समाधी संजीवन हरिपाठ !

माउली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर माउलींची ग्रंथसंपदा अलौकिक, अनुभूत, अद्भुत असून त्यातील विचारही असिम आहेत. त्यांच्या प्रत्येक ग्रंथांचं किंवा विविध अभंगादी कृतींचं वेगळेपण आहे. या सर्व कृती पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वाङ्मय मूर्तीच आहेत. या सर्व ग्रंथांचा मुकुटमणी म्हणजे ‘हरिपाठ’ नावाचा ग्रंथ होय. एकूण २७ अभंगांचा आकाराने अत्यंत छोटा, पण विचाराने ब्रह्मांड सामावून घेण्याची क्षमता असलेला ग्रंथराज म्हणजे हरिपाठ ! स्वानंदसाम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज माउलींच्या हातून निर्माण झालेला हा ग्रंथ मोक्षाचा मार्ग प्रशस्त करणारा अद्भुत ग्रंथ आहे. नितांतसुंदर ग्रंथ निर्मितीची एक प्रासादिक कथा आहे. एकदा जगन्नाथ क्षेत्रावर सागरतीरावर सर्व ग्रंथ एकत्रित आलेत. चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराणे, गीता आणि भागवत, रामायण आणि महाभारत यासह सर्व उपनिषदांचा त्यात समावेश होता.

सर्वांनी देवाजवळ जाऊन भगवंताला विनंती केली की, ‘‘हे भगवंता आम्ही सर्वांनी तुझे भजन, वर्णन, स्वरूप, साधना आणि स्तुतिगायनाचा आटोकाट आणि स्तुत्य प्रयत्न केला.पण भगवंता खरं सांगू, प्रचंड प्रयत्न करूनही आम्ही अतृप्त आहोत. आम्हा सर्वांना अजूनही अपूर्णता वाटते. तुझ्या स्तुतीने आमच्या एकाचेही पोट भरले नाही. त्यामुळे आम्ही अजूनही अस्वस्थ आणि अतृप्त आहोत. हे भगवंता, न्यून ते पुरते कसं होईल यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. काय करावं म्हणजे आमच्यातली ही अशांतता दूर होईल. तुझे गुणगायन परिपूर्ण होईल.तुझी परिपूर्ण स्तुती केल्याचे समाधान आम्हाला मिळेल.” भगवान जगन्नाथ हसले आणि म्हणाले, ‘‘याचा उपाय तर माझ्याजवळही नाही, पण तुम्हाला मार्ग सांगतो. कलियुगात अलंकापूर क्षेत्रात मी ज्ञानेश्वर रूपात जन्म घेणार आहे. त्यावेळी तुम्ही सर्वजण ज्ञानदेवांजवळ जाऊन त्यांना शरण जा. ते तुमची अस्वस्थता दूर करतील.” विश्वाच्या नियंत्याची सूचना सर्व ग्रंथांनी शिरसावंद्य मानून कलिकाळात हे सर्व ग्रंथ माउलींना भेटायला आले. आपले मनोगत ज्ञानदेवांना कथन केले. माउलींनी आपले भावार्थदीपिकादी ग्रंथ त्यांच्यासमोर ठेवले. तेव्हा ज्ञानेश्वरी ग्रंथासह सर्व ग्रंथ माउलींना आपली अतृप्ती सांगू लागले.

म्हणाले, ‘‘आम्ही एवढे मोठे आहोत, पण भगवंताची स्तुती करण्यात खुजे ठरलो आहे.” वेदोनारायण म्हणाले, ‘‘हे महावैष्णव ज्ञानदेवा आम्ही खरंच अतृप्त आहोत. तुम्ही असा ग्रंथ निर्माण करा की, ज्यात परब्रह्म परमात्मा सामावून जाईल. ज्यात भगवंताचे परिपूर्ण स्तुतिगायन असेल. आम्ही शब्द देतो की, तो ग्रंथ जर साधकाने वाचला तर त्याला वेद, उपनिषद, गीता-भागवतासह आम्हा सर्व ग्रंथांचे पुण्य मिळेल.” सर्व ग्रंथांच्या आग्रहाला मान देऊन माउलींनी होकार भरला. ग्रंथाला सुरुवात केली आणि अवघ्या काही वेळातच ग्रंथ पूर्ण करून वेदोनारायणाच्या हाती दिला. आकाराने अत्यंत लहान ग्रंथ पाहिल्यावर सर्व ग्रंथांना शंका आली. आम्ही एवढे पहाडासारखे मोठे असूनही माझ्या तर वेदाच्या राशी आहेत तरीही भगवंताचे स्वरूप साठवू शकलो नाही; त्यात ही वामन वाङ्मय मूर्ती त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायकाला कशी सामावेल! ग्रंथाचे वाचन सुरू झाले आणि सर्व ग्रंथ आनंदाने नाचायला लागले. सर्व ग्रंथांचे सार, अर्क त्यात उतरून परिपूर्णता तिथे त्यांनी अनुभवली. सर्व ग्रंथ आनंदाने त्या छोट्या ग्रंथाच्या स्तुतीत दंग झाले आणि सर्वांनी एकासुरात सांगितले की, ‘‘जो हा ग्रंथ वाचेल त्याला इतर सर्व वेदादी ग्रंथ वाचण्याची गरज नाही. हा छोटा ग्रंथ वाचला की, आमचे फळ आपोआप प्राप्त होईल. आम्ही इतके तृप्त झालो की, हा ग्रंथ वाचला की, आम्हाला वाचण्याचे पुण्यफळ प्राप्त होईल.”

कोणता ग्रंथ होता तो? तो ग्रंथ होता केवळ २७ अभंगाचा गोड आणि प्रासादिक हरिपाठ !आकाराने लहान असला, तरी तूर्त फलदायी आणि सर्व ग्रंथांचे सार असलेला हा हरिपाठ नावाचा ग्रंथ होय. महाराष्ट्रात असं एकही गाव नसेल, जिथे हरिपाठाचे गायन होत नसेल. या ग्रंथात वेदापासून तर गीता-भागवताचा सत्यार्क उतरलेला आहे. पंढरीश परमात्म्याची ही वाङ्मय मूर्ती आहे. भागवत संप्रदायात हरिपाठ अनिवार्य मानला आहे. हरिपाठ न समजता वाचला तरीही नामाचे पुण्य मिळते, अशी या ग्रंथाची ख्याती आहे. हरिपाठाचा भावार्थ आणि अन्वयार्थ खूप खोल असला, तरी वाच्यार्थ मात्र सहज आणि सुकर आहे. हरिपाठ गाताना याची अनुभूती आपोआप येते. हरिपाठाच्या सुरुवातीलाचा देवाच्या दारात क्षणभर उभे राहण्याचा सहज विचार त्याला खोलवर सायुज्यता, समिपता, सलोकता आणि सरूपता या चार मुक्तीचा विचार सहज देऊन जातो. तर, हरिपाठाच्या शेवटी ‘रिकामा अर्धघडी राहू नको, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी सांगून समाधी संजीवन हरिपाठ,’ हे सांगायला विसरत नाहीत. संपूर्ण हरिपाठात ज्ञानेश्वर माउलींनी आपला जीव ओतला आहे. जगाचे कल्याण व्हावे, सर्वजण सुखी व्हावेत आणि सर्वांना संजीवन समाधीची अनुभूती यावी हा त्यांच्या हृदयाचा गर्भितार्थ आहे.

गुरुकृपा काय असते हे सांगताना हरिपाठात नितांतसुंदर शब्दात त्यांनी सहज आणि सोप्या दृष्टांतात सिद्धांत मांडला.
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती
किंवा
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती
माउलींनी आपल्या ग्रंथ संपदेतून प्रचंड तत्त्वज्ञान जगासाठी मांडले आणि खुले केले, पण त्याचे संपूर्ण श्रेय ते गुरुमाउली निवृत्तिनाथांना देतात. हरिपाठातून गुरुतत्त्व लघु शब्दात सामावले आहे. हा ग्रंथ रोज वाचल्याने ग्रंथ पारायण सेवा घडते. ग्रंथ म्हणजेच नामसंकीर्तन आहे. त्यामुळे नामस्मरण आपोआप होते. भगवंताचे तत्त्व हृदयात कायम निवासी राहते आणि नामस्मरणाचे फळ प्राप्त होते. हा ग्रंथ जेव्हा आपण आर्तपणे गायन करतो तेव्हा माउलींनीच हरिपाठात प्रमाणभूत केले आहे.
तुटेल धरणे प्रपंचाचे, पळे भुतबाधा
कळीकाळ त्यासी न पाहे, पापाचे कळप पळती पुढे
पवित्रंची होय देह त्याचा, सर्व दोषा हरण
भुक्तिमुक्ती चारी घरी त्याच्या, म्हणती जे वाचा तया मोक्ष

यासोबतच ‘हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले’ हे आवर्जून पुण्यफळ मिळणार, हे त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे हरिपाठ नावाचा ग्रंथ सर्वांनी आवर्जून रोज वाचावा. त्यामुळे ईह लोकांत सुखशांती तर मिळतेच; पण पारलौकिक सुखाची शाश्वती या ग्रंथाच्या पठन अथवा श्रवणाने मिळते, असा विश्वास वारकरी संप्रदायातील सर्व भक्तांना आहे.
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय। पवित्रंची होय देह त्याचा
आपल्या जीवनाची सार्थकता आणि इतिकर्तव्यतेचा मार्ग सोपान म्हणजे हरिपाठ नावाचा नितांत सुंदर ग्रंथ होय. म्हणूनच अवघा महाराष्ट्र ज्या ग्रंथाला डोक्यावर घेऊन हरिनामात तल्लीन होतो तो सर्वांगसुंदर ग्रंथ म्हणजे हरिपाठ होय. त्याचे नित्य वाचन जीवनात परमशांतीची अनुभूती आणि ऐश्वर्याचा विवेक उत्पन्न करतो.

९८२२२६२७३५
– प्रा. दिलीप जोशी