स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात क्रांतिवीरांना नाट्यवंदना

आपण यंदा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. २० वर्षांनंतर पिढी बदलते असे समजले तर आज स्वातंत्र्यानंतरची चौथी पिढी नांदते आहे. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. कित्येक इंग्रज शासनाच्या जुलुमी अत्याचारांना बळी पडले.  कित्येकांना परागंदा व्हावे लागले. अगणीत कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कित्येकांच्या घरादारावर जुलुमी शासनाचा वरवंटा फिरला. परंतु त्यातील अनेकांची नावेही आपल्याला ठाऊक नाहीत. आपला देश केवळ दीडशे वर्षेच गुलामीत नव्हता. यापूर्वीही त्याने अनेकदा परकीय सत्तेच्या जुलुमांचा अनुभव घेतला होता.

या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न झाला तो १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात. पुढे ९० वर्षे लढा दिल्यानंतर १९४७ साली स्वातंत्र्याची पहाट उजाडली. यासाठी जे क्रांतिवीर बळी गेले त्यातील बरीच नावे आपल्याला ठाऊक आहेत. परंतु असे अनेक आहेत की, ज्यांची नावे आणि त्यांचे कर्तृत्व आपणास ठाऊक नाही. आपणास आणि विशेषतः नव्या पिढीला ते माहीत व्हावे यासाठीच संस्कार भारतीच्या वतीने नागपुरात आजपासून दोन दिवस ‘क्रांतिगाथाङ्क या शीर्षकाखाली बहुभाषिक नाट्य महोत्सव सुरू होत आहे.महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेश भट सभागृहात आजपासून आयोजित या नाट्य महोत्सवात विविध भाषांमधील १२ लघु नाटके सादर होणार आहेत. भारताच्या विविध प्रांतांमधून या सादरीकरणासाठी साधारण १५० ते २०० कलावंत आलेले आहेत.

मध्यप्रदेशातील कलावंतांची ‘एक भुलासा सेनानी’ या एकांकिकेत महाकाळेश्वराचे पुजारी बळवंत भट्ट यांचा पुत्र नारायणाची गाथा आहे. पत्रादेवीच्या जत्रेत त्यांनी केलेल्या बलिदानाची कथा यात आहे. राजस्थानची चमू देशभक्त संत गोविंदगुरू यांच्या आणि भिल्ल समाजातील क्रांतिवीरांच्या बलिदानाचा पट ‘शंखनाद’ या एकांकिकेतून उलगडेल. पश्चिम बंगालच्या तीन चमूंचा यात सहभाग असून ‘नाम सुशील’, ‘रिंडो’ आणि ‘द अँग्लो बोर वॉर’ या एकांकिका ते सादर करतील. सुशील सेनगुप्ता आणि आदिवासींचा सरदार रिंडो माझी या दोन अज्ञात क्रांतिवीरांची गाथा त्यात रंगविली आहे. राजस्थानचे कलावंत क्रांतिवीर हेमू कलाणी यांची बलिदान गाथा रंगवेल. छत्तीसगढचे कलावंत पहटिया सादर करतील. केरळचे कलावंत ‘अरण्यपर्वम’ हे लघुनाट्य सादर करतील. पंजाबचे कलावंत शहीद उधमसिंग यांचे बलिदान आणि झारखंडचे कलावंत ‘उलगुलान’ हे नाटक सादर करतील. महाराष्ट्राचे कलावंत दोन एकांकिका सादर करणार आहेत. ‘द प्लॅन’ या नाटकात चापेकर बंधूंची चित्तथरारक कथा आणि ‘वंदेमातरम डॉ. हेडगेवार’ या एकांकिकेत आद्य सरसंघचालक पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे चरित्र सादरीकरण असेल.

अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात
धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा…

कविवर्य कुसुमाग्रजांच्या या अजरामर ओळींचा पुनःप्रत्यय देणारा हा नाट्य महोत्सव आहे. संस्कार भारती ही कलेच्या क्षेत्रात राष्ट्रभक्तीची बीजे रोवणारी आणि ललित कलांना समर्पित अशी कलासाधकांची अखिल भारतीय संघटना आहे. ‘साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं’ या आपल्या ध्येयगीतात संकल्पिल्यानुसार संस्कार भारती नव्या पिढीला, आपल्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन या महोत्सवातून घडविणार आहे.आपल्या ऊर्जस्वल इतिहासाची आणि संपन्न परंपरेची आज अनेकांकडून तोडमोड होते आहे. अशा काळात आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील हे अविस्मरणीय क्षण आपण नाट्यरूपाने बघणार आहोत.

इतकेच नव्हे, तर भारताच्या विविध प्रांतांमधील नाट्यपरंपरांचे दर्शनही यानिमित्ताने घडणार आहे. याच दरम्यान विदर्भातील अन्य कर्तबगार कलावंतांच्या कलेचे दर्शन आपणास घडेल. नटराज कला अकादमीच्या कलावंतांनी तयार केलेले क्रांतिवीरांच्या चित्रांचे प्रदर्शनही यावेळी आयोजित केले आहे. संस्कार भारतीच्या या प्रयत्नाला नागपूरकर रसिक या नक्कीच उचलून धरतील, असा विश्वास आहे.

९८२२२२२११५
प्रासंगिक
– प्रकाश एदलाबादकर