राष्ट्रीय संस्कारांची अभिव्यक्ती

‘समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट’ने हा जो कार्यक्रम केला, तो दुसर्‍या एका कारणासाठी देखील अद्भुत म्हणावा लागेल. समाज सुधारणा आणि समाजाची मानसिकता बदलण्याचा विषय हे फार जटिल विषय आहेत. हे जटिल विषय केवळ बौद्धिक मांडणी करून किंवा प्रवचने देऊन मर्यादित अर्थांनी सुटतात. समाज सुधारण्याचे विषय समाजाने स्वीकारावे लागतात. समाजाने एकदा का ते स्वीकारले की, समाज आपल्या पद्धतीने काम करू लागतो.

भरूचहून दीपिका शहा यांचा दोन महिन्यांपूर्वी फोन आला. त्या म्हणाल्या की, “ ’समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट’च्यावतीने २७ जोडप्यांच्या सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आहे. तो दि. १५ डिसेंबरला आहे आणि दि. ७ डिसेंबरपासून ‘समरसता’ या विषयावर व्याख्यानमाला आणि समरसतेच्या अंगाने रामकथा असा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्ही १४ आणि १५ असे दोन दिवस या कार्यक्रमात यावे, अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला ‘समरसता’ या विषयावर व्याख्यान द्यायचे आहे आणि सामूहिक विवाहासाठी उपस्थित माता, भगिनी, बंधूंना संबोधित करायचे आहे.” मी त्यांना म्हटले की, “ठीक आहे, मी येईन.”

चार वर्षांपूर्वी म्हणजे कोरोना काळापूर्वी याच कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. चार वर्षांपूर्वी रामकथा वगैरे विषय नव्हता. त्याची नवीन जोड झाली होती. १४ तारखेला ‘स्वराज एक्सप्रेस’ने मी भरूचला पोहोचलो आणि रामकथा मंडपात हजर झालो. मंचावर रामकथा समरसतेच्या अंगाने सांगणारे, स्वामी सरजुदासजी बसले होते. प्रथेप्रमाणे सर्वांनी माझे स्वागत केले आणि विषय मांडण्याची विनंती केली. मागील ३० वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या संस्थांपुढे ‘सामाजिक समरसता’ हा विषय मी मांडलेला आहे. त्यामुळे आता कोणासमोर बोलायचे आहे, एवढाच विषय माझ्यापुरता राहतो. कथा श्रवणासाठी दीड एक हजार श्रोते जमले होते आणि त्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक होती. मी विवेकानंदांच्या उदाहरणाने सुरुवात केली आणि महाभारत, पुराणं यांतील उदाहरणे देऊन समरसता म्हणजे आपले श्रेष्ठ तत्त्वज्ञान जगणे आहे, हे मांडले. विषय सोपा करण्यासाठी तीन कथाही सांगितल्या. प्रवचनकार स्वामीजींनी मांडलेल्या विषयाची खूप प्रशंसा केली.

त्यानंतर त्यांनी रामकथेचा शेवटचा भाग सांगायला सुरुवात केली. त्यांची वाणी रसाळ होती. तुलसीदासांच्या ’रामचरितमानस’मधील अनेक चौपाया ते उद्धृत करत गेले. रामायणतील युद्धकांडातील प्रसंगातील समरसतेचा भाव त्यांनी सांगितला आणि ते नम्रपणे म्हणाले की, “सामाजिक समरसतेच्या अंगाने रामायण कथा सांगण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.” दुसर्‍या दिवशी कार्यक्रमाचे संयोजक मला म्हणाले की, ”माझी वृद्ध आई प्रवचनासाठी उपस्थित होती.” ती म्हणाली की, “एवढे वयस्कर स्वयंसेवकही संघात असतात का?” पुढचे अत्यंत अर्थपूर्ण वाक्य ती म्हणाली, “इतिहासकाळात आमच्याकडून भयंकर चुका झाल्या. आपल्याच धर्मबांधवांना आपणच अस्पृश्य ठरविले, ही मोठी चूक झाली.” या मातेचे हे बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले.

दुसर्‍या दिवशी तिथल्या ग्राऊंडवर सुमारे पाच हजार लोक बसतील, एवढा मोठा मंडप उभा केला होता. या मंडपात ज्यांचे विवाह होणार आहेत, अशा जोडप्यांसाठी लहान मंडप उभे केले होते. विवाह संस्कार वैदिक पद्धतीने झाले. ‘समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट’ने नवरदेव आणि वधू यांचे लग्न पोशाख त्यांना दिले होते. सर्व वधू आणि वर अतिशय पारंपरिक पोशाखात होते. विवाह करणार्‍यांमध्ये यावेळी जवळ-जवळ अर्धी जोडपी आंतरजातीय विवाहाची होती. लग्न मंडपातील वर विष्णू रूप समजला जातो आणि वधू लक्ष्मीचे रूप समजले जाते. यथासांग विवाह पार पडल्यानंतर, वधू रुपातील लक्ष्मीचा पादप्रक्षालनाचा विधी होता.

व्यासपीठासमोर सर्व वधू आपल्या आसनावर येऊन बसल्या. त्यांच्या मागे त्यांचे पती उभे राहिले आणि आम्ही सर्व मान्यवर एकेका वधूपुढे पाटावर बसलो. वधूच्या पादप्रक्षालनाचा विधी सुरू झाला. पुरोहित व्यासपीठावरून क्रमशः विधी कसा करायचा, ते सांगत होते आणि त्याप्रमाणे आम्ही विधी करत गेलो. वधूचे दोन्ही पाय स्वच्छ धुवून त्यावर गंध लावणे, फुलं वाहणे, नमस्कार करणे हा सर्व विधी यथासांग पार पडला. पादप्रक्षालन करणारे समाजातील अतिशय प्रतिष्ठित मंडळी होती. अतिशय आनंदाने आणि भावुकतेने ती या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

आपल्या सोळा संस्कारातील विवाह हा एक संस्कार आहे आणि या संस्काराचे सामर्थ्य काय असते, याची जाणीव मला आयुष्यात प्रथम झाली. माझ्या तीन बहिणी आणि तीन मुली यांचे विवाह मी करून दिले. त्यावेळेला फक्त कर्तव्यभावना एवढाच विषय होता. विधी आणि त्यांचे महत्त्व यांकडे मी विचारपूर्वक लक्ष दिले नाही; परंतु ते यावेळी आपोआप गेले. अनेक वधूंचे डोळे पाणवल्याचे मी अनुभवले. समरसतेवर शेकडो व्याख्यानं देणारा, मी यावेळेला समरसता कशी जगायची असते, याचा अनुभव घेत होतो आणि संपूर्ण कार्यक्रमामध्ये भावूक झालेले डोळे पुसणे करत राहिलो.

‘समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि त्यांचे स्त्री-पुरूष कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत होते. सर्व कार्यक्रमाचे नियोजन दृष्ट लागावी, इतके योजनाबद्ध होते. कुठेही गडबड गोंधळ नाही, अनावश्यक धावपळ नाही, नेमून दिलेले काम प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्ता भगिनी अत्यंत उत्कृष्टपणे करीत होते. सार्वजनिक कार्यक्रमाच्या बाबतीतला हा अद्भुत अनुभव म्हणायला पाहिजे. एवढी परिपूर्ण नियोजनता मी ‘पद्मश्री’ स्वीकारीत असताना, राष्ट्रपती भवनात अनुभवली. त्यानंतरचा हा दुसरा प्रसंग.

‘समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट’ने हा जो कार्यक्रम केला, तो दुसर्‍या एका कारणासाठी देखील अद्भुत म्हणावा लागेल. समाज सुधारणा आणि समाजाची मानसिकता बदलण्याचा विषय हे फार जटिल विषय आहेत. हे जटिल विषय केवळ बौद्धिक मांडणी करून किंवा प्रवचने देऊन मर्यादित अर्थांनी सुटतात. समाज सुधारण्याचे विषय समाजाने स्वीकारावे लागतात. समाजाने एकदा का ते स्वीकारले की, समाज आपल्या पद्धतीने काम करू लागतो. या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात जवळ-जवळ २५-३० मिनिटांची नृत्य नाटिका सादर करण्यात आली. तिचा विषयदेखील जातीभेद, अस्पृश्यता, त्याचे परिणाम आणि हे त्याचे पालन करणे, हा अधर्म कसा आहे, हे जबरदस्त परिणामकारकरित्या सादर केले गेले. लोकसंस्कृतीतून जेव्हा एखादी संकल्पना प्रगट व्हायला लागते, तेव्हा सामाजिक बदलाचे विषय समाजाचे विषय होतात. माझ्या दृष्टीने हा प्रचंड सुखावह आणि आनंद देणारा अनुभव ठरला.

‘समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट’ने हे कार्यक्रम आपल्या संकल्पनेतून आयोजित केले होते. केवळ एक सामूहिक विवाहाचा विषय घेतला, तर वधू-वरांचे पोशाख, संसारोपयोगी वस्तूंचा संच त्यांना देणे, वधूचा मेकअप करणार्‍या व्यावसायिकांना ते काम देणे, आलेल्या सुमारे सात हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था करणं, हे सगळं या ट्रस्टने स्वयंस्फूर्तीने केलं. असा भव्य कार्यक्रम असताना, त्याचे नियोजन करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, या सर्व अनुभवांतून जे गेलेले आहेत, त्यांना याची कल्पना येईल. या कार्यक्रमात सर्व समाजाचा सहभाग, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. या कार्यक्रमासाठी राजकीय नेते होते, धर्माचार्य होते, वेगवेगळ्या मठांची प्रमुख मंडळी होती, वेगवेगळे व्यावसायिक होते, एका वाक्यात जसा समाज आहे, तसं दर्शन तिथे घडत होतं. हे सर्व घडवून आणणं सोपं काम नाही. लाभाचा विचार केला, तर राबणार्‍या कार्यकर्त्यांना सामाजिक कर्तव्यपूर्तीचा आनंद सोडून काहीही मिळणारे नव्हते. या ‘समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये अत्यंत जबाबदार आणि ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. राष्ट्रीय संस्कारांची अभिव्यक्ती समाजजीवनाच्या वेगवेगळ्या अंगाने सहजपणे घडली पाहिजे, या संघ सिद्धांताचे दृश्यरूप अनुभवत असताना, डोळे आपोआप पाणावत गेले.

रमेश पतंगे
९८६९२०६१०१