नागपूर अधिवेशन महायुतीला सोपे

– मोरेश्वर बडगे

3 महाराष्ट्र विधिमंडळाचे दरवर्षी हिवाळ्यात उपराजधानी नागपूरला भरणारे अधिवेशन नेहमीच सत्ता पक्षाला घाम फोडणारे राहत आले आहे. नागपुरात सरकार कुठल्या ना कुठल्या कारणाने टेन्शनमध्ये येते. शिवसेनेतील पहिली मोठी फूट पडली ती १९९१ च्या नागपूर अधिवेशनातच. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ आदी शिवसेनेचे १२ आमदार काँग्रेसमध्ये गेले. हे पक्षांतर नाट्यमय पद्धतीने आमदारांना लपवून ठेवत घडले होते. मात्र, यावेळी तसले कुठलेही वातावरण नाही. आहे ते पावसाळी वातावरण आणि त्यामुळे वाढलेली थंडी. तीन राज्यांच्या निवडणूक निकालामुळे विरोधी पक्ष मरगळला आहे. तीन राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस फुटेल अशा चर्चा सुरू झाल्या. पण फुटायला आता काँग्रेस शिल्लक आहे कुठे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार अशा ट्रिपल इंजिनचे सरकार प्रचंड आत्मविश्वासाने नागपूरच्या आखाड्यात उतरत आहे.  महायुती बमबम आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत हे स्पष्ट झळकले.

फडणवीस यांच्या मुकाबल्यात कोणीही नाही. विरोधक कधी नव्हे एवढे दुबळे झाले आहेत. विरोधकांकडे सरकारला घेरू शकेल असा विषयच नाही. १० दिवसांचे अधिवेशन का घेता? हा विषय होऊ शकत नाही. कारण अलिकडे सारेच १० दिवसांवर नागपूरची तहान भागवत आहेत. ‘मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा,’ असे आव्हान उद्धव ठाकरे देतात. मात्र, हा विषय न्यायप्रविष्ट आहे, ही गोष्ट ते लपवतात. किती लपवालपवी करणार? उद्धव आपल्यासाठी कर्ज ठरत आहेत, हे धूर्त शरद पवारांच्या लक्षात आले आहे. पवार असो की ठाकरे, दोघांनाही भविष्य नाही. ठाकरेंना भाजपा आता जवळ घेणार नाही. मात्र, पुतण्याप्रमाणे शरद पवार कधीही भाजपाचे बोट धरू शकतात. ते दिवस दूर नाहीत. ‘इंडिया’ आघाडीचा ‘दांडिया’ झालाच आहे. आता आपल्याकडेही ‘पोळा फुटेल.’ महाआघाडीतल्या दोन्ही काँग्रेस नागपूर विधानसभेवर वेगवेगळे मोर्चे काढत आहेत, यावरून काय ते ओळखा. जे एकत्र मोर्चा काढू शकत नाहीत ते एकत्र काय लढणार?

तुम्ही लिहून ठेवा; काँग्रेसही महाआघाडीतून बाहेर पडेल. साधा तर्क आहे. बुडत्या जहाजात कोण किती वेळ थांबणार? लवकरच उबाठाची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झालेली दिसेल. खूप मस्ती केली शरद पवारांनी. अजित पवारांचा मुलगा पार्थला गेल्या निवडणुकीत मावळमध्ये कोणी पाडले, हे सर्वांना ठाऊक आहे. तो हिशोब यावेळी बारामतीत अजितदादा चुकता करतील. नणंद-भावजय लढाईकडे राज्याचे लक्ष असेल. महाराष्ट्राने काका-पुतण्याचे युद्ध पाहिले. आता एक नातू आपल्या आत्याला म्हणजे पार्थ हा सुप्रिया सुळे यांना हरवून गेल्या पराभवाचा बदला घेणार आहे. शरद पवार आणि त्यांची टोळी गेली ५० वर्षे राजकारणात आहे; पण कधीही हरलेली नाही. यावेळी भूकंप होणार! नागपूर अधिवेशनासाठी विधान भवन सजले असले, तरी सर्वांना २०२४ च्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे नागपूरच्या कामकाजात किती लक्ष लागेल ते पाहावे लागेल. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी संकट आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि घोषणांच्या पूर्ततेसाठी पुरवणी मागण्या चर्चेला घेताना १० दिवस कसे निघून गेले, ते कळणार नाही.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधक गोंधळ घालू पाहतील.  सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ‘टिकणारे आरक्षण देऊ,’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणत आहेत. मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण हवे आहे. तसे करायला ओबीसींचा विरोध आहे. जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. तोवर अधिवेशनाचे सूप वाजलेले असेल. निवडणुकीचे नगाडे वाजू लागलेले असतील. जरांगे पाटील आपले ‘सैन्य’ घेऊन मुंबईमध्ये बसतील की मराठ्यांचा राजकीय पक्ष काढतील? जोरदार चर्चा आहे. या साऱ्या पृष्ठभूमीवर होणाऱ्या नागपूर अधिवेशनाचे विशेष असे महत्त्व आहे. विदर्भाने महाराष्ट्रात राहावे यासाठी नागपूर करार झाला. त्या करारानुसार राज्य सरकार दर हिवाळ्यात नागपुरात मुक्काम करते. पूर्वी सहा-सहा आठवडे अधिवेशन चालायचे. अलीकडे दोन-तीन आठवड्यात सरकार उडून जाते. अधिवेशनाचा मुक्काम कमी असला, तरी बऱ्याच घडामोडी घडतात. पूर्वीची मजा काही वेगळी होती. वेगळ्या विदर्भ राज्याची चळवळ तेव्हा जोरात होती. विदर्भ बंदच्या सलामीने सरकारचे स्वागत होई. जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात विधानसभेवर लाखा-लाखांचा मोर्चा धडक देत असे. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट चाले. लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फुटत. विदर्भाचे आंदोलन थंडावले आणि हा रोमांच संपला.

आजही मोर्चे निघतात; पण त्यात तो थरार नसतो. पंढरपूरच्या वारीप्रमाणे आजही आपल्या मागण्यांसाठी नागपूर विधानसभेवर नित्यनेमाने मोर्चा आणणाऱ्या अनेक संघटना आहेत.त्यांना इथे आश्वासने मिळतात आणि पुढील चर्चेसाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण मिळते. काही का असेना, या निमित्ताने नागपूर जिवंत होऊन उठते. एरवी ‘तुमच्या नागपुरात काही घडतच नाही,’ असा टोमणा विदर्भाच्या नशिबी असतो. अधिवेशनाच्या काळात वाहतुकीची कोंडी होते म्हणून नाकं मुरडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अधिवेशनासाठी सरकारी फौजफाटा नागपुरात आणला जातो. तमाम मंत्रिमंडळ, १० हजार अधिकारी-कर्मचारी सध्या आले असून त्यांच्यासाठी बाहेरून ८५० वाहनांचा ताफा आणला आहे.  गडबड होऊ नये म्हणून तब्बल ११ हजार पोलिस तैनात केले आहेत. नागपूर अधिवेशनावर किती खर्च होतो, याचा नेमका आकडा सरकारही सांगत नाही. मात्र, हा आकडा आज १५० कोटी रुपयांच्या घरात असावा. म्हणजे दिवसाला १५ कोटी रुपये खर्च. नागपूरला येण्यापेक्षा एवढा पैसा विदर्भाच्या विकासाला द्या, अशीही मागणी काही लोक करतात. पण पैसा देऊन कुठल्याही भागाचा विकास होत नसतो. लोकांचा सहभाग आवश्यक असतो.अधिवेशनानिमित्ताने विदर्भाच्या प्रश्नांची इथे चर्चा होते, हेही नसे थोडके. अलिकडे चित्र बदलत आहे.

२०१४ मध्ये राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले, नितीन गडकरी केंद्रात मंत्री बनले आणि विकास काय चीज असतो ते विदर्भाला पाहायला मिळू लागले. नागपुरी अधिवेशन अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. हुरडा पार्ट्यांसाठी ते प्रसिद्ध होते. सहलीचे अधिवेशन म्हणूनही टिंगल होत असे. तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्वतः शिकारी होते.  सुट्यांच्या दिवशी ते आमदारांना ताडोबाच्या जंगलाची सैर घडवायचे. मुंबईहून येणाऱ्या पत्रकारांनाही ताडोबाचे वाघ दाखविण्यात नाईकसाहेबांचा पुढाकार असे. विदर्भाचे लोक पाहुण्यांना खाऊ घालण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कोवळ्या, लुसलुशीत ज्वारीचा हुरडा, वांग्यांचे झणझणीत भरीत, सोबत तळलेली हिरवी मिरची असा तो बेत असे. पुढाऱ्यांच्या शेतावर भाकरीसह हे साग्रसंगीत जेवण असे. रात्रीच्या कुडकुडत्या थंडीत शेकोट्याच्या ऊबेत या जेवणावळी चालत. पूर्वीचे वाण आता नाही, हुरडा पार्ट्याही कमी झाल्या. आजही पार्ट्या होतात; पण त्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये. साऱ्यांचीच ‘चव’ बदलली आहे. पूर्वी आमदार बसमधून नागपूरला येत. आज तुम्हाला कोणी आमदार बसमध्ये दिसला तर ती बातमी होईल! आमदारांना राहायला सरकारने आमदार निवास बांधले आहे. पण तिथे मोजकेच आमदार राहताना दिसतील. बहुसंख्य आमदार पंचतारांकित हॉटेलांमध्ये दिसतात. विचित्र अवस्था आहे. ‘कालाय तस्मै नम: म्हणायचे. खरेच अधिवेशन कुठे भरते? हेच शोधायची वेळ आली आहे.