिस्सा प्रादेशिक सरकारे काढून घेतात, पण हिंदू धर्म वृद्धीसाठी, हिंदू हितासाठी मात्र खर्च करीत नाहीत. त्याचवेळी इतर धर्मीय संस्थांना अनुदाने देण्यात येतात, हे कळल्यावर अनेक हिंदू लोकांनी दानाची रक्कम दानपेटीत टाकणे बंद केले आहे. हिंदू देवस्थानांवर आपल्या प्रतिनिधीमार्फत नियंत्रण प्रस्थापित करताना विविध प्रादेशिक सरकारे ख्रिस्ती चर्च आणि मशिदींवर मात्र आपला प्रतिनिधी नियुक्त करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या जाणिवेतून हिंदू आजकाल मंदिरांच्या दानपेटीत पैसे टाकत नाहीत. विविध परदेशी फाऊंडेशनद्वारे येणाऱ्या मदतीवर आता बराच चाप बसला आहे.

वैचारिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम असलेला हिंदू समाज व देशातील हिंदू सरकार यामुळे वैचारिक, सांस्कृतिकदृष्ट्या हिंदूंवर मानसिक गुलामी लादण्यात आपण अयशस्वी होत आहोत, या जाणिवेतून एकेश्वरवादी धर्म आणि त्यांच्या संस्थांमध्ये आज अस्वस्थता पसरली आहे. या निराशेतूनच उदयनिधीसारखा फडतूस माणूस, सनातन धर्म साथीच्या रोगासारखा असल्याने त्याला संपवायच्या वल्गना करतो. तर एक ज्येष्ठ संपादक हिंदूंचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. यांना आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, आपल्या वारश्याचा विसर पडलेला दिसतो. या सगळ्या घडामोडी सनातन हिंदू धर्माचे चिरंतनत्व अधोरेखित करतात. आज सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती संकटात नसून एकेश्वरवादी धर्म आणि विशेषतः चर्चप्रणीत हिंदुत्वविरोधी विचारधारा संकटात आहे. ख्रिश्चन चर्चचा अनेक शतकांपासूनचा अजेंडा आज संकटात असलेला दिसून येतो. बिंबवलेली वसाहती गुलामीची, पराभूतीची मानसिकता जर बदलून गेली तर हा देश पोखरून कायम पाश्चिमात्य विचारसरणीचा गुलाम कधीही करता येणार नाही, या जाणिवेतून असली वक्तव्य केली जात आहेत. सर्व हिंदू समाजाने याला कणखरपणाने एकत्र येत सनातन हिंदू धर्मावरील आपला अतूट विश्वास व्यक्त करणे, हेच या छिद्रान्वेशी लोकांना उत्तर होय.
९८८१२४२२२४
डॉ. विवेक राजे