भारत भक्तीची साधना !

स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर हा देश स्वतंत्र झाला पाहिजे, याला विश्वामध्ये गौरवशाली स्थान प्राप्त झाले पाहिजे यासाठी अनेकानेक संघटना आणि संस्था सुरू झाल्या. त्यांनी आपापला एकेक काळ गाजविला, परंतु काळाच्या ओघामध्ये त्या केव्हा समाप्त झाल्या, हे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यांनी केलेले कार्य इतिहासजमा झाले. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी राज्यसभेचे खासदार असताना त्यांना एका कम्युनिस्ट खासदारांनी विचारले की, ‘ठेंगडीजी, ज्यावेळेस संघाची स्थापना झाली त्यावेळेस डॉक्टर हेडगेवार यांना किती लोक ओळखत होते?’ ठेंगडीजी त्यावर म्हणाले की, ‘नागपूर आणि आसपासच्या परिसरात किंवा फार फार तर मध्य प्रांतामध्ये काही प्रमुख लोक त्यांना ओळखत होते. त्यानंतर ते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा देशाचे पंतप्रधान बनले त्यावेळेस त्यांना किती लोक ओळखत होते? ठेंगडीजी म्हणाले की, ‘नेहरूजी तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते होते. त्यांना सर्वच लोक ओळखत होते?’ त्यानंतर त्यांनी विचारले की, महात्मा गांधींना किती लोक ओळखत होते तर त्यावेळेस ठेंगडीजी म्हणाले की, महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते होते.

त्यानंतर ते कम्युनिस्ट खासदार म्हणाले की, आज इतक्या वर्षांनंतर या महान नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायला, त्यांच्या आदर्शाप्रमाणे जीवन व्यतीत करायला किती लोक तयार आहेत? तर उत्तर येते की, फार कमी लोक तयार आहेत. परंतु ज्या डॉक्टर हेडगेवार यांना फारशी प्रसिद्धी नव्हती, फारसे लोक त्यांना ओळखत नव्हते आज त्या डॉक्टरांनी दाखविलेल्या मार्गावर, सांगितलेल्या विचारांवर चालण्यासाठी लाखो लोक तयार आहेत. हे डॉक्टर हेडगेवार यांचे मोठेपण आहे. २७ सप्टेंबर १९२५ साली स्थापन झालेल्या संघाला आज ९८ वर्षे पूर्ण झालेली आहेत. संघाची वाटचाल ही भारत भक्तीची आहे. संघ म्हणजे काय तर लाखो लोकांनी केलेली भारत मातेची आराधना आहे. संघ म्हणजे काय हे जर कोणाला सांगायचे असेल तर त्याला संघ शाखांमध्ये शिकविले जाणारे संस्कार सांगावे लागतील. या संस्कारातून व्यक्ती निर्माण झालेले आहे. सामान्य लोकांतून असामान्य व्यक्तिमत्त्व निर्माण झालेले आहे व त्यांनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला आहे.

दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, दत्तोपंत ठेंगडी, अशोक सिंहल अशी अनेक नावे आपल्याला घेता येतील. हे सर्व सामान्यातील असामान्य लोक होते. संघाच्या शाखेमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमातून माणसाच्या मनावर सामाजिकतेचा, राष्ट्रीयतेचा संस्कार होतो आणि त्यातून मोठमोठी कार्ये उभे राहतात, हे सिद्ध झालेले आहे. डॉक्टर हेडगेवारांनी हिंदू राष्ट्राचा जो मंत्र त्यावेळेस स्वयंसेवकांना दिला त्यातून प्रेरणा घेऊन अनेक स्वयंसेवक या मार्गावर चालायला सिद्ध झाले. दादाराव परमार्थ, भाऊराव देवरस, बाबासाहेब आपटे अशा अनेक तरुणांनी भारतातील विविध प्रांतांमध्ये संघाचे काम उभे करण्यासाठी आपले जीवन समर्पण केले. यांच्या सोबतच जे प्रचारक नव्हते अशाही लाखो गृहस्थाश्रमी कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनातल्या सर्व मोहांना बाजूला ठेवत संघ कार्य हे राष्ट्र कार्य मानून आपल्या जीवनाचे समर्पण केले व त्यातून हे कार्य उभे राहिले. संघाचा इतिहास हा देशाकरिता समर्पणाचा इतिहास आहे. संघ ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस सर्व जाती-पंथाचे लोक त्यामध्ये येऊ लागले. संघाने कधीही जातिभेद पाळू नका, असे म्हटले नाही.

परंतु, संघाची कार्यपद्धतीच अशी होती की, ज्यामध्ये सर्वसामान्य लोक येत गेले व आपल्या मनातील जातिभेदाच्या विचारांना थारा न देता केवळ समाज आणि राष्ट्र अशा पद्धतीचे विचार ते करू लागले. महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर यांनीसुद्धा संघाच्या शाखांना व शिबिरांना भेट देऊन संघाच्या कार्याचे अवलोकन केले होते.संघाच्या कार्यातून सामाजिक समरसता निर्माण होत आहे, हा अनुभव त्यांनाही आलेला होता. हा समाज माझा आहे आणि ज्या ज्या वेळेस या समाजावर कुठलेही संकट येईल qकवा समाजाला कुठल्याही सेवेची आवश्यकता पडेल त्यावेळेस संघाच्या स्वयंसेवकांनी त्याकरिता धावून जाणे हे त्यांचे परम कर्तव्य आहे, अशा पद्धतीचा भाव स्वयंसेवकांमध्ये निर्माण झाला. संघाच्या स्वयंसेवकांनी चालविलेली ५०,००० पेक्षा अधिक सेवा कार्ये आज संपूर्ण भारतात सुरू आहेत.खेड्यापाड्यात, जंगलात, पहाडांमध्ये जिथे शिक्षणाची, आरोग्याची सोय नाही अशाही ठिकाणी संघाचे स्वयंसेवक जाऊन पोहोचलेले आहेत व त्यांनी सेवा कार्याच्या द्वारा समाजामध्ये परिवर्तन आणण्याचे काम सुरू ठेवलेले आहे. गुजरातच्या भूकंपामध्ये सैन्याचे ४७०० जवान काम करीत होते तर संघाचे २५,००० स्वयंसेवक भूकंपग्रस्तांना पूर्वपदावर आणण्यासाठी काम करीत होते. ही खूप मोठी शक्ती आहे.

संपूर्ण देशाला जोडण्याचे म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य संघाने केलेले आहे. संघाचा इतिहास हा राष्ट्रभक्तीचा इतिहास आहे. काश्मीरचे आंदोलन, गोहत्या बंदी, राम जन्मभूमी अशा सर्वच आंदोलनांमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी प्रमुख भूमिका बजावलेली आहे. १९४७ च्या पूर्वी समाजासमोर देशाला स्वतंत्र करण्याचे स्वप्न होते, परंतु स्वातंत्र्यानंतर समाज आपले राष्ट्रीय ध्येय विसरला. व्यक्तिगत स्वार्थ बळावला. लोक आत्मकेंद्रित झाले. परंतु अशा समाजासमोर आता आम्ही स्वातंत्र्य तर मिळविले; परंतु हे स्वातंत्र्य टिकविले पाहिजे. एवढेच नव्हे, तर देशाला परम वैभवशाली बनविले पाहिजे यासाठी आम्ही आपले तन-मन-धन समर्पित केले पाहिजे, हा संदेश संघाने स्वयंसेवकांना व समाजाला दिलेला आहे. मागील ९८ वर्षांत संघाने देशासाठी बजावलेल्या भूमिकेची समाज नक्कीच दखल घेईल. संघ स्वयंसेवकांचा त्याग, समर्पण, अनुशासन, देशभक्ती, सेवा, सामाजिक समरसता व राष्ट्रीय एकात्मता या सर्वच गोष्टींसाठी समाजाला संघाचे स्मरण होईल. संघाची साधना ही भारत भक्तीची साधना आहे. या साधनेमध्ये लाखो-करोडो साधकांची आवश्यकता आहे.लाखो लोकांच्या सहभागानेच हे राष्ट्र परम वैभवाला जाईल.

– अमोल पुसदकर