हमास व याह्या सिनवरचे भवितव्य !

इस्रायलच्या जगप्रसिद्ध गुप्तहेर संघटना मोसादला थोडीही कुणकुण लागू न देता ७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहशतवादी घुसखोरांनी इस्रायलवर जमीन, हवा व पाणी या तीनही मार्गाद्वारे हल्ला केला तसेच २० मिनिटात पाच हजारांवर रॉकेटद्वारे हल्ला करून इस्रायल तसेच सर्व जगाला हादरवून टाकले. सीमेवरील कुंपण तोडून दहशतवाद्यांनी दुचाकीवर स्वार होऊन शहरात दिसेल त्याला गोळ्या घातल्या. घरात शिरून घरातील लहान बालकांसह सर्वांना ठार केले. या अचानक हल्ल्याने गोंधळलेल्या नागरिकांपैकी काही तसेच काही सैनिकांनाही कैद करून ताब्यात घेतले.याप्रसंगी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचे टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या व्हिडीओची दृश्ये थरकाप उडविणारी, बीभत्स व विकृतीपूर्ण होती. असा बर्बरतापूर्ण हल्ला करणारे हल्लेखोर होते पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचे!

१९४८ च्या स्थापनेपासूनच इस्रायल आपल्या सभोवतालील शत्रुराष्ट्रांच्या डोळ्यात खुपू लागला होता. इस्रायलने आपली भूमी बळकावली, असा पॅलेस्टिनींचा दावा आहे. त्यामुळे इस्रायलने जिंकलेल्या प्रदेशातून तसेच निर्वासित होऊन शेजारच्या राष्ट्रात शरणार्थी म्हणून राहणाऱ्या अनेक पॅलेस्टिनींनी आपली भूमी परत घेण्यासाठी विविध संघटना करून आंदोलने केली. १९८७ साली गाझाच्या एका चेकपोस्टवर त्यांचे आंदोलन सुरू असताना इस्त्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबारात चार पॅलेस्टिनी ठार झाले. याच घटनेमुळे इस्रायलविरोधात सशस्त्र आंदोलन करण्याच्या इराद्याने हमासचा जन्म झाला.हमास म्हणजे ‘हरकत अल मुकवामा अल इस्लामिया!’ अर्थात इस्लामिक रेजिमेंट मुव्हमेंट. म्हणजेच इस्लामिक प्रतिशोध आंदोलन. ही एक इजिप्शियन व पॅलेस्टिनियन सुन्नी मुसलमानांची संघटना आहे. इस्माइल हनियेह हा सध्या संघटनेचा प्रमुख आहे. संघर्ष करून इस्त्रायलजवळून पॅलेस्टिनी भूमी परत घेणे व त्याठिकाणी इस्लामिक राज्याची स्थापना करणे हा हमासचा उद्देश आहे. इजिप्तची राजधानी कैरो येथे राहणाऱ्या पॅलेस्टिनी शरणार्थी शेख अहमद यासीन याने हमासची स्थापना केली.यासीन पॅलेस्टिनियन मौलवी होता. वयाच्या बाराव्या वर्षीच एका खेळातील अपघातामुळे तो दोन्ही पायांनी अपंग झाला. त्यामुळे तो नेहमी व्हिलचेअरचा वापर करीत असे.

१९६० च्या दरम्यान तो गाझा व वेस्ट बँकमध्ये धर्मप्रसार करीत होता. सुरुवातीला इस्त्रायलची त्याचेकडे वक्रदृष्टी नव्हती; उलट यासीर अराफतच्या पीएलओला पर्याय म्हणून हमासला नजरेआड केले होते.१९७३ मध्ये यासीनने गाझामध्ये स्थापन केलेल्या एका धर्मदाय संस्थेला इस्त्रायलने मान्यताही दिली होती. पण १९८४ मध्ये त्याला व त्याच्या काही सहका-यांना गुप्तपणे शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली व तो पोलिसांच्या नजरेत आला. १९९१ मध्ये त्याला लोकांना इस्रायल सैनिकांचे अपहरण करून हत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. जन्मठेप व १५ वर्षांची शिक्षा झाली. १९९२ मध्ये हमासच्या सैनिकी शाखेची स्थापना करण्यात आली. एप्रिल ९३ मध्ये हमासने इस्त्रायलवर पहिला आत्मघातकी हल्ला केला. दरम्यान, पीएलओच्या यासीर अराफत यांना इस्त्रायलला समूळ नष्ट करणे शक्य नसल्याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्त्रायल व पॅलेस्टिनियन राष्ट्रपती यासीर अराफत यांचेत १९९४ ला ओस्लो करार झाला. त्यानुसार पीएलओने इस्त्रायलला मान्यता दिली व बदल्यात गाझा व वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनच्या स्वशासनाबाबत तडजोड झाली.

त्यानुसार सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पॅलेस्टिनी अथॉरिटीची (पीए) स्थापना करण्यात आली. हमासने मात्र इस्त्रायलविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. गर्दीची ठिकाणे, बस, कारद्वारे आत्मघातकी कारवाया सुरूच होत्या. १९९७ मध्ये जॉर्डनच्या कैदेत असणाऱ्या मासोदच्या दोन गुप्तहेरांच्या बदल्यात त्याची सुटका करण्यात आली. त्याला इस्त्रायलला मान्यता देण्याची बाब मान्य नव्हती; मात्र मर्यादित स्वरूपात का होईना, पॅलेस्टिनियनचे लोकप्रतिनिधित्व करणारा अधिकार मिळतो म्हणून त्याचा पॅलेस्टिनी प्राधिकरणाला पाठींबा होता. मात्र, २२ मार्च २००४ रोजी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला. त्याच वर्षी यासीर अराफतचाही मृत्यू झाला.अराफतची जागा महमूद अब्बासने घेतली. तो पी.ए.चा चेहरा बनले. मात्र, तो एवढा प्रभावी नसल्याने हमासचा प्रभाव वाढला. २००५ मध्ये इस्त्रायलने गाझामधून आपले सैन्य व वस्त्या (नागरिक) वापस घेतले. तेव्हा हमासने राजकारणात उडी घेतली. २००६ मध्ये निवडणूका होऊन गाझामध्ये हमासचा विजय होऊन इस्साम अल-दाअलीस पंतप्रधान झाले. वेस्ट बँकमध्ये पीएलओच्या फतहने विजय मिळवून मोहम्मद अब्बास हे अध्यक्ष झाले. हमासच्या सैनिकी शाखेने इस्त्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले. तेव्हा हे हल्ले बंद पाडण्यासाठी इस्त्रायलने गाझावर हल्ला केला.

२००८ मध्ये इस्त्रायलने केलेल्या कारवाईत अंदाजे १२०० हून अधिक पॅलेस्टिनी व १२ इस्त्रायल नागरिक मरण पावले तर २०१२ मधील कारवाईत १७० पॅलेस्टिनी व ७ इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. २०१४ च्या इस्त्रायल-हमासच्या संघर्षात २५०० पॅलेस्टिनी व ८० इस्त्रायल नागरिक ठार झाले. २०२१ च्या अल अलास्का मस्जिद प्रकरणात शेकडो पॅलेस्टिनी मारले गेले. त्यानंतर काही काळ शांततेचे वातावरण होते; मात्र ही वादळापूर्वीची शांतता होती, हे ७ ऑक्टोबरच्या थरारक व क्रूर हल्ल्यावरून दिसते.७ ऑक्टोबरच्या क्रूर हल्ल्याने संतप्त झालेल्या इस्रायलने हमासला नेहमीसाठी अद्दल घडविण्याची प्रतिज्ञा केली आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी गाजन प्रमुख याह्या सिनवर याला जबाबदार धरले असून तो इस्रायलचा मोस्ट वॉन्टेड आहे. याह्या सिनवर हमासमध्ये हनियेहनंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. त्याचा जन्म २९ ऑक्टोबर १९६२ रोजी गाझामधील खान यूनस या शहरी झाला. तो गाझाच्या इस्लामिक विश्वविद्यालयाचा पदवीधर आहे. १९८९ मध्ये इस्रायल सैनिक व आपलेच काही सहयोगी यांच्या हत्येप्रकरणी त्याला आजीवन कारावास झाला.

मात्र, २०११ मध्ये इस्रायल सैनिक गिलाद शालीतच्या बदल्यात त्याला सोडण्यात आले. इस्त्रायल संदर्भातील कोणत्याही चुकीसाठी तो आपल्या सहका-यांना ठार करीत असल्याने खान यूनस कसाई म्हणूनही ओळखला जातो. त्याने हमासमध्ये आतंकी गटासाठी आंतरिक सुरक्षा दल निर्माण केले. २०१५ मध्ये अमेरिकेने त्याला खूंखार आतंकी म्हणून घोषित केले व तेव्हापासून तो प्रसिद्धीला आला. २०१७ मध्ये तो गाझामधील हमासचा प्रमुख झाला. इस्त्रायलच्या सुरक्षा दलाचा प्रवक्ता लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेचट नुसार याह्या हा सैतानाचा चेहरा असून इस्रायलवरील हवाई हल्ल्याचा तो मास्टर माईंड आहे. गाझावर सतत होणारे हल्ले आम्ही सहन करू शकणार नाही, अशी गर्भित धमकी इराणने दिली आहे.  तर, इस्त्रायलला कारवाईचा हक्क असल्याचे सांगून व भूमध्य सागरात आपल्या दोन युद्धनौका पाठवून अमेरिकेने इस्त्रायलची पाठराखण केली आहे. अमेरिकेच्या या कृतीने युद्धाच्या विस्ताराला मर्यादा पडतील की युद्ध अधिक विस्तारेल, हे येणारा काळच ठरवेल. पण इस्रायलची जिद्द व बदल्याचा इतिहास पाहता याह्या सिनवर, हमास व गाझा पट्टीसाठी येता काळ कठीण राहील हे निश्चित.

 

९८३४३५०८९५

भालचंद्र ठोंबरे