मनाच्या कक्षा रुंदावणारा दीपोत्सव !

दिवाळी हा सण असा आहे, ज्या सणाचा झगमगाट सर्वत्र सारखाच असतो. दिवाळी वर्षातला सर्वांत मोठा सण असूनही तो काल आणि आजच्या फेऱ्यात अडकला आहे, हे दुर्दैवी आहे. दीपावली शब्दाची उकल दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजेच ओळ अशी आहे.या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक समाज किंवा धर्म आपल्या सणाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतात. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. दीप म्हणजेच दिव्याला मांगल्याचे प्रतीक मानलं जातं. हल्ली नातेसंबंधातली मरगळ, शेजारधर्मातला परकेपणा बाह्य संस्कृती आत्मसात करायला प्रोत्साहन देते.पूर्वी या दिव्यांच्या सणाला एरवीच्या तुलनेत परिघाबाहेर, अगदी मोजक्या जागेत न मावणारी माणसं एकत्र येऊन जल्लोष करायची. पण या आधुनिक काळातली परिघातली माणसांची माणुसकीच लोप पावली आहे, मनात मरगळ साचली आहे.ज्या दिवाळीत दारासमोर आकर्षक, मोहक रांगोळी आणि त्या भोवती दिव्यांची आरास हे वैशिष्ट्य मानलं जायचं तिथे आता चक्क घराचे दरवाजे बंद दिसतात.

हल्ली दिवाळी आली की, भरगच्च फोटो, शुभेच्छांचे एसएमएस फॉरवर्ड झाले की दिवाळी साजरी होते.रात्र आणि दिवस यांना जोडणारी वेळ म्हणजे पहाट. दिव्यांची रोषणाई संध्याकाळी किंवा रात्री होत असली, तरीही या सणांमध्ये पहाटेच्या वेळेलासुद्धा महत्त्व आहे. कृष्णाने केलेला नरकासुराचा वध हा पहाटेच केल्याने या वेळेला मंगल मानले जाते. म्हणूनच पहाटेची वेळ आणि त्या वेळची कामे, प्रार्थना या दिवाळीच्या सणांमध्ये अंतर्भूत झाली आहे. सगळ्या चिंता-विवंचनांची जळमटं झाडून टाकून आनंद, उत्साह, समृद्धीला आवाहन करण्याचा सण म्हणजे दिवाळी!पण, या सणामागील उद्देश, परंपरा या बाजूला ठेवून नवीन आगळीवेगळी दिवाळी आजच्या काळात साजरी होते. सगळं घर स्वच्छ झालं की स्वयंपाकघरात दरवळणारा तो फराळाचा सुगंध, दारासमोरील रांगोळी, तोरण यामागील सगळी गंमत आपण हरवली आहे. सगळे पदार्थ ऑनलाईन मागवायचे, नातेवाईकांना बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये आमंत्रण द्यायचं आणि छोटसं गेट-टु-गेदर करून दिवाळी करायची… ही अशी आपली खरंच संस्कृती होती का?
तुम्ही हे वाचलेत का … नरक चतुर्दशीची अचूक तारीख काय?, शुभ वेळ आणि महत्त्व

मातीचा किल्ला बनवणे, आकाश कंदील सजवणे, पणतीच्या वाती वळणे आणि ही सगळी कामं झाली की, मस्तपैकी फराळावर ताव मारणे !या गोष्टी आता फक्त कथेत सांगण्यापुरत्या राहिल्या आहेत. ठिपक्यांच्या रांगोळ्यांची जागा डिझायनर चाळणींच्या इन्स्टंट रांगोळ्यांनी घेतली. मातीच्या पणत्यांच्या ऐवजी आजकाल रेडिमेड पणत्या येतात, लक्ष्मीपूजन झालं की लाह्या-बत्तासे, चिरंजीवचे दाणे याऐवजी ड्रायफ्रूट्स देण्याची पद्धत आली आहे. या अशा लहानसहान गोष्टीतून मिळणारा निर्मळ आनंद आपल्या मुठीतून कधीच सुटायला नको. ‘मनाचिये अंधाराचा होतसे विनाशू’ शब्दप्रभू गदिमांच्या या ओळी प्रत्येकाने मनापासून आत्मसात करण्याची वेळ आली आहे.आपल्या सणांचे महत्त्व पुढच्या पिढीला सांगण्याचे दायित्व आपले आहे. दिवाळी म्हणजे फक्त रोषणाई, झगमगाट एवढेच नव्हे, तर हा सण बांधिलकीचा आहे. दरम्यानच्या काळात जाहिरातींमधून हा संदेश जनजागृती म्हणून पोहोचविण्यात आला; परंतु त्याला निव्वळ लाईक देण्यापेक्षा समाजामध्ये त्याचं अवलोकन करण्याचा प्रयत्न करावा.

गरजू व्यक्तींपर्यंत फराळ, आवश्यक कपडे, औषधे, पुस्तके आपल्या सोयीनुसार द्यावी. एखादा हुशार विद्यार्थी चित्रकलेत, गायन-वादनामध्ये हुशार असेल तर त्यांना प्रोत्साहन द्यावं. जेणेकरून त्यांची कला अजून चार लोकांपर्यंत पोहोचून त्याचा प्रसार होईल, यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल.सोबतच सुट्ट्यांमध्ये काहीतरी नवनवीन प्रयोग ते नक्की करतील. सोबतच स्वच्छतेप्रती जागरूकता, वृक्षारोपण यासारख्या गोष्टी आपण करू शकतो. हल्ली डिओचा जमाना असल्यामुळे आजकालच्या पिढीला उटण्याचे तेवढं महत्त्व नाही. तुम्ही हे वाचलेत का … कार्तिक महिन्यात करा गुलाब आणि कापूरचा उपाय थंडीमुळे अंग शुष्क होऊ नये, यासाठी तेल लावणं असो वा अभ्यंग स्नान करणे यामागे काहीतरी शास्त्रीय कारणे आहेत ना..ज्या गोष्टी आपण आवर्जून करायलाच हव्यातच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण. फटाक्यांमुळे आकाश जरी उजळत असले, तरी त्याचा विपरीत परिणाम माणसांच्या आरोग्यावर होतो. फटाक्यांमधील रासायनिक घटकांमुळे मुलांच्या वाढीवर परिणाम होतो, असं तज्ज्ञ सांगतात. फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज आणि धूर यामुळे माणसांना तर त्रास होतोच; सोबतच पशु-पक्ष्यांनाही त्याचा त्रास होतो.

तेव्हा फटाक्यांमुळे होणारे नुकसान टाळले पाहिजे. दिवाळीतील पाचही दिवसांचे महत्त्व आपण सगळे जाणतो. तरीही दुर्दैवाने सांगावसं वाटतं की, स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही मन सुन्न करतो.भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक भावाने असे ठरवायला हवे की, समाजातील स्त्रियांच्या संरक्षणासाठी उभे राहू. कुठलीही अपरिचित स्त्री संकटात आढळल्यास तिच्यासाठी नक्कीच मदतीचा हात पुढे करावा. यावर्षी नववर्षाच्याच आधी दिवाळीचा संकल्प करायला हवा. संपत्तीच्या अभावाकडून समृद्धीकडे, ईष्र्येच्या जाणिवेपेक्षा मैत्रीकडे आणि मोजक्यापेक्षा व्यापकतेकडे वळण्याचा प्रयत्न असावा. समाजातील सगळ्या वाईट प्रवृत्तींची जळमट स्वच्छ व्हावी. स्त्रियांना, बालकांना, वृद्धांना भरभरून आनंद, आदर मिळावा. एक सत्य आपण सगळेच जाणतो, जेव्हा लाटेला जाणीव होते की, आपण सागराशीच संलग्न आहोत, तिच्यातील ऊर्जा अधिक वृद्धिंगत होते. तसंच सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि आम्हाला एकजुटीने आनंदी राहायचं आहे, ही भावना प्रत्येक भारतीयाची उत्तम माणूस म्हणून जगण्याची भावना नक्कीच वृद्धिंगत करेल.

– हिमगौरी देशपांडे
९८६०२९१८६५