ऊर्जा क्षेत्राला अधिक ऊर्जा देणारे ‘मिशन माहिर’

वीज व ऊर्जा या बाबी उद्योग-व्यवसायाला चालना देऊन राष्ट्रीय पातळीवर आर्थिक प्रगतीसाठी नेहमीच उपयुक्त व आवश्यक ठरतात. त्यामुळेच या क्षेत्राकडे राज्य व केंद्रीय पातळीवर नेहमीच प्राधान्यपूर्वक लक्ष दिले जाते. सरकारी धोरणांची दिशा त्यावरच आधारित असते. त्यासाठी अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञानावर भर दिला जातो. याच साऱ्या प्रयत्नांचा एक एकत्रित भाग म्हणून, ऊर्जा क्षेत्रात तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित व नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयातर्फे नव्यानेच ‘मिशन माहिर’ या नव्या ऊर्जावान उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.यासंदर्भातील उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्र सरकारच्या ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे देशांतर्गत ऊर्जा व वीज निर्मिती-वितरण क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांचा विशेष अभ्यास करून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा समावेश विशेषत्वाने करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून, ऊर्जा क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानासह संशोधनाची जोड देऊन देशासाठी म्हणून राष्ट्रीय स्तरावर  ‘मिशन माहिर’ या उपक्रमाची औपचारिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली.

तांत्रिक स्वरूपात व शब्दशः सांगायचे म्हणजे माहिरचा अर्थ होतो, ‘मिशन ऑन अ‍ॅडव्हान्सड् अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च.’ या शब्दावलीवरूनच या नव्या उपक्रमामागची अद्ययावत व शास्त्रोक्त संकल्पना स्पष्ट होते. या नव्या  मिशनमध्ये केवळ संशोधन-संकल्पना नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण व यशस्वी अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. त्यादृष्टीने ऊर्जा क्षेत्रात मेक इन इंडिया व स्टार्ट अप या दोन नव्या संकल्पनांसह शून्य वीज गळती यांसारख्या कार्यपद्धतीवर विशेष भर देण्यात आला. व्यापक स्तरावर ‘मिशन माहिरङ्कमध्ये पुढील उद्देशांवर भर देण्यात आला आहे. वीज निर्मिती व ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रात नव्या व प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्यांचा आगामी गरजांच्या संदर्भात अधिकाधिक प्रभावी व परिणामकारक स्वरूपात उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे.* ऊर्जा क्षेत्रात निर्मिती-वितरणापासून ऊर्जा संशोधन व व्यवस्थापन संदर्भात काम करणाऱ्या सर्व घटक व संस्थांना समाविष्ट करून त्यांना विशेष कार्यपद्धतीसह एकत्र मंच उपलब्ध करून देणे.ऊर्जा तंत्रज्ञान-संशोधन क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देऊन, त्याला भारतीय स्वरूपातील प्रयत्नांची जोड देणे.आवश्यकतेनुसार व आगामी गरजांची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य करारांसह विशेष प्रयत्न करून त्याद्वारे तंत्रज्ञानाची यशस्वी देवाणघेवाण करणे व परस्पर सहकार्यासह विकास साधणे.

भारताला ऊर्जा क्षेत्रात अव्वल व जागतिक स्तरावर अग्रणी बनविणे. वरील धोरण-उद्दिष्टांसह ऊर्जा क्षेत्रातील ‘मिशन माहिर’मध्ये जागतिक पातळीवर असणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीजची टंचाई लक्षात घेता, त्याला पर्याय शोधणे, भारतीय गरजा व खानपान पद्धतीला अनुसरून विजेवर चालणारे कुकर व स्वयंपाक उपकरणांमध्ये सुधारणा घडवून आणणे, इंधन वापरामध्ये हरित इंधनाच्या वापराला अधिकाधिक चालना देणे, ऊर्जा निर्मितीमध्ये कोळशाचा वापर कमीत कमी ठेवणे, अधिकाधिक प्रमाणावर कर्ज गुणांकांची वाढ करणे, शीतगृहांचा ऊर्जेच्या संदर्भात अधिकाधिक प्रमाणावर कर्ज गुणाकांची वाढ करणे, शीतगृहांचा उर्जेच्या संदर्भात अधिकाधिक कार्यक्षम बनविणे, इलेक्ट्रिक वाहन बॅटरीसाठी अधिकाधिक प्रमाणावर नॅनो तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणे व या साèयामध्ये अधिकाधिक स्वरूपात स्वदेशी ज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करणे, याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरविण्यात आला,

हे विशेष निश्चित कार्यपद्धतीनुसार ‘मिशन माहिर’अंतर्गत ऊर्जा व वीज निर्मिती क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान, वीज उत्पादन, ऊर्जेचा दर्जा व व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रातील सुधारणांसह विशेष संशोधन प्रस्ताव व त्याचा तपशील संबंधित विषय तज्ज्ञांकडून मागविला जातो. संशोधन प्रस्तावाचे वैशिष्ट्य व उपयुक्तता याचा प्राथमिक अभ्यास करून राष्ट्रीय पातळीवर वीज निर्मिती व वितरण-व्यवस्थापन क्षेत्रातील कंपन्यांकडे, हे प्रस्ताव पाठविले जातात. यामागे नवीन संशोधन प्रस्तावांचा विविध अंगांनी अभ्यास करणे, हा मुख्य उद्देश असतो.वीज उत्पादन वा वितरण क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या गरजांनुरूप नव्या संशोधन प्रस्तावांचा विचार करून त्यानुसार प्रतिसाद देतात. संशोधन प्रस्तावांची निवड करताना संबंधित कंपनीच्या व्यावसायिक गरजांशिवाय प्रगत तंत्रज्ञान, व्यावहारिक उपयुक्तता, दूरगामी परिणाम, ग्राहकांना होणारे फायदे इ. वर विचार केला जातो. संशोधन प्रस्तावाची निवड करताना व्यावसायिकसंदर्भात व दर्जा, किंमत उपयुक्तता व दीर्घकालीन फायदे इ. मुद्यांचा प्रामुख्याने विचार करून निवड करण्यात येते.

अशा प्रकारे निवड झालेल्या संशोधन प्रकल्प व प्रस्तावासाठी त्याच्या आवश्यकतेनुसार व विविध टप्प्यांवर अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाते. ऊर्जा क्षेत्रातील या नव्या व ऊर्जावान क्षेत्रातील या कल्पक नवसंकल्पनेच्या संदर्भात केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव अशोककुमार यांच्यानुसार ‘मिशन माहिर’यशस्वी करण्यासाठी त्यांचे मंत्रालय व केंद्र सरकारद्वारे बहुविध स्वरूपात प्रयत्न केले जाणार आहेत. याचाच एक मुख्य भाग म्हणून मिशनद्वारा राष्ट्रीय स्तरावरील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी विभिन्न विद्यापीठ व संशोधन संख्या राज्य व केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, शास्त्रज्ञ व संशोधक या संस्थांचे एकत्रित व संयुक्त स्वरूपातील सहकार्य घेतले जाणार आहे.