संत गजानन महाराजांचा माणूस धर्म

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारी।। असे संतांचे वर्णन केले जाते. जगातील समस्त मानव जातीचा उद्धार व्हावा यासाठी संतांचे अवतार असतात. स्वत:चा कोणताच स्वार्थ संतांना नसतो. तर बहुत प्रयासाने मिळालेल्या नरजन्माचे सार्थक माणसांनी करावे यासाठी त्यांची तळमळ असते. समाजाला दिशा दाखवणारे आणि समाजाच्या उन्नतीसाठी व उन्नयनासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे संत हे सर्व काळात, सर्व देशांत व धर्मात अवतरलेले असल्याचे दिसून येते. सगळ्या संतांच्या चरित्रातून एकच शिकवण मिळते; ती अशी-
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे…माणसाने माणसाशी माणसासम वागणे

माणसाने आपल्या सभोवतांच्या जगाशी माणूस धर्माने वागावे हे संत आपणास सांगत असतात. असेच एक संत म्हणजे विदर्भातील शेगाव या गावातील संत गजानन महाराज. या संतांनी कोणते ग्रंथ लिहिले नाही, कोणत्या तीर्थयात्रा केल्या नाही, प्रवचने-कीर्तनेही केली नाही; पण आपल्या रोजच्या प्रसंगातून त्यांनी जगाला माणूस धर्म शिकविला. णूस धर्म आपणास सांगतो की, कोणी कसेही वागावे, आपण चांगलेच वागावे. पाटलांच्या पोरांचे संदर्भातील प्रसंग आपणास ही शिकवण देतात.

पाटलाच्या पोरांनी उसाचा मारा महाराजांवर केला तरी त्यावर न चिडता महाराज म्हणतात, ‘‘मुलांनो, तुमच्या हाताला फार त्रास झाला असेल. त्यामुळे श्रमपरिहार करण्यासाठी तुम्हाला मी रस काढून देतो.” आपल्या कोणालाही जमणार नाही असे हे महाराजांचे अचाट ताकदीचे कृत्य आपणास अचंबित करते. सर्व प्राणिमात्रांवर भूतदया करणे हा माणूस धर्म आहे. नाठाळ द्वाड असलेल्या घोड्याच्या चार पायांमध्ये महाराज जाऊन पहुडले आणि आनंदाने भजन म्हणत राहिले आणि ‘जीव हा शिव स्वरूप’ आहे हा आत्मज्ञानाचा बोध करून त्याला शांत केले. महाराजांनी घोड्याला ‘गड्या’ अशी मैत्रीपूर्ण हाक मारली; जसे समर्थांनी मनाला ‘मना सज्जना’ अशी हाक मारली. महाराज घोड्याला म्हणतात की, शिवासमोर बैलाप्रमाणे वागायचं. बैल याचा अर्थ शंकराच्या पुढचा बैल म्हणजे नंदी. नंदी हा सामर्थ्य असूनही शंकराचे वाहन होऊन राहिला. याचा अर्थ सामर्थ्याचा गैरवापर न करता योग्य ठिकाणी सामर्थ्य दाखवा. पशूदेखील महाराजांच्या आज्ञेमध्ये होते, हे माणूस धर्माचे बळ !

सुकलालच्या गाईचा प्रसंग हेच सांगतो महाराज गाईला शांत करतात आणि म्हणतात की, गाय ही सगळ्या जगाची माय आहे. एकूणच काय तर महाराजांचा जो प्रभाव माणसांवर होता तोच पशूंवरही होता. अडल्या-नडल्यांना सहाय्य करणे हा माणूस धर्म होय. जानराव देशमुख यांना प्राणांतिक आजार झाला असता केवळ चरण तीर्थ देऊन त्यांना महाराजांनी बरे केले. अकोला गावामध्ये पाण्याचा दुष्काळ असताना भास्कर पाटलांच्या विहिरीला पाणी आणून लोकांची सोय महाराजांनी केली. खंडू पाटील जो महाराजांना अनन्यशरण गेला त्याची इभ्रत राखली. आपण सर्व एकाच परमात्म्याची लेकरे आहोत. सगळ्यांशी प्रेमाने वागणे, सगळ्यांचा आदर करणे हा माणूस धर्म. चंदू मुकीमकडे असलेले महिनाभर शिळे कानवले खाऊन त्यांनी सर्वांप्रती असलेले प्रेम प्रकट केले तसेच भाऊ कवरच्या प्रेमाच्या नैवेद्यासाठी महाराजांनी दुपारी ३ पर्यंत वाट पाहून बाकी नैवेद्य नाकारून त्याच्या भक्तीला प्रेमाची दाद दिली. मोहताबशा या सत्पुरुषाला शिकवण देऊन तसेच नरसिंगजीची आंतरिक स्थिती जाणून महाराज त्यांच्या भेटीला गेले.

कोणतेही कार्य किंवा कर्म करताना त्या कार्याप्रती आस्था असेल तरच माणूस धर्मपूर्ण होतो. लोकमान्यांची देशभक्ती, त्यांचे कार्य पाहून त्यांच्या कार्याला महाराजांनी आशीर्वाद देऊन आपला माणूस धर्म पूर्ण केला. महाराजांच्या बोलण्यातून त्यांचं अगाध ज्ञान आणि ख-या राष्ट्रपुरुषाबद्दलचं प्रेम व्यक्त झाले आहे. महाराजांनी लोकमान्यांना आशीर्वादही दिला होता.
आपला देह इतरांच्या कामी लावणे हा माणूस धर्म. महाराज पंढरपूरला आले असता कवठे बहादूरचा पंढरी नावाचा एक माळकरी; त्याला कॉलऱ्याची लागण झाली. त्याला सोबत न्यायला कोणी तयार नाही. पण महाराज म्हणाले, ‘असं कसं तुम्ही खुळ्यासारखा वागता. आपल्या देशबंधूला अशा स्थितीमध्ये सोडण हे काही बरं नाही.’ त्यांनी वारकऱ्यायाला उठून बसवलं आणि काळाच्या दाढेतून बाहेर काढलं. कठीण समय येता संत कामास येतात. गणू जवऱ्यावरचा प्रसंग. गणू महाराजांना हाक घालतो, महाराज धावून या. तुमच्याशिवाय माझं रक्षण कोण करेल. महाराज त्याचं रक्षण करतात. ते म्हणतात, ‘तुझं गंडांतर आलं होतं. ते आज मी निमालं.’ अंत:करणामध्ये पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा असल्याशिवाय संतांचे स्मरण होत नाही; पण आर्त स्मरण केले की, संत आपला माणूस धर्म पूर्ण करतात. संकटात असताना एका हाताने दुसऱ्यांना हात देणं हा माणूस धर्म.

मारुती पंतांच्या शेतामध्ये पिकांचे रक्षण करणारा तिमाजी प्रामाणिक होता, पण रात्री गाढवं आली आणि धान्य भक्ष्यू लागली. महाराजांनी त्याला हाक मारून जागे केले. नुकसानीतून वाचविले. तुकाराम शेगोकरांनी महाराजांची सेवा केली आणि महाराजांनी त्यांची त्रासातून मुक्तता केली. बापूराव सावरगावकर यांच्या पत्नीला भानामती झाली होती. अखेर त्यांनी गजानन महाराजांना हात जोडले. महाराजांनी नुसत्या नजरेने भानामती दूर केली. अशा अनेक प्रसंगांतील महाराजांनी आपला माणूस धर्म पूर्ण केलेला दिसतो. सत्याचा मार्ग हाच खरा माणूस धर्म आहे. माणूस धर्माचे बीज अखिल मानव जातीच्या मनी रुजवलं जावं, हे संतांचे स्वप्न होते आणि ते संत गजानन महाराजांनी पूर्ण केलेले आपणाला दिसून येते. प्रत्येक माणसाचे जीवन तेजाने उजळून निघावं हेच कार्य त्यांनी केले. गजानन महाराजांनी माणसा-माणसातील द्वदेषभाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कारण विश्वाच्या वेदना हेलावून जाणारे मन त्यांच्याजवळ होते. माणूस धर्माची खूण आहे, असा हा माणूस धर्म जपणाऱ्या संत गजानन महाराजांना आदरांजली.

विशेष लेख
डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर
९४२३७३३६३०