तरुण भारत लाईव्ह । भुसावळ : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर खडसेंची चौकशी सुरू झाली, असा आरोप राज्याचे वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केला. भुसावळ शहरातील जामनेर रोडवर रविवारी स्वा.सावरकरांच्या स्मारकाचे उद्घाटन आणि स्व.शांतीलाल सुराणा स्मृती पाणपोईच्या उद्घाटनानिमित्त मंत्री गिरीष महाजन भुसावळात आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. महाजन म्हणाले की, खडसेंच्या कुटूंबाला उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानेच ते सध्या बाहेर आहेत शिवाय जावयाला अडीच वर्षानंतरही जामीन मिळालेला नाही. कुठलाही दोष नसताना खडसेंमुळेच जावयाला जेलमध्ये जावे लागले असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.
सुप्रीम कोर्टातही मिळाला नाही दिलासा
खडसेंनी माझ्यावर मोक्का लावल्याची स्वतःहून कबुली दिली हे फार बरे झाले मात्र मी कोणतेही आरोप त्यांच्यावर केले नाहीत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी केलेल्या आरोपांवरुन त्यांची ईडीसह अन्य विभागाकडून चौकशी होवून कारवाई झाली मात्र दहावेळा सुप्रीम कोर्टात जावूनही खडसेंच्या जावयाला जामीन मिळू शकला नाही याला कारणीभूत खडसेच असून त्यांच्यामुळे जावई दोन-अडीच वर्षांपासून जेलमध्ये असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.