Jalgaon ZP News । खुशखबर ! शिक्षकांची होणार पगार वाढ, श्रेणी प्रस्ताव मंजूर

Jalgaon ZP News ।  जळगाव जिल्हा परिषदेच्या ६३४ शिक्षकांचे निवड श्रेणी प्रस्ताव शासनाने मंजूर केले आहेत. याबाबत राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने पाठपुरावा केला होता. शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न निवड श्रेणी प्रस्ताव हा शासनाने मंजूर केल्याने राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने समाधान व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले आहे.

जिल्हा परिषद शाळेतील एकाच पदावर सलग २४ वर्ष समाधानकारक सेवा झाल्यावर शिक्षकांना मंजूर होणाऱ्या निवडश्रेणीचे प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत होते. यादरम्यान, अनेक शिक्षक सेवानिवृत्तदेखील झाले. मात्र शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न काही मार्गी लागत नव्हता. शिक्षकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी शिक्षक संघटना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, उपमुख्य  कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्याकडे निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा करत होती.

शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनानेदेखील संघटनेच्या या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एकाच वेळी एकूण ६३४ शिक्षकांचे विक्रमी निवडश्रेणी प्रस्ताव प्रशासनाने मंजूर केले.  निवडश्रेणी प्रस्ताव एवढ्या मोठ्या संख्येने मंजूर होण्याची जळगाव जि.प. जळगावच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पवार, जिल्हा सरचिटणीस सतीश बोरसे, जिल्हा कोषाध्यक्ष विश्वास सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रतापसिंग परदेशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

ज्या शिक्षकांचे प्रस्ताव किरकोळ त्रुटींमुळे मंजूर होऊ शकले नाहीत, त्यांचेदेखील त्वरित निवडश्रेणी प्रस्ताव मंजूर करावेत, अशी विनंतीही संघटनेच्या वतीने जि.प. प्रशासनास यावेळी करण्यात आली.