झिका’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जलद ताप सर्वेक्षण मोहीम

मुंबई : झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने जलद ताप सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत बाधित रुग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येणार आहे.

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. तो मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी ताप सर्वेक्षण मोहिमेशिवाय गर्भवती महिलांचे रक्तजल नमुन्यांचे संकलन आणि तपासणी, सर्व रुग्णांना लक्षणांवर आधारित उपचार, गर्भवती महिला आणि जननक्षम जोडप्यांना या आराजारातील धोक्यांबाबत मार्गदर्शन, एडीस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी किटक शास्त्रीय उपाय योजना करण्यात येत आहे.

राज्यामध्ये झिका या आजाराचे जानेवारी २०२४ पासून १६ जुलैपर्यंत एकूण २५ रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये २१ रूग्ण पुणे शहरात, तर एक रुग्ण सासवड (जि. पुणे) येथे, एक भूगांव (ता. मुळशी जि. पुणे) येथे आणि मे २०२४ मध्ये एक कोल्हापूर आणि एक संगमनेर येथे आढळून आला आहे.

काळजी कशी घ्यावी?
या आजारामध्ये रुग्णालयात भरती होण्याची गरज नाही. मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य असल्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. ताप आल्यास जवळच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार शासकीय रूग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीसुद्धा त्यांचेकडे अशाप्रकारचे रूग्ण दिसून आल्यास त्यांनी रूग्णाचा रक्तजल नमुना शासकीय यंत्रणेमार्फत एनआयव्ही, पुणे येथून तपासून घ्यावा.

गावातील सर्व पाणी साठे वाहते करण्यात यावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत, जे घरातील पाणीसाठे रिकामे करता येत नाही, त्यामध्ये गप्पीमासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वाप करावा. निरूपयोगी टायर नष्ट करावे, रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये रहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.