नागपुर : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज अलीकडे चर्चेत आले आहेत. बागेश्वर बाबा नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री महाराज लोकांचं मन वाचू शकतात, असा दावा करतात. याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना थेट आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबांना श्याम मानव यांनी आव्हान दिलं होतं. बागेश्वर बाबांनी त्यांच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवावी. आम्ही त्यांना ३० लाख रुपये देऊ, असं श्याम मानव म्हणाले होते. यानंतर बागेश्वर बाबा नागपुरातील कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून गेले होते.
अशातच आता श्याम मानव यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. या फोननंतर एकच खळबळ उडाली आहे. हा धमकीचा फोन आल्यावर नागपूर पोलिसांनी श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
बागेश्वर बाबांच्या गावात हनुमानाचं मंदिर आहे. याच बालाजी मंदिरात त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग यांची समाधी आहे. आजोबा सिद्धपुरुष होते आणि त्यांच्या तपश्चर्येमुळं आपल्याला भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा ते करतात. तसंच, बागेश्वर बाबांनी असाही दावा केला आहे की, त्यांच्याकडे असलेल्या दैवीशक्तीमुळं ते लोकांच्या मनातील गोष्ट ओळखू शकतात. त्यांच्या याच दाव्यामुळं बागेश्वर धाममध्ये भक्तांची संख्या वाढली आहे, असेही बागेश्वर बाबांनी सांगितलं आहे.