युद्ध आणि शेअर बाजार !

हमासने इस्रायलवर आकस्मिक हल्ला केला. (आकस्मिक? युद्ध काय आधी सांगून करतात.) शेअर बाजार कोसळला. भारताचा आणि जगातले इतर अनेकही! इस्रायलने नंतर नुसता प्रतिकारच नाही तर प्रतिहल्ला केला. शेअर बाजार सुधारला. भारताचा आणि जगातले इतर अनेकही! त्याआधी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनने चिवट झुंज दिली. अजून देतो आहे. शेअर बाजार कोसळला आणि कोसळत राहिला.आज इतके आठवडे झाले तरी ते युद्ध धुमसत आहे आणि अधूनमधून ते कारण शेअर बाजाराची पडझड स्पष्ट करताना दिले जाते आहे. त्याच्या आधी अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतला. तेल महागले आणि बाजार कोसळला. असा बाजार नेमका तेलामुळे कोसळला की तालिबानमुळे, असा प्रश्नही कोणी कोणाला विचारला नाही.त्याच्याआधी पाकिस्तानबरोबरची दोन युद्धे (१९६५ आणि १९७१) आणि चीनविरुद्धचे युद्ध (१९६२) झाली. त्याचे त्याचे भले-बुरे परिणाम… तात्कालिक, मध्यमकालिक, दीर्घकालीन झाले असतीलही. कदाचित नसतीलही

त्याची चर्चा मात्र फारशी झाली नाही. कारण एक तर तेव्हा शेअर बाजार हा विषय निम्म्याहून जास्त भारताच्या वैचारिक पंचक्रोशीच्या विचारकुसाबाहेरचा विषय होता आणि दुसरे म्हणजे तेव्हा आजच्या सारखे समाजमाध्यमांचे युग नव्हते. तसे अमेरिका-व्हिएतनाम युद्ध इतकी वर्षे सुरू होते. अमेरिकी शेअर बाजार तेव्हाही आपला आब-दबदबा-रुबाब राखून होता. व्हिएतनाम अर्थव्यवस्था म्हणूनही चर्चेत नव्हते. पण तत्कालीन अमेरिकी शेअर बाजार अशी फारशी चर्चा तेव्हा काही झाली नव्हती. त्याआधीचे पहिले आणि दुसरे महायुद्ध इतके मागे जाऊया नको. पण तेव्हा जे काही शेअर बाजार कार्यरत होते त्यांची कढी तेव्हा फार पातळ झाली होती, असे जाणकार इतिहासकार सांगतात.आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या सुरू असलेली हमास-इस्रायल युद्धाच्या पृष्ठभूमीवर शेअर बाजार या क्षेत्राबाबतची चर्चा! वस्तुस्थिती अशी आहे की, कोणत्याही काळातील कोणत्याही युद्धाचा त्या त्या देशाच्या शेअर बाजारावर परिणाम होतच असतो.

काही वेळा तो मध्यमकालीन असतो. काही वेळा दीर्घकालीनही असतो. प्रत्येक वेळी हा परिणाम वाईटच असतो असे नाही. पण म्हणून तो दरवेळी चांगलाच असतो असेही नाही. असा परिणाम वेगवेगळ्या तऱ्हेचा असतो. कारण, प्रत्येक युद्धाची जातकुळी वेगवेगळी असते. सर्व युद्धांचा शेअर बाजारावर परिणाम होत असतो, ही एकमेव बाब समान असते.याचे एक महत्त्वाचे कारण हे युद्ध आणि त्याच्या तीव्रतेपेक्षाही शेअर बाजाराच्या वृत्ती-प्रवृत्तीशी संबंधित आहे. कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब आणि तीही टोकाची प्रतिक्रिया देण्याची शेअर बाजाराला सवय असते, हे ते कारण. क्नी जर्क रिएकशन्स म्हणजे काय तर हे शेअर बाजाराचे वर्तन! आणि याचे दुसरे कारण म्हणजे युद्धकालीन परिस्थितीत आणि अनेकदा नंतरही मालाची वाहतूक विस्कळीत होते. आधी राजकीय आणि नंतर आर्थिक संबंध बदलतात. काही वेळा तर ‘ओल्याबरोबर सुकेही जळते’ या न्यायाने अनेकदा असे परिणाम फक्त युद्ध करणाऱ्या दोन संबंधित देशांनाच भोगावे लागतात, असे नाही. यातून निर्माण होणारी सर्वंकष अनिश्चितता हा खरा बाजाराचा शत्रू असतो. हा शत्रू जितका प्रबळ किंवा दुर्बळ तेवढा परिणाम जास्त किंवा कमी असतो.

पूर्वीच्या काळी अनेक देश हे जागतिक अर्थकारणाच्या परिघाबाहेर होते. नंतरच्या जागतिकीकरणानंतर हे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलले.कोरोनानंतरच्या काळात तर आता फक्त राजकीय सोयीकरिता हाच जणू काही एकमेव निकष ठरला आहे. (हे म्हणजे अगदी सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय चित्रासारखे आहे.) पूर्वी जसे ‘स्टॅण्ड अलोन’ संगणक होते तेव्हा ‘व्हायरस’चा धोका कमी असे आणि असला तरी तो आवाक्यात आणणे तुलनेने सोपे होते. सध्याच्या ‘नेटवर्कड् कॉम्प्युटर्स’च्या जमान्यात हेच गणित वेगळे असते. नेमकी हीच परिस्थिती अलीकडे युद्ध आणि शेअर बाजार याबाबत असते. आजमितीला युद्ध आणि शेअर बाजार असा विचार करीत असताना उठणारा अजून एक मुद्दा म्हणजे सध्या सुरू असलेल्या हमास-इस्रायल युद्धाचा आपल्या शेअर बाजारावर झालेला परिणाम हा रशिया-युक्रेन युद्धाचा आपल्या शेअर बाजारावर झालेल्या परिणामापेक्षा कमी तीव्रतेचा का आणि कसा आहे? असे होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे हमास आणि इस्रायल हे दोन्ही देश आपल्या देशापासून रशिया आणि युक्रेनपेक्षा भौगोलिकदृष्ट्या फार लांब आहेत.

त्यामुळे रशिया-युक्रेनची भूराजकीयदृष्ट्या (जिओ पॉलिटिकल) जितकी जास्त झळ आपल्याला बसते, तितकी झळ आपल्याला देश म्हणून हमास-इस्रायलची बसणार नाही. त्याचा परिणाम म्हणून हमास-इस्रायलच्या युद्धाचा आपल्या देशाच्या शेअर बाजारावर मर्यादित परिणाम झाला आणि होईल. याबाबतचा दुसरा पैलू म्हणजे मुळातच आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात, अर्थकारणात इस्रायलच्या तुलनेत रशियाचा सहभाग मोठा आहे.कोरोनानंतरच्या काळात रशियाकडून आपण सुरू केलेल्या तेलाच्या आयातीमुळे तर रशियाबरोबरचे आपल्या देशाच्या व्यापारी संबंधांचे स्वरूप, प्रमाण, सातत्य, सर्वंकषता तर जास्तच वाढली आहे. म्हणून या दोन्ही युद्धाचा आपल्या देशाच्या शेअर बाजारावर झालेला परिणाम वेगवेगळा आहे.

चंद्रशेखर टिळक
९८२०२९२३७६