विद्यापीठातही युवासेनेचा धुमाकूळ !

गेल्या 30 वर्षांत मुंबई महानगर पालिकेची पुरती वाट लावणार्‍या उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 20 वर्षांत मुंबई विद्यापीठाचेदेखील तीनतेरा केल्याचे आता आता उघड होत आहे. बोगसबाजीत हात धरू शकणार नाही, असे-असे कौशल्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांनी दाखवून दिले आहे.राज्याचा कारभार हाकतानाचे उद्धव ठाकरेंचे प्रताप सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेच आहेत. मात्र, महानगर पालिका किंवा मग मुंबई विद्यापीठ यात उद्धव ठाकरेंच्या चेल्यांनी केलेले प्रताप आता कुठे हळूहळू समोर येऊ लागले आहेत. कोरोना काळात महापालिकेच्या माध्यमातून मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करणार्‍या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गँगने शिक्षण क्षेत्रदेखील सोडले नाही, हे दुर्दैवी म्हणावे लागेल.गेल्या वीसेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय असणार्‍या आणि मागील 10 वर्षांपासून विद्यापीठावर अधिराज्य गाजविण्यात यशस्वी झालेल्या युवासेनेचं बिंग आता भाजप नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकारामुळे फुटलं आहे.

बोगस मतदार असल्याचा आरोप करत अ‍ॅड. शेलारांनी विद्यापीठाला केलेल्या तक्रारीमुळे आता मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीच्या विषयावरून उद्धव ठाकरे गँग, शिवसेना आणि भाजपमध्ये आता वातावरण तापले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शेलारांच्या तक्रारीनंतर विद्यापीठाने एक त्रिसदस्यीय समितीचे गठन केले होते. सदर समितीनेदेखील थेट ठपका ठेवला नसला, तरी सध्याच्या मतदारांच्या पदवी प्रमाणपत्राची तपासणी करून याद्या अपडेट करण्याची शिफारस केली आहे. Mumbai-Yuvasena मतदार यादी अद्ययावत करणे, नव्याने मतदार नोंदणी करणे गरजेचे असल्याचे समितीने म्हणणे म्हणजेच मतदार यादीत घोळ असल्याचे एकप्रकारे मान्य केल्याचे निष्पन्न होते. शिवाय विद्यापीठ, विद्यापीठांतर्गत येणार्‍या शैक्षणिक संस्था असो किंवा मग विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था म्हणजे सिनेट असते.

विद्यापीठ स्तरावरचे प्रश्न सोडवून शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या हिताचे विषय मार्गी लावून, त्यात सुरळीतपणा आणण्याची जबाबदारी सिनेट सदस्यांवर असते. त्यासाठी आग्रह धरायचा असतो. मात्र, गेल्या 10 वर्षांच्या युवासेनेच्या कार्यकाळावर नजर टाकली तर एकही मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न यांनी सोडविल्याचे दिसत नाही. मुंबई विद्यापीठात 10 सिनेट सदस्य असतात. यावेळी 10 च्या 10 सदस्य युवासेनेचे आहेत. या सगळ्या लोकांनी मिळून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एकही धोरणात्मक कार्यक्रम दिला नाही. क्षुल्लक असे छोटी-मोठी वसतिगृहाची डागडुजी, बांधकामांच्या विषयाच्या बाहेर हे लोकं जाऊ शकले नाही. यातही काही कमिशन वगैरेचा विषय होता की काय, असा प्रश्न निर्माण होतो.कारण मुंबई विद्यापीठात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे, दरवर्षी होणारा परीक्षेतला गोंधळ, पुनर्मूंल्याकन, गुणपत्रिका आणि निकालाचा आहे.

हा विषय सोडविण्यासाठी या सत्ताधार्‍यांनी प्रयत्न केले नाही. केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी काही संस्थांचे प्रश्न उपस्थित करणे आणि ते आपल्या सोयीने परत घ्यायचा गोरखधंदा चालविल्याची बाब आता समोर आली आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्‍या 75 टक्के महाविद्यालयांमध्ये मराठी विषय बंद झाल्याचे आकडे आहेत. अशी परिस्थिती असताना मराठी माणूस आणि मराठीच्या नावानं आपली राजकीय पोळी शेकणार्‍या, या गँगनं यासाठी तरी कधी आवाज उठवला का? केवळ लाभांच्या पदांवर बसून स्वतःचा विकास कसा करायचा हा एकमात्र उद्देश या गँगचा आणि त्यांच्या प्रमुखाचा असतो.याबाबत आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. आपली एक हाती सत्ता विद्यापीठावर राहावी म्हणून, राज्याची सत्ता हाती आल्या आल्या कुलपती म्हणून राज्यपालांना असलेले अधिकार कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यपालांचा विद्यापीठामधील हस्तक्षेपच कमी करून आपण आपला नाच आपण करू शकू, असा त्यांचा समज होता.

पण ज्या राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा आपण निर्णय घेतलाय् तो निर्णय राज्यात लागू करण्यासाठी त्याच राज्यपालांची स्वाक्षरी लागते, याचे साधे भान या सत्तेत आंधळे झालेल्यांना राहिले नाही आणि तोंडघशी पडले. यातून काय तर केवळ या गँगची आणि त्यांच्या लिडरची मानसिकता लक्षात येते. विद्यापीठावर राज्य करण्यासाठी यांनी बोगस मतदारांचा आसरा घेतला. आता अ‍ॅड. शेलारांनी ठाकरे गँगच्या नेमक्या त्याच दुखर्‍या नसेवर बोट ठेवलं आहे. अ‍ॅड. शेलारांनी केवळ बोगस मतदारांचा विषयच उचललेला नाही तर मतदार नोंदणीच्या शुल्कामध्ये झालेल्या गैरकारभाराची माहितीही समोर आणली आहे. एकाच डेबिट कार्डवरून चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे शुल्क भरले गेल्याचे उघड केले आहे. मतदार नोंदणीमध्ये संघटित आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीमार्फत याची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या गँगला आता प्रचंड वेदना होताना दिसत आहे. त्या वेदना अलिकडेच झालेल्या दसरा मेळाव्याच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवत होत्या. त्याची चौकशी करा, याची चौकशी करा… असे सल्ले देणार्‍या उद्धव ठाकरेंनी आपल्या काळात किती चौकशा केल्या?

किती गुन्हे कोणा कोणावर दाखल केले? कोणत्या चौकशी उकरून काढून वचपा काढला, अदखलपात्र गुन्हा अटक करून कशी खुन्नस काढली, माजी सैनिक, विद्यार्थी, कलाकार, नेते, विरोधी पक्षातले खासदार, आमदार, पत्रकारांवर कसा पदाचा दुरुपयोग करून बळाचा वापर केला? आणि हे करत असताना एका निष्पाप व्यक्तीची हत्या करणार्‍याची तो काय लादेन आहे का अशी पाठराखण करून, त्याची चौकशी करायला भर सभागृहात नकार दिला.100 कोटींची वसुलीची चौकशी करायलादेखील धजावला नाहीत… देशद्रोहासारख्या खटल्यात तुरुंगात गेलेल्या मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही, हे सारं काही जनता विसरली नाही. पापाचा घडा भरला की सारे हिशेब चुकते करावेच लागतात. मुंबई पालिकेबरोबर आता विद्यापीठातसुद्धा हिशेब चुकवावाच लागेल.
९२७०३३३८८६