बुद्धीची नादारी!

महाराष्ट्रात अत्यंत कमजोर, दुर्बल आणि अस्थिर सरकार बसले असल्याने, दिल्लीतून लादलेल्या मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती, असे सांगताना, ठाकरे गटाचे नादारी नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेला, शाब्दिक चकमकीला गँगवॉर आणि टोळी युद्ध संबोधून, आपल्या बुद्धीच्या नादारीचे, दिवाळखोरीचे प्रदर्शन केले. चूक यांची पण नाही. कारण, या महाशयांना सरकार चालविण्याचा आणि सरकार चालविण्यासाठी अंमलात आणल्या जाणार्‍या प्रक्रियांचा अनुभव नाही. तर, यांच्या मालकांनी अडीच वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहूनदेखील त्यांनाही सरकार चालविण्याचा अनुभवाचा अभावच राहिलेला आहे. मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून कधी जबाबदारीच निभावली नाही. त्यामुळे Maharashtra Cabinet मंत्रिमंडळाची बैठक कशी बोलावली जाते, हाताळली जाते, मंत्रिमंडळाची बैठक एकप्रकारे चर्चेचा मंच आहे आणि या मंचावर एखाद्या विषयावर कशी चर्चा केली जाते, येथे झालेल्या साधक-बाधक चर्चेतून काय साध्य होते, याची कल्पना नसल्याने, अर्थात संधी असूनही या प्रक्रियेत भाव घेण्यात स्वारस्य न दाखविणार्‍यांना याची माहिती असणार तरी कशी? आणि मग याच अज्ञानातून मूळ भाईगिरीची परंपरा लाभलेल्या या गटातील नेत्यांना गँगवॉर आणि टोळीयुद्धच दिसेल ना…

मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री नसतील तर होऊ शकत नाही. अपवादात्मक स्थितीत म्हणजे, मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री फार आजारी असतील, त्यांची तब्येत नाजूक असेल किंवा मग मोठ्या कालावधीसाठी ते देशाबाहेर असतील तर, अशा दोनच स्थिती मंत्रिमंडळाची बैठक ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी आपला प्रभार सोपविला असेल असा मंत्रिमंडळातील सहकारी पण महत्त्वाचे म्हणजे प्रभार सोपविल्याचे राज्यपालांना कळविल्यानंतर राज्यपालांनी मंजुरी दिली असल्यास तो प्रभारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावू शकतो, असा हा साधा मूलभूत नियम आहे; जो 288 आमदारांनादेखील माहिती असतो. पण जगाला उपदेश करणार्‍या या नोकर आणि मालकांना हा साधा नियम माहिती नाही. दोन वेळा अशीच अनधिकृत बैठक साहेबांनी बोलावली होती आणि यात घेतलेल्या निर्णयाला बैठक अवैध असल्याचे कारण पुढे करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या नावाने बोटं मोडायची, असा एकमेव धंदा चालवला होता यांनी. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकीला मालक कधी उपस्थित राहिलेच तर ते दूरदृश्यप्रणालीद्वारे राहायचे. मालकांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही आणि मंत्रालयातदेखील दोन दिवस कधी हजेरी लावली नाही. त्यामुळे साहेबांना आणि त्यांच्या नोकराला मंत्रिमंडळाच्या बैठकीत कशी गरमागरम चर्चा होते… आणि या चर्चेला काय म्हणतात… याची कल्पनाच नाही. मग आपल्या कुवतीप्रमाणे जेवढी आपली वैचारिक क्षमता आहे आणि भाईगिरीची पृष्ठभूमी लाभलेल्यांनी विचार करावा तर तो गँगवॉर आणि टोळीयुद्धापर्यंत आणि हप्ता वसुलीपर्यंतच येऊन ठेपेल ना… दुसरं सुचणार तरी कसं या लोकांना?

बरं, ठाकरे साहेबांचे राऊत नावाचे नोकर साहेब काय म्हणतात? राज्यात अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. मुळात एवढा मोठा अंतर्गत गँगवॉर यांच्याच ‘गँग’मध्ये माफ करा ‘पक्षात’ चालू होता की, त्याचे रूपांतर थेट मोठ्या चकमकीत होऊन, या टोळी युद्धात शिंदे टोळीने ठाकरे टोळीला धूळधाण करून पुरता सफाया करून टाकला… मागील काळात बर्‍यापैकी मुंबईमध्ये आपले साम्राज्य पसरविलेल्या या टोळीतील सदस्यांतील अंतर्गत वादाने आपसातच गँगवॉरमध्ये एकमेकांना संपविण्याच्या शपथा घेतल्या आणि काही सदस्यांनी टोळीत उठाव करून राज्यावर अधिराज्य गाजविण्याचे या टोळीच्या प्रमुखाचे स्वप्न धुळीस मिटवून टाकले. मग टोळी प्रमुखाकडे असलेल्या बोटावर शिल्लक असलेल्यांनी प्रमुखांविरोधात गेलेल्या गँगच्या सदस्यांना धमक्या देणे सुरू केले. राज्यात पाय ठेवून दाखवा, विमानतळावरून मंत्रालयाकडे जाणारा रस्ता वरळीवरून जातो हे लक्षात ठेवा, मुडदे पडतील, कामा‘या देवीला बळी देऊ, एका एकाला बघून घेऊ… यांसारखी भाषा वापरली. ही भाषा म्हणजे खर्‍या अर्थाने गुंडगिरीची, गँगवॉरची भाषा आहे. जे लोकं ही भाषा वापरत होते. त्यांनी दुसर्‍यांच्या चर्चेला गँगवॉर संबोधणे म्हणजे, जरा अतिच म्हणावे लागेल.

दिल्लीहून मुख्यमंत्री लादल्याची टीका साहेबांचे नोकरसाहेब करत आहेत. पण या नोकरसाहेबांना आपले साहेब जेव्हा जनादेशाचा अनादर करून मोठा गाजावाजा करत Maharashtra Cabinet मुख्यमंत्रिपदावर दावा करायला राजभवनावर गेले होते. तेव्हा काँग्रेसने समर्थन दिल्याचे पत्र शेवटपर्यंत न दिल्याने शिष्टमंडळाला बराच वेळ ताटकळत राहून अखेर खाली हात परत यावे लागले होते. नंतर मग शरद पवारांच्या मध्यस्थीने काँग्रेसच्या हायकमांडला विनवण्या करून त्यांना राजी केल्यानंतर, काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीहून तुमच्या साहेबांना महाराष्ट्राच्या डोक्यावर लादले होते. त्यांनी दिल्लीहून लादण्याचा निर्णय घेतला नसता तर तुमचे साहेबदेखील महाराष्ट्रावर लादल्या गेले नसते. याचा विसर कसा पडला याचे नवल वाटते. आणि साहेबांना लादल्यानंतर साहेब ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेसाठी 100 कोटी निधी संकलनाचा एककलमी कार्यक्रम राबवायला लागले. त्यामुळे राज्याच्या हिताच्या अन्य योजनांकडे दुर्लक्ष झाल्याने, राज्यात गुन्हेगारी वाढली, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली, तरुणांच्या रोजगारासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही, शेतकरी आत्महत्या वाढल्या, निरपराधांवर हल्ले, साधू-संतांच्या हत्या, जातीयवादातून हत्या, धार्मिक तेढ,  दंगली यासारखी प्रचंड अराजकता वाढली असताना साहेब यावर अंकुश लावण्यात अपशयी ठरले होते. राज्याच्या इतिहासातले सर्वात अत्यंत कमजोर, दुर्बल आणि तीन विरोधी विचारसरणीच्या लोकांनी मिळून बनविलेले असलेल्या सरकारमध्ये कुणाचा मागमूस कोणाला नसल्याने सर्वात अस्थिर सरकार म्हणून नावलौकिक प्राप्त झाले होते. अशा सरकारमधल्या दोन दोषी, डागाळलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊ न शकणारे सर्वात कमजोर, दुर्बल, दुबळे मु‘यमंत्री पहिल्यांदाच या राज्यातील जनतेने बघितले… बरं यांच्या हिमतीची अनेक उदाहरणं देता येतात… 2005 च्या महापुराच्या वेळची नोकराच्या नेहमी खंजीर आणि कोथळा, मर्दवाली भाषा करणार्‍या साहेबांनी दाखविलेली हिंमत अजूनही विस्मरणात गेलेली नाही. त्यामुळे अशा या निर्भयी, धैर्यशाली लोकांनी इतरांना दुर्बल म्हणून संबोधणे हे त्यांच्या स्वतःच्या कीर्तीला तडा पोचविण्यासारखे होईल, नाही का?

 

नागेश दाचेवार
– 9270333886