शेतकऱ्यांनी मित्र आणि हितचिंतक गमावला

भारतातील हरित क्रांतीचे जनक आणि अन्नधान्याच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवणारे महान कृषी वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामिनाथन् यांचे निधन हे अनपेक्षित म्हणता येणार नसले, तरी सगळ्यांना धक्का देणारे निश्चितच आहे. सुरक्षित आणि भूकमुक्त देशाचे स्वप्न पाहणाऱ्या स्वामिनाथन् यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.१९४३ मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळात हजारो नाही तर लाखो लोकांना खायला काही नसल्यामुळे उपासमारीने आपले प्राण गमवावे लागले. आपल्या देशवासीयांचे हे हाल पाहून तरुण वयातील स्वामिनाथन् यांना अतिशय वेदना झाल्या. देशातीलच नाही तर जगातील भूक मिटवण्यासाठी तसेच यापुढे कोणी उपाशी राहणार नाही, यादृष्टीने आपले आयुष्य वेचण्यासाठी त्यांनी कृषीविषयक शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. कृषी क्षेत्रातील एक नाही तर दोन पदव्या मिळवून त्यांनी आपले आयुष्य देशातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वाहून घेतले.

कृषी क्षेत्रातील उच्चशिक्षण प्राप्त करून स्वामिनाथन् यांना परदेशात मोठ्या पगाराची नोकरी करून सुखवस्तू जीवन जगणे अशक्य नव्हते, पण आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग देशवासीयांसाठी करण्यासाठी भारतातच काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.आपला देश आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण दिसतो; तसेच भारतातील लोकांनाच नाही तर जगाला अन्नधान्याचा पुरवठा करण्याची जी क्षमता देशाने विकसित केली त्यांचे श्रेय डॉ. स्वामिनाथन् यांच्या नि:स्वार्थी प्रयत्नांना निर्विवादपणे द्यावे लागले. स्वामिनाथन् यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची भारत सरकारनेही दखल घेतली. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तीन पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. देशात असा बहुमान मिळविणारे हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे मोजके लोक आहेत, त्यात डॉ. स्वामिनाथन् यांचा समावेश आहे. जगातील अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेटने त्यांचा गौरव केला. यातील त्यांची एक पदवी तर परदेशातील होती.

मध्यंतरी शेतकरी आंदोलनाच्या काळात स्वामिनाथन् यांच्या नावाचा उल्लेख वारंवार ऐकू येत होता. स्वामिनाथन् समितीच्या शिफारसी लागू करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून तसेच विरोधी पक्षांकडूनही वारंवार केली जात होती. संपुआ सरकारच्या काळात म्हणजे २००४ नंतर देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. विदर्भात तर रोज दहा-बारा शेतकरी आत्महत्या करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील सरकारने डॉ. स्वामिनाथन् यांच्या नेतृत्वात एका आयोगाची स्थापना केली. राष्ट्रीय शेतकरी आयोग हा नंतर डॉ. स्वामिनाथन् आयोग म्हणून ओळखला जाऊ लागला. शेतकèयांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, त्यांचे जीवनमान उंचावे यासाठी डॉ. स्वामिनाथन् यांच्या नेतृत्वातील या आयोगाने दोन वर्षांच्या काळात केंद्र सरकारकडे पाच महत्त्वपूर्ण अहवाल सादर केले. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफ्यासह किमान हमी भाव द्यावा, ही त्यांची सर्वात महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी शिफारस होती.

देशातील कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांबाबत डॉ. स्वामिनाथन् यांनी केलेल्या शिफारसी तंतोतंत लागू केल्या तर देशातील एकाही शेतकèयावर आत्महत्येची वेळ येणार नाही, हे निश्चित! २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. स्वामिनाथन् यांच्या शिफारसींच्या आधारावरच देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेतले. तीन शेतकरी कायदे लागू करण्याचा निर्णय हा त्यापैकी एक होता.पण तीन कृषी कायद्यामागचा मोदी सरकारचा हेतू लक्षात न घेता त्यांच्या विरोधात राजकीय भूमिकेतून जोरदार आंदोलन करण्यात आले. परिणामी मोदी सरकारला आपले हे तिन्ही कायदे मागे घ्यावे लागले. विशेष म्हणजे हे कायदे मागे घेतल्यामुळे मोदी सरकारचे नुकसान झाले नाही तर देशातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.त्यांना पुन्हा आर्थिक विपन्नावस्थेच्या अंधारात लोटण्यात काही हितसंबंधी शक्तींचे प्रयत्न यशस्वी झाले. १९६० च्या दशकात देशात अन्नधान्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते.

गहू आणि तांदळाचे देशातील उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे आपल्या देशातील लोकांना मिलो गहू खावा लागत होता. अमेरिकेत मिलो हा तेथील जनावरांना खाऊ घालतात; तो खाण्याची वेळ आपल्यावर आली होती. त्यामुळे तत्कालीन सरकारने अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वावलंबी करण्यासाठी डॉ. स्वामिनाथन् यांच्या सल्ल्याने काही धोरणात्मक निर्णय घेतले. गहू आणि तांदूळ हा आपल्या देशातील मुख्य आहार आहे. त्यामुळे गहू आणि तांदळाचे देशातील उत्पादन वाढवण्यासाठी या क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय स्वामिनाथन् यांनी घेतला आणि शेतकऱ्यांना जास्त तसेच दर्जेदार उत्पादन मिळेल, अशा गव्हाच्या आणि तांदळाच्या बियाणाच्या नव्या जाती शोधल्या. गव्हाच्या कमी उंचीच्या रोपांचा वापर केला तर गव्हाचे उत्पादन वाढू शकते, असे स्वामिनाथन् यांचे संशोधन होते. यासाठी स्वामिनाथन् यांना मदत आणि मार्गदर्शन केले ते नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी. स्वामिनाथन् यांच्या विनंतीवरून बोरलॉग यांनी भारतातील गहू उत्पादक भागाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी भारताला चार वेगवेगळ्या गव्हाची बियाणे देण्याचा निर्णय घेतला.

देशात गव्हाच्या या बियाणाची पेरणी करण्यात आली. त्याचे हेक्टरी चार ते साडेचार टन उत्पादन मिळाले. बोरलॉग यांनी स्वामिनाथन् यांचे हे संशोधन मान्य केले तसेच मोकळ्या मनाने त्यांचे कौतुकही केले. येथूनच भारतातील हरित क्रांतीचा प्रारंभ झाला. स्वामिनाथन् यांनी देशातील शेतकऱ्यांना अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित केले, प्रशिक्षणही दिले.देशभरात विविध ठिकाणी प्रदर्शनीचे आयोजन केले. परिणामी १९६८ मध्ये देशातील गव्हाचे उत्पादन १.२ कोटी टनांवरून १.७ कोटी टनांवर गेले. डॉ. स्वामिनाथन् यांच्या कार्याचा गौरव म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील हरित क्रांतीवर टपाल तिकीटही काढले होते. देशातील कृषीविषयक सर्वच संस्थांमध्ये स्वामिनाथन् यांनी काम केले. देशातील गरीब माणूस आणि शेतकरी हा त्यांच्या चिंतेचा विषय होता.देशातील गरिबातील गरीब माणसावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये, दुसऱ्याचे पोट भरण्यासाठी शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला अर्धपोटी राहावे लागू नये तसेच शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचावे यासाठी स्वामिनाथन् यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवल्या जाणाऱ्या शेतकरी संघटनांना तसेच त्यांच्या तथाकथित नेत्यांना जे करता आले नाही, ते स्वामिनाथन् यांनी करून दाखवले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकार गेल्या काही वर्षांत काम करीत आहे, त्याचे फळही दिसून येत आहे. मोदी सरकारच्या या योजनेचाच भाग म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अन्नदाता शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प सोडला आहे.देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला होता. मोदी यांच्या सरकारने या नाऱ्याला ‘जय जवान जय किसान’ सोबत ‘जय विज्ञान’चे विस्तारित रूपही दिले. या देशात शेतकरी जगला वाचला तर देश आणि देशातील जनता जगणार आणि वाचणार आहे. डॉ. स्वामिनाथन् यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या कृषी वैज्ञानिकाच्या निधनाने देशातील शेतकऱ्यांनी आपला खरा मित्र आणि हितचिंतक गमावला आहे. त्यांच्या निधनाने देशाची अपरिमित हानी झाली आहे. मोदी सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे हीच त्यांना आता खरी श्रद्धांजली ठरणार आहे.